ये मसाला ही कुछ और है ! टांगा चालवणाऱ्या महाशय धर्मपाल गुलाटींनी अशी उभी केली करोडोंची संपत्ती
मसाला किंग नावाने प्रसिद्ध असणारे MDH समूहाचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ९८ वर्षीय महाशय धर्मपाल हे आजारपणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील माता चन्नान रुग्णालयात दाखल होते. परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फाळणीनंतर भारतात आलेले महाशय धर्मपाल गुलाटी यांनी भारतातील आयुष्य हे टांगा चालवून सुरु केले होते परंतु ते मसाल्याचे किंग बनले. यात त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. त्यावर मात करीत त्यांनी MDH मसाल्याचे विश्व उभे केले. त्यांच्या कार्याची दाखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सियालकोट पाकिस्तान येथे जन्म
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ रोजी सियालकोट (आता पाकिस्तानात) येथे झाला. सन १९३३ मध्ये त्यांनी ५ वी इयत्ता पूर्ण करण्यापूर्वीच शाळा सोडली. १९३७ मध्ये त्यांनी वडिलांच्या मदतीने व्यवसाय सुरू केला त्यांनी साबण, कापड, हार्डवेअर, तांदळाचा व्यवसाय केला असल्याची माहिती आहे.
महेशियां दी हट्टी या दुकानात काम
त्यानंतर त्यांनी महेशियां दी हट्टी या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. परंतु येथे ते जास्त वेळ काम करू शकले नाहीत करणार त्यांना आपल्या वडिलांसोबत व्यापार करण्यात जास्त रस होता. त्यामुळे त्यांनी वडिलांसोबत काम करणे पसंद केले.
१५०० रुपये घेऊन दिल्लीला आले
इंग्रजांच्या गुलामीतून भारत पाकिस्तानची सुटका झाल्यानंतर फाळणीवेळी ते पाकिस्तानातून भारतात आले. त्यानंतर २७ सप्टेंबर १९४७ रोजी त्यांच्याकडे केवळ १५०० रुपये होते. यातून त्यांनी ६५० रुपयात एक टांगा विकत घेतला आणि नवी दिल्ली रेल्वे ते कुतुब रोड यादरम्यान टांगा चालविला.
काही कालावधीनंतर त्याच्या कुटुंबियांना इतके पैसे मिळाले की दिल्लीच्या करोल बाग, अजमल खान रोडवर मसाल्यांचे दुकान उघडले. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी व्यवसाय वाढवणे सुरु ठेवले.आणि मसाल्याचे एक यशस्वी व्यापारी म्हणून त्यांनी जगभरात नाव कमावले.
आज त्यांच्याकडे भारत आणि दुबईमध्ये मसाल्यांचे १८ कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये तयार केलेले MDH मसाले जगभर पोहोचतात. MDH कडे ६२ प्रकारची उत्पादने आहेत. तसेच उत्तर भारतातील ८० टक्के बाजारपेठ MDHच्या ताब्यात असल्याचा कंपनीचा दावा आहे.
सामाजिक काम करण्यात अग्रेसर
मसाल्याच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी अशी अनेक कामे केली आहेत जी समाजासाठी खूप उपयुक्त ठरली. यामध्ये रुग्णालये, शाळा इत्यादींच्या बांधकामांचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये सुरु केली आहेत. त्याचा आकडा २० पेक्षा अधिक आहे.
स्वतः करायचे कंपनीची जाहिरात
हळूहळू मसाल्यांचा व्यवसाय इतका पसरला त्यानंतर धर्मपाल गुलाटी स्वत: आपल्या कंपनीची जाहिरात करू लागले. त्यांना आपण बर्याचदा टीव्हीवर आपल्या मसाल्यांबद्दल माहिती सांगताना पहिले असेल. तसेच ते जगातील सर्वात वयस्कर अ;ॅड स्टार मानले जायचे.