fbpx
5.5 C
London
Sunday, December 4, 2022

फायद्याची शेती : कमी वेळात अधिक उत्पन्न देणारी कोथिंबरी जाणून घ्या! लागवड पद्धत

कोथिंबिर या भाजीपाला पिकाचे दररोजच्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजीला सुगंध येण्यासाठी, कढीची चव बदलण्याची, सुपमध्ये टाकण्यासाठी कोथिंबिरीचा वापर आवर्जून केला जातो. कोथिंबिरीच्या पानांमध्ये मनमोहक सुगंध असतो. कोथिंबिरीच्या बियांचा मसाल्यासाठी व औषधी तयार करण्यासाठी उपयोग होतो.

कोथिंबिर या भाजीपाला पिकाचे दररोजच्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजीला सुगंध येण्यासाठी, कढीची चव बदलण्याची, सुपमध्ये टाकण्यासाठी कोथिंबिरीचा वापर आवर्जून केला जातो. कोथिंबिरीच्या पानांमध्ये मनमोहक सुगंध असतो. कोथिंबिरीच्या बियांचा मसाल्यासाठी व औषधी तयार करण्यासाठी उपयोग होतो. कोथिंबिरीची लागवड मोठ्या प्रमाणात राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांमध्ये केली जाते. जगात या पिकाची लागवड चीन, थायलंड व मेक्सिको या देशांमध्ये केली जाते.

कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगल्या आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारचे मागणी असते. व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते. या लेखांमधून आपण कोथिंबीर लागवड विषयी माहिती घेऊ.

कोथिंबिरीचा वापर हा अगदी घरापासून ते हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.  त्यामुळे कोथिंबिरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबिरीची लागवड ही प्रमुख्याने पावसाळी व हिवाळी हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे कोथिंबिरीचे उत्पादन कमी निघत असलेले तरी प्रचंड मागणीच्या तुलनेत पुरवठा हा फारच कमी असतो. त्यामुळे चांगला बाजार भाव मिळून उत्तम आर्थिक नफा मिळतो.

हवामान व जमीन : कोथिंबरीचे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी 20 अंश सें. ते 28 अंश सें. तापमान आवश्यक असते. कोथिंबिरीची लागवड मध्यम थंड व उष्ण हवामानातसुद्धा (कोणत्याही हवामानात) केली जाते.

कोथिंबीर हे पीक अतिशय थंडीत (बर्फ पडणार्‍या दिवसांत) येत नाही, तसेच अतिशय उष्ण तापमानात (35 अंश सें. ते 40 अंश सें. ) सोप्या भाषेत अति पाऊस असेल किंवा उन्हाळ्यात अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हव्या त्या प्रमाणात होत नाही यामुळे  पिकाची वाढ होत नाही. पर्यायाने उत्पादनात घट होते.

पाण्याच्या स्त्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येऊ शकतो. महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर अति पावसाचा प्रदेश वगळून महाराष्ट्रातील हवामान वर्षभर कोथिंबीरीची लागवडसाठी पोषक आहे. उन्हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते.

विविध प्रकारच्या जमिनींत हे पीक घेता येते, परंतु मध्यम वाळूमिश्रित पोयट्याची सुपीक (मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची) जमीन या पिकास मानवते. या पिकाच्या भरघोस वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी व ज्या जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक (सामू) 6 ते 8 आहे अशा जमिनीची निवड करावी. परंतु माती जर पोषणमूल्य भारित असेल तर हलक्‍या जमिनीतही कोथिंबीर शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. माती परीक्षण करून जर योग्य खतांचा पुरवठा केला तर जमिनीचा पोत सुधारून हलक्या जमिनीत सुद्धा कोथिंबिरीचे उत्पादन घेता येते.

लागवडीचा योग्य हंगाम : कोथिंबिरीची लागवड रब्बी, खरीप आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात करता येते. उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्‍यात कोथिंबीरीचे उत्‍पादन घ्‍यावे.

