फायद्याची शेती : सुधारित तंत्राने करा शेवगा लागवड…

0

महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्येदेखील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा परिस्तिथीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. कारण, शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारचीच जमीनच असावा अस काही नाही, हलक्या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्य आहे शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेने कमी आहे.

जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्‍या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो. मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीतही शेवग्याची लागवड होते परंतु अशा जमिनीत झाडे उंच वाढतात. पानांची वाढ जास्त, ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते.

शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते.

हवामान व जमीन :

 • शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो.
 • शेवगा लागवडीसाठी जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, या वेळी हवेतील आर्द्रता वाढते. जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील कमी असते. अशा वेळी रोपांची लागवड केल्यास रोपे उगवण्यास अनुकूल वेळ असते.

शेवगा लागवडीसाठी विविध वाण/सुधारित जाती : 

 • कोइमतूर येथील तामिळनाडू कृषि विश्वविद्यालयामध्ये कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असणाऱ्या जाती आहेत.
 • पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो.
 • डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने कोकण रुचिरा जात प्रसारित केली आहे. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच असून १६ ते २२ फांद्या असतात.
 • बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापिठाने चांगली उत्पादन देणारी ‘भाग्या’ ही जात विकसित केली आहे.
 • दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे एखादे झाड निवडावे. अशा झाडाचे फाटे वापरून लागवड केली असता चांगले उत्पादन देणारी जात मिळू शकते.

लागवड

 • व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करताना ६० सें.मी. लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, १५:१५:१५ हे खत २५० ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा प्लस ५० ग्रॅम या मिश्रणाने खड्डा भरावा.
 • लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३ मीटर ठेवावे. लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.लागवडीनंतर आंतर मशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणीकडे लक्ष द्यावे.
 • शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम व बियांपासून रोपे तयार करून केली जाते. परंतु बियाणापासून लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणे (अनुवांशिक गुण/True to Type) गुणधर्म असलेली झाडे मिळू शकत नाहीत. तसेच बिया लागवडीपासून केलेल्या झाडापासून शेंगा /फळ धारणा, फाटे कलमापेक्षा ३ ते ४ महिने उशिरा मिळतात. फाटे कलमापासून लागवडीसाठी ५ ते ६ सें.मी. जाडीच्या सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात.

लागवड तंत्र

 • कमी पावसाच्या प्रदेशात जून – जुलैमध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आद्रता वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. फाटे कलम किंवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबून पाणी द्यावे.
 • लागवडीनंतर ६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देवून झाडे जगवावी किंवा झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात २ ते ३ लिटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे. त्यामध्ये सहा दिवसाच्या अंतराने पाणी भरावे. मडक्‍याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची लहान चिंधी बसवलेली असावी. लागवडीला ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.
 • झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज भासत नाही. आंतरपीक म्हणूनही शेवगा पीक घेता येते. कलमी आंबा, चिकू, जांभूळ, फणस व गावठी आंबा यांच्या झाडांमधील मोकळ्या जागेत पहिले ५ ते ६ वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.

लागवडीनंतरचे व्यवस्थापन

 • लागवडीनंतर आंतर मशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणीकडे लक्ष द्यावे लागते.
 • लागवडीत फारशी आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुद्धा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते.

खत व्यस्थापन:  

 • शेवगा पिक वेगाने वाढणारे पिक आहे. म्हणून, प्रतिवर्षी पावसाच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात प्रत्येक झाडाला 10 कि. कंपोस्ट/शेणखत, 75 ग्रॅम नत्र (165 ग्रॅम युरिया) 50 ग्रॅम स्फुरद (108 ग्रॅम डी.ए.पी.) व 75 ग्रॅम पालाश (120 ग्रॅम एम.ओ.पी./म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे.

वाढ व्यवस्थापन:

 • शेवगा हे वेगाने /झपाट्याने वाढणारे झाड आहे. शेवगा पिकाच्या शेंगा तोडणीसाठी झाडाची वाढ व्यवस्थापण खूप महत्त्वाचे असते, अन्यथा झाड उंच वाढते पर्यायी शेंगा तोडणी अवघड बनते.
 • वाढ व्यवस्थापनासाठी शेवगा लागवडी नंतर चार-पाच महिन्यांनी पहिली छाटणी करावी. त्यासाठी खोड जमिनीपासून 3-3.5 फुटांवर छाटावे आणि चार पाच फांद्या चोहो बाजुनीन वाटू घ्याव्यात. नंतर 7-8 महिन्यांनी चार पाच ठेवलेल्या फांद्या मुख्य खोडापासून 1 मी. अंतरावर कट कराव्यात.
 • यामुळे शेवगा वाढ नियंत्रण केल्यास शेंगा तोडणीसाठी सोपे होईल, झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाते, उत्पादन वाढते. झाड जुने होईल तसतसे दर दोन वर्षांनी एप्रिल – मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी, म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.

पीकसंरक्षण :

 • या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु, काही वेळा जून ते ऑगस्ट महिन्यात पानांची गळ होते. खोड व फांद्यांवर ठिपके किंवा चट्टे दिसतात. रोेपे मरतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा बोर्डोमिश्रण (०.२५%) फवारावे.

काढणी व उत्पादन:

 • लागवडीपासून सुमारे सहा ते सात महिन्यानंतर प्रत्येक हंगामात एक चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात.
 • चांगली शेंग म्हणजे शेंगांची लांबी ५० ते ६० सें.मी. असावी. त्यात भरपूर गर असावा. कडवट चव असणाऱ्या शेंगास दर मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा ताजेपणा २ ते ३ दिवस टिकून राहावा. बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात.
 • पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे, अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागद गोणपाटावर गुंडाळल्यास शेंगांचा तजेला जास्त काळ टिकून राहतो.
 • शेवगा शेंग रसरशीत असतानाच तोडणी करावी खूप टणक झाल्यास शेंगाची चव कमी होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.