हिवाळ्यात त्वचेला मऊ-मुलायम ठेवणाऱ्या व्हॅसलीनमध्ये नक्की असतं तरी काय ?

0

हिवाळा सुरु झाला की त्वचेच्या संबंधित समस्या वाढायला सुरुवात होते. अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते. यासाठी क्रीम आणि त्वचेशी संबंधित इतर प्रोडक्ट वापरले जातात. यातील एक महत्वाचं उत्पादन म्हणजे व्हॅसलीन हे आहे. जवळजवळ प्रत्येकाला व्हॅसलीन माहित आहे, परंतु ते तयार कसे होते? त्यात कोणते घटक असतात? आणि त्वचेच्या व्यतिरिक्त व्हॅसलिनचे इतर कोणते फायदे होतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

व्हॅसलीन काय आहे ?

व्हॅसलीन ही एक प्रकारची पेट्रोलियम जेली आहे, जी मऊ पॅराफिनचा एक प्रकार आहे. हे चरबीयुक्त पदार्थांचे मिश्रण आहे, जे पेट्रोलियम पासून बनलेले आहे. हा एक जाड आणि चिकट पदार्थ आहे, ज्याला गंध किंवा चव नाही. हे त्वचेच्या काळजीसाठी वापरले जाते. व्हॅसलिनचा शोध हा अमेरिकेमध्ये लागला.

या पेट्रोलियम जेलीचा उपयोग भाजलेली, कापलेली, सोललेली आणि कोरडी त्वचा बरे करण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचा लवकर जुळून येते व जखम दुखत असेल तर त्यापासून आराम मिळतो. या फायद्यांव्यतिरिक्त व्हॅसलीनचे इतर फायदे देखील आहेत त्याबद्दल आपण पुढे वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे माहिती जाणून घेणार आहोत.

व्हॅसलिनचे इतर फायदे

लिप स्क्रब 

व्हॅसलीनमध्ये साखर मिसळून हे लिप स्क्रबर म्हणून वापरले जाऊ शकते. या प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्या साखरेचे लहान कण ओठातून मृत पेशी काढून टाकण्यासाठी कार्य करतील. यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. तसेच पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलीनमध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहे जे ओठांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरेल.

फाटलेल्या टाचांसाठी

व्हॅसलीनचा उपयोग फाटलेल्या टाचांना पूर्ववत करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनसीबीआयच्या (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या वैज्ञानिक संशोधनानुसार पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलीनला एक चांगला हुमेक्टंट मानला जातो. हुमॅक्टंट त्वचेमध्ये मॉइश्चरायझर टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. त्वचेतील आर्द्रतेमुळे तिच्या फाटण्याची शक्यता कमी होते. फाटलेल्या टाचांना मऊ बनवण्यासाठी हे मदत करू शकते.

कुरळ्या केसांसाठी

गुंतागुंत झालेले आणि कुरळे केस सरळ करण्यासाठी व्हॅसलीन वापरता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या वैज्ञानिक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पेट्रोलियम समृद्ध तेलाचा वापर करून केस सरळ करताना केसांना होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होतो. तसेच हे केस सहज सरळ करू शकते आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे व्हॅसलीनमध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे हे केसांमध्ये आर्द्रता राखण्यास मदत होते.

लिपस्टिकच्या डागांसाठी 

व्हॅसलीनचा उपयोग दातांवर लिपस्टिकचे डाग लागण्यापासून रोखण्यासाठी करू शकतो. व्हॅसलीन हा एक जेली पदार्थ आहे, यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वी ते दातांवर लावल्यास रंग दातांना चिकटत नाही. मात्र लक्षात घ्या की लिपस्टिक लावल्यानंतर दातांचे व्हॅसलीन पुसून टाका. ते गिळण्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

आग पेटवण्यासाठी

आपण सुरुवातीला वाचल्याप्रमाणे व्हॅसलीन हे पेट्रोलियमचे उत्पादन आहे त्यामुळे त्यामध्ये पेट्रोलचे काही गुणधर्म आढळतात. पेट्रोलचा उपयोग ज्या प्रकारे आग पेटविण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे आग लावण्यासाठी व्हॅसलीन देखील वापरली जाऊ शकते. त्याच्या मदतीने लाकूड पटकन आग पकडते.

व्हॅसलीनचे तोटे

ज्याप्रमाणे व्हॅसलीनचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो, त्याचप्रमाणे व्हॅसलीनचेही काही तोटे असू शकतात. जर व्हॅसलीनचे चुकून सेवन केले तर त्यास ओटीपोटात दुखणे, खोकला, अतिसार, घश्यात जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तसेच व्हॅसलीनमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यासह व्हॅसलीनच्या वापरामुळे कधीकधी एलर्जी देखील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.