कोमल पाटील : गुरु -शिष्य परंपरा भारतीय संस्कृती मधला एक महत्वपूर्ण आणि अविभाज्य भाग आहे. जीवनात आई -वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपल्याला या सुंदर जगात आणण्याचं श्रेय असल्याने जीवनात सर्वात पहिले गुरु आपले आई -वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु – शिष्य परंपरा असून शिक्षक हे आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. आज 5 सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस “शिक्षक दिन ” म्हणून साजरा होतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान आणि जगाकडं पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरुंप्रती किंवा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये मद्रास जवळच्या तीरुराणी येथे झाला. त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होत. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. “तत्वज्ञान ” हा त्यांचा आवडता विषय असल्यानं त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडलं नाही. त्यांनी “वेदांतातील नीतिशास्त्र ” या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधाला विद्यापीठानं सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ठ प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची सगळ्या जगाला ओळख करुन दिली. कुशल व्यक्तिमत्व आणि इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळं परदेशात त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते ‘नीतिशास्त्र ‘ या विषयाचे प्राध्यापक होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षणाबद्दल अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेनं होत नाही, यंत्रान होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळं होत असतो. शिक्षकांचे महत्व असाधारण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती होणार नाही. ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान आणि प्रतिष्ठा असते तेथील प्रज्ञावंत माणसं शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करु शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे शिक्षकांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे.
शिक्षण प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन महत्वपूर्ण घटक असतात. शिक्षक म्हणजेच शी – शीलवान, क्ष – क्षमाशील, क -कर्तृत्ववान. ज्यामध्ये हे गुण असतात तोच खरा शिक्षक. मानसिक गुणांचं संवर्धन आणि दोषांचं उच्चटन जे करतं ते खरं शिक्षण. जगात वावरण्यासाठी, स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणार ज्ञान म्हणजेच शिक्षण. पूर्वीच्या काळी प्रत्येक वर्णासाठी भिन्न स्वरूपाचं शिक्षण होत. ब्राह्मणवर्ग वेदविद्येचे, क्षत्रिय शस्त्रविद्येचं आणि वैश्य व शूद्र वर्ण हे वाडवडिलांकडून चालत आलेल्या कलेचं शिक्षण घ्यायचे. पण आज ही पद्धती बदललेली आहे. आजचं शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचं आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणं याला आजकाल ‘परीक्षा ‘म्हटलं जातं. पुस्तकाबाहेरील कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही नसते. ज्याचं पाठांतर उत्तम तो अत्यंत हुशार असा गैरसमज रूढ झाला आहे.
दिवसेंदिवस महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकडीची गरज आहे. परंतु ती गरज आज पूर्ण होत नाही. पुस्तकी शिक्षणावर जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्ती विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला तर नृत्य, गायन, शिल्पकला अशा कला विभागांचाही अंतर्भाव करायला हवा. दुर्दैवाने या विषयांकडे अजूनही उपेक्षेने पाहिलं जातं. आजच्या शिक्षण पद्धतीतून मनुष्य सुशिक्षित होतो पण तो सुजाण, सुसंस्कृत होतोच असं नाही. वास्तविक पाहता शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. त्यामुळं त्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी असायला हवी. आणि ती दृष्टी शिक्षकाने द्यायला हवी. त्यामुळं शिक्षक हवा घडणारा आणि घडविणारा !!!
शिक्षक म्हणजे एक समुद्र…
ज्ञानाचा… पावित्र्याचा….
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला…
शिक्षक, अपूर्णाला पूर्ण करणारा…
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढविणारा…
शिक्षक, जगण्यातून जीवन घडवणारा
शिक्षक, तत्वातून मूल्य फुलविणारा…