लहानसहान गावांमध्ये कुणालाही पडल्यामुळे, धडपडल्यामुळे, शरीराला कुठे मार लागला, तर चटकन आंबेहळद व रक्तरोडय़ाचा दाट व गरम लेप लावण्याची प्रथा आहे, पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली की आजीबाईच्या बटव्यातून हळूच आंबेहळद डोकं वर काढी.
त्याकाळी आतासारखे दवाखाने किंवा हॉस्पिटल नव्हते. त्यामुळे वैदयबुवा असो किंवा घरचा आजीचा बटवा शरीरावर कोणताही मार लागला की त्यावर आंबेहळदीचा लेप लावला जाई. कालांतराने प्रत्येकाच्या घरातून आंबेहळद हळूहळू कमी झाली आणि त्याची जागा पेनकिलर किंवा अन्य औषधांनी घेतली. परंतु, आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते.
विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
- मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.
- शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.
- साकलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त साकळलेल्या जागेवर लावावी.
- शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा.
- अंगावरील पूरळ दूर होतात.
- आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो
दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.
खऱ्या आंबेहळदीचे झाड बंगालमध्येच होते. महाराष्ट्रात आंबेहळद म्हणून जी मोठय़ा प्रमाणावर बाजारात उपलब्ध असते ते रानहळदीचे गठ्ठे होत. खऱ्या आंबेहळदीचे कंद आल्याच्या आकाराचे आणि दिसावयास आल्यासारखेच असतात. त्यांचा रंग पिवळा असतो. तिला पिकलेल्या आंब्यासारखा मधुर वास येतो. आंबेहळदीचे गुणधर्म आल्यासारखेच आहेत, पण त्यात फरक असा आहे की आले हे उष्ण गुणाचे आहे आणि आंबेहळद शीत गुणाची आहे.
आंबेहळदीचे चूर्ण घेतल्यामुळे अग्निमांध विकारात सत्वर फायदा होतो. भूक चांगली लागते आणि लहान व मोठय़ा आतडय़ातील वायू मोकळा होतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरिता आंबेहळदीचा विशेष उपयोग होतो. आंबेहळदीला हळदीप्रमाणेच लवकर कीड लागू शकते. त्यामुळे कीड न लागलेल्या आंबेहळदीचाच वापर लेप लावण्याकरिता आणि पोटात घेण्याकरिता प्रशस्त आहे.
काही कारणाने यकृत किंवा पांथरीला सूज आल्यास आंबेहळदीचा दाट व गरम लेप लावल्यास एक-दोन आठवडय़ात सूज कमी होते. शरीरात कुठेही बारीकसारीक पुटकुळय़ा, पुवाळ, फोड आल्याने आणि त्यामुळे खाज सुटत असेल तर आंबेहळद व कडुजिऱ्याचे चूर्ण-गोमूत्रामध्ये मिसळून एकजीव करून असा लेप संबंधित भागाला लावावा. शरीराला काही कारणाने काळसरपण किंवा अनाकर्षकता आली असेल तर तरुणाईने ताज्या आंबेहळदीचा लेप चेहऱ्यावर अवश्य लावावा. सर्दी, पडसे, खोकला, दमा या विकारांकरिता रजन्यादिवटी या औषधाचे योगदान खूपच आहे. त्यात आंबेहळद हे एक प्रमुख घटकद्रव्य आहे.
दक्षिण भारतातील कोचीनपासून पश्चिम किनाऱ्यावर होणारी आंबेहळद गुणांच्या दृष्टीने जास्त लाभदायक आहे. आंबेहळदीच्या शेतात दोन वर्षांनंतर ही विशेष गुणवान हळद काढली जाते. तिला इतर हळदीच्या मानाने चौपट भाव मिळतो. ही हळद ‘कोचीन टर्मेरिक’ या नावाने ओळखली जाते. आंबेहळदीमध्ये राळ, साखर, पिष्टमय पदार्थ, डिंक व अनियमित आकाराचे तंतू, ऑरगॅनिक अॅसिड अशी विविध द्रव्ये असतात.
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे.. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.