हायड्रोजन-CNG इंधनाचा उत्तम पर्याय, योजनेनुसार काम झाले तर खाजगी गाड्या धावणार H-CNG वर
दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाचे वाढते प्रदूषण लक्षात घेता भारत सरकार पेट्रोल-डीझेल या पारंपारिक इंधनाला पर्याय शोधत आहे. इथून मागे सार्वजनिक वाहतुकीमध्ये विजेचा वापर केला जाईल असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे काही शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी देखील झाली. मात्र आता भारत सरकार सार्वजनिक वाहतूकीच्या सरकारी गाड्यां व्यतिरिक्त इतर खाजगी गाड्यांसाठी इंधनाचा पर्याय म्हणून हायड्रोजन युक्त CNG (H-CNG) आणण्याचा विचार करत आहे.
या अनुषंगाने भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार हायड्रोजन-समृद्ध होण्याच्या पार्श्वभूमीवर भागधारक आणि नागरिकांकडून काही सूचना मागवल्या आहेत. याची प्रत्यक्षात अंंमलबजावणी करायची असेल तर केंद्रीय मोटार वाहन नियम 1979मध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागतील.
भारत सरकार ऑटोमोटिव्ह वापरासाठी नवीन इंधनाचा पर्याय शोधत आहे. तसे पाहिला गेले तर एचसीएनजी इंधन म्हणून वापरात आणले जाऊ शकते. भारताकडे सुरवातीपासूनच सीएनजी रिफ्युएलिंग स्टेशनची पायाभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
H-CNG मूलत: कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे जो हायड्रोजनमध्ये मिसळला गेला आहे. H-CNGच्या संरचनेत त्यात हायड्रोजनचे 18% घटक असतात. हे मिश्रण सीएनजीवर चालविणार्या अवजड वाहनांच्या वापरासाठी देखील फायदेशीर आहे. वाहनासाठी वापरण्यात येणारे इंधन सामावून घेण्यासाठी, आधीपासूनच सीएनजीवर असलेल्या इंजिनमध्ये फक्त किरकोळ बदल आणि ऑप्टिमायझेशन करावे लागेल.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, HCNGमधून कार्बन मोनोऑक्साइड (सीओ), मिथेन आणि हायड्रोकार्बन (टीएचसी) कमी प्रमाणत उत्सर्जित होते. ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या अनुषंगाने भारत सरकार लवकरच पायलट प्रकल्प राबवेल आणि अस्तित्त्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून HCNG वापरात आणण्याचा प्रयत्न करेल.