कोथिंबीरीची लागवड पद्धत / व्यवस्थापन  कोथिंबिर पिकाची लागवड बिया लावून करतात, भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये व दक्षिण भारतात जून-जुलै किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लागवड करतात,

  • सुरुवातीला ज्या जमिनीत कोथिंबिरीचे उत्पन्न घ्यायचे आहे, त्या जमिनीची चांगल्या पद्धतीने नांगरट करून घ्यावी.
  • रोटावेटरने जमीन उत्तम प्रकारे भुसभुशीत करून घ्यावी.
  • तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे बनवून प्रत्येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून व्यवस्थित जमिनीत मिसळून घ्यावे.
  • वाफे एकसमान पद्धतीने सपाट करावेत जेणेकरून बी सारख्या प्रमाणात पडेल.
  • फोफोव पद्धतीने बी फोकून पेरावे किंवा बिया सपाट वाफ्यात सरळ रेषांमध्ये पेरावे. फोफोव पद्धतीपेक्षा बिया सरळ रेषेमध्ये एकसारख्या टाकल्यास चांगले उत्पादन मिळते. त्याचबरोबर तणांचे बंदोबस्त करायला, मशागतीचे काम करायला ही पद्धत चांगली आहे.
  • बी हलक्या मातीने झाकून हलकेसे पाणी द्यावे.
  • तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असेल तर १० ते १५ सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पाडून बी पेरावे नंतर मातीने झाकून द्यावे. जर उन्हाळी हंगामात पेरणी करायची असेल तर, वाफे चांगल्या पद्धतीने ओलित करून घ्यावेत. वाफसा आल्यानंतर बियाणे पेरावे.
  • कोथिंबीर लागवडीसाठी एकरी २५  ते ३५ किलो बियाणे लागते. लागवडीआधी धने लाकडी पाटीच्या साहाय्याने रगडून फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे. पेरणीपूर्वी धन्याचे बी भिजवून गोणपाटात गुंडाळून ठेवावे यामुळे बियांची उगवणशक्ती वाढून जोमदार रोपे तयार होण्यास मदत होते. लागवडीनंतर 8-10 दिवसांत रोपांची उगवण होते.
  • लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी विरळणी करून कमी वाढ असलेली, एकाच ठिकाणी जास्त उगवलेली रोगट, कीडग्रस्त रोपे काढून टाकावी

कोथिंबिरीसाठी खत व पाणी व्यवस्थापन – कोथिंबीर लागवड ज्या जमिनीत करायची आहे त्या जमिनीत लागवड आधी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. कोथिंबीर उगवल्यानंतर साधारणतः ३५  ते ४० दिवसांनी ४० किलो नत्राची मात्रा द्यावी. तिच्यासोबत २५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करून घ्याव्यात. त्यामुळे कोथिंबिरीची वाढ उत्तम होते.  कोथिंबीर एक कोवळी पीक असल्यामुळे त्याला नियमित पाण्याची गरज असते त्यामुळे उन्हाळ्यात दर ४ ते ५ दिवसांनी हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : पाण्याचे व्यवस्थापन करत असताना हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्या. हिवाळ्यात या पिकास 10 ते 12 दिवसांनी व उन्हाळ्यात 4-5 दिवसांनी नियमित पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात हलकी वखरणी व निंदण करावे.

सुधारित जातींचा वापर : कोथिंबिरीच्या सुधारीत जातींचा वापर लागवडीसाठी करावा. त्यामध्ये आरसीआर-41, आरसीआर-20, आरसीआर 435, 436, 446, जीसी-1,2, सिंधू, साधना, स्वामी, को. 1, 2, 3, सी-एस 287 आरडी-44 (राजेंद्र स्वामी), हिसार आनंद, आयआयएचआर 13 व डीएच-5 इत्यादी सुधारित जातींचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

काढणी व उत्पादन : कोथिंबिरीची काढणी / छाटणी लागवडीपासून 25 ते 30 दिवसांत सुरू करावी. त्यानंतर दर 10-15 दिवसांनी हिवाळ्यात काढणी सुरू ठेवावी. वातावरणात जास्त उष्णतामान असल्यास पिकास अवेळी फुलधारणा होते. अशा वेळी पूर्ण रोपे मुळासकट उपटून काढणी करावी.

कोथिंबिरीचे हेक्टरी 6 ते 8 टन उत्पादन सिंचनाची सोय असल्यास मिळते. बियाणाचे हेक्टरी उत्पादन 1.2 ते 2.5 टन व कोरडवाहू परिस्थितीत 700 ते 800 किलोग्रॅम मिळते. महाराष्ट्रात पावसाळी आणि हिवाळी हंगामात ४ ते ५ टन एकरी उत्पादन मिळते. उन्हाळी हंगामात हेच उत्पादन २ ते ३ टनांपर्यंत मिळते. पण पुरवठा कमी असल्यामुळे चांगला भाव मिळाल्याने चांगला पैसा हाती येतो. पिकाचे बियाणे 90 ते 130 दिवसांत पक्व होते.

कोथिंबीरवरील कीड व रोग: कोथिंबीर पिकावर रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव हा अल्पशा होतो. कधी-कधी मर, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशावेळी शिफारस केल्याप्रमाणे औषधांचा वापर केला तर भुरी रोग नियंत्रणात येऊ शकतो, तसेच पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here