fbpx

टोल पावत्यांचे आहेत एवढे सगळे फायदे! तुम्हाला माहिती हवेतच…

0

भारतात कोणत्याही लांबच्या प्रवासाला निघाल्यावर “आला पुन्हा टोल नाका… काय करतात इतका टोल घेऊन काय माहीत ? ” एक्सप्रेस हायवे वरून जातांना टोलची संख्या कमी असते.

पण, टोलचा दर अर्थातच जास्त असतो. टोलचा दर हा गाडीचा आकार, वजन, एक्सेल ची संख्या यावरून ठरत असते, म्हणूनच वाहणानुसार वेगवेगळ्या रांगा आपल्याला बघायला मिळतात.

बी ओ टी तत्वावर म्हणजेच – बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्स्फर या पद्धतीने राज्य किंवा केंद्र सरकारकडून रोड बांधकामाचे कामं ही गुत्तेदारांना दिली जातात.

काम पूर्ण झाल्यावर काही ठराविक वर्ष टोल च्या माध्यमातून त्या गुत्तेदाराला पैसे मिळत असतात. बांधकामाला लागणारा खर्च वसूल झाल्यावर टोल हा आधीपेक्षा ४०% इतकाच ठेवला जातो.

हा टोल त्या रोडच्या देखभालीसाठी असतो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही पद्धतीला काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘Fastag’ प्रणाली मुळे थोडी गती मिळाली आहे ही चांगली गोष्ट आहे.

त्यामुळे वाट बघत थांबणाऱ्या कित्येक वाहनांचं पेट्रोल कमी खर्च होत आहे हे नक्की. परदेशात कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रणालीला भारतात यायला खूप वर्ष लागली हे मान्य करावं लागेल.

कोणत्याही शहराची वेस ओलांडतांना आता टोलनाक्यावर बसवलेल्या स्कॅनर द्वारे पैसे ‘फास्टॅग’ मधून वळते केले जातात. तुम्हाला फक्त आपल्या मोबाईल सारखं ‘फास्टॅग’ च रिचार्ज करून ठेवणं गरजेचं आहे.

प्रत्येक टोल खिडकीच्या गेट जवळ आल्यावर वाहनचालक ब्रेक लावून उजवा हात बाहेर काढतो आणि त्याच्या हातावर एक ‘पावती’ ठेवली जाते. अनुभवी वाहनचालक ठरलेल्या जागेपर्यंत पोहोचेपर्यंत ही पावती व्यवस्थित जपून ठेवतो.

नवीनच गाडी चालवणारे मात्र काही वेळेस अनावधानाने ही पावती हरवतात किंवा हलगर्जीपणा मुळे रस्त्यावर टाकून देतात. काही दिवसांनी आकडे पुसून जाणाऱ्या या पावतीचे फायदे फार कमी जणांना माहीत असेल.

“टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे? त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात.

१. टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

२. एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

सध्या उपलब्ध असणाऱ्या टेक्नो कार मध्ये पेट्रोल इंडिकेटर्स असतात त्यामुळे हे क्वचित होत असावं.

पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा.

दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

३. तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे.

४. तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.

टोल कंपन्यांकडून मिळू शकणाऱ्या या सुविधांचा कोणी गैरवापर करू नये हे मात्र अपेक्षित आहे. “खरंच सर्विस मिळते का?” हे बघण्यासाठी सुद्धा कोणी सहज फोन करू नये.

कारण, आपण त्यांचा तेवढा वेळ, इंधन मागत असतो ज्याची कदाचित दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त गरज असेल.

परवाना धारक जे गुत्तेदार आहेत त्यांना कोणत्याही हायवे वरील टोलनाक्या जवळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणं हे बंधनकारक आहे. तसं नसल्यास आपण रीतसर तक्रार सुद्धा दाखल करू शकता.

ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.

प्रवास करतांना आपण फक्त सतर्क राहणं, सीट बेल्ट लावणे आणि टोलच्या पावत्या जपून ठेवणं या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत, यामध्ये आपलाच फायदा आहे. सतर्क रहा, सुरक्षित वाहन चालवा, प्रवासाचा आनंद घ्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.