Income Tax Portal : आयकर विभागाकडून नव्या पोर्टलची निर्मिती

0

आतापर्यंत आपण सर्वजण आपली आयकरविषयक कामे आयकर विभागाच्या (Income Tax Portal) www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करीत होतो. विभागाकडून नवीन पोर्टल निर्मितीचे काम चालू असून, हे पोर्टल पुढील महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होईल. जुन्या पोर्टलवर असलेल्या सर्व माहितीची नोंद नवीन पोर्टलवर सुलभतेने व्हावी व पूर्ण क्षमतेने नवीन पोर्टलवर आपल्या माहितीचे स्थित्यंतरण व्हावे यासाठी 1 ते 6 जून 2021 पर्यत जुने पोर्टल सर्वसाधारण व्यक्ती आयकर विभागाचे अधिकारी यापैकी कुणालाही उपलब्ध नसेल. नवे पोर्टल हाताळावयास अधिक सुलभ असेल अशी खात्री आयकर खात्याकडून देण्यात आलेली आहे.

Income Tax Portal: नवीन पोर्टलची निर्मिती

  • नव्या संकेतस्थळाचा पत्ता www.incometax.gov.in असा असेल. सर्व संबंधित लोक नवीन पोर्टलची माहिती करून घेऊन त्याप्रमाणे आपला प्रतिसाद नोंदवतील त्यावर पृथक्करण करून त्यानंतर म्हणजे 10 जून 2021 पासून आयकर विभाग नव्या पद्धतीचा वापर करून लोकांना प्रतिसाद देईल.
  • दरम्यान वरील कालावधीत ठरलेल्या आभासी पूर्वनियोजित भेटी, सूनवण्या एकतर रद्द होतील अथवा पुढे ढकलण्यात येतील. 
  • जुन्या पोर्टलप्रमाणेच या नव्या पोर्टलवरून सर्वसाधारण करदाते व व्यावसायिक करदात्यांना आपले विवरणपत्र भरता येऊ शकेल. केलेला करभरणा दाखवता येईल. अधिक कापलेल्या कराचा परतावा मागता येईल. 
  • लोकांना आपली आयकरविषयक सर्व कामे करता येतील, आपल्या तक्रारींचे निवारण करून घेता येईल. 
  • आयकर विभागाकडून या पोर्टलचा वापर सूचना देण्यासाठी, लोकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी त्याच्या सुचनांना प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्या विवरणपत्राची छाननी करून अंतिम नोटीस देणे, मागणीचा पुनर्विचार करणे, दंड करणे, सवलत माफी देणे, करदात्यांना आदेश देणे, यासारखी कामे केली जातील.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कराव्या लागलेल्या ताळेबंदीचा विचार करून सर्वांच्या गैरसोईचा विचार करून, फॉर्म 16, 16 A देणे, कापलेल्या कराचा भरणा करणे, विवरणपत्र भरणे ई. अनेक गोष्टींच्या कालमर्यादेत, आयकर विभागाने 1 ते 2 महिन्यांची वाढ अलीकडेच केलेली आहे. 
  • या सर्व गोष्टींचा विचार करून करदात्यांना ज्या सवलती मिळाल्या आहेत, त्याचा एकत्रित विचार करता विवरणपत्र भरण्याची कामे खऱ्या अर्थाने 1 जुलै 2021 पासूनच सुरू होतील आणि त्यात 15 सप्टेंबरनंतर जोरदार वाढ होईल. 

सध्या मिळालेली मुदतवाढ अजून वाढली तर ही तारीख मर्यादा लांबण्याची शक्यता आहे. मात्र यावर विसंबून न राहता करदात्यांनी आयत्यावेळी होणारी धावाधाव टाळण्यासाठी आपल्याला आवश्यक आणि शक्य असलेल्या सर्व माहितीची जमवाजमव करून ती एकत्रितपणे तयार ठेवावी. सध्या सर्व आघाड्यांवर सध्या शांतता असल्याने पोर्टल बदल सुरळीत होण्यास कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही. 

उदय पिंगळे

Leave A Reply

Your email address will not be published.