fbpx
4.7 C
London
Sunday, January 29, 2023

यशोगाथा ! धीरूभाई अंबानींचा ‘हा’ निर्णय ठरला टर्निंग पॉईंट, व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुणांनी जरूर वाचा

आयुष्य म्हंटलं की खाच-खळगे येतातच मात्र या खाच-खळग्यांनी खचुन घाबरून न जाता धैर्याने सामर्थ्यशाली बनून अविरत प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस यश नक्कीच येते.

प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे कोशिश करने वालों की कभी हार नही होती या ओळीप्रमाणे सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल

आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी उद्योजकाची माहिती सांगणार आहोत ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत देशाच्या उद्योग विश्वामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका कंपनीची स्थापना केली.

त्या व्यक्तीचं नाव आहे धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ गुजरात राज्यातील सौराष्ट्राच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी झाला

#सुरुवातीचे जीवन

धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले.

तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्‍या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले.

ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली.

धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह एडनमध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले.

थोड्याच दिवसात अंबानी बंधू लोकप्रिय होऊ लागले. यामुळे ओळखी तर वाढत गेल्या पण व्यापारी धीरूभाईंना प्रत्येकाकडून काहीतरी माहिती मिळत गेली.

त्यामुळे त्यांना धंद्याचे गणित मांडता येऊ लागले. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई कारकून ते सेल्स मॅनेजर या पायर्‍या ओलांडून गेले. आपल्या कामापुरते अरबी भाषेवर प्रभुत्वही धीरूभाईंनी मिळविले होतेच, अनेक मित्रही जोडले. या मित्र परिवारात भारतीय आणि परदेशी असे सगळेच होते. त्यातील सुशीलभाई कोठारी, नटुभाई संघवी आणि हरकिसन पारेख हे पुढे रिलायन्सचे मुख्य मार्गदर्शक, आधारस्तंभच बनले.

#वैवाहिक जीवन

१९५१ साली धीरूभाई यांचे वडील हिराचंद अंबाणी यांचे निधन झाले. आई जमनाबेन यांच्या पुढाकाराने धीरूभाईंचा विवाह जामनगरच्या कोकिलाबेन पटेल यांच्याशी मार्च इ.स. १९५४ मध्ये झाला. विवाहानंतर धीरूभाई आणि कोकिलाबेन यांनी एडनला संसार थाटला. लग्नानंतर तीन वर्षांनी मुकेश यांचा जन्म झाला. धीरूभाईंना आधीपासूनच दुसर्‍याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटत होते. आपला स्वतंत्र व्यवसाय भारतातच उभा करावा हेही धीरूभाईंनी पक्के केले. शेवटी ३१ डिसेंबर इ.स. १९५८ ला धीरूभाईंनी एडन कायमचे सोडून दिले आणि ते आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतले.

इ.स. १९५९ साली धीरूभाई यांनी १५,०००/- रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह ६५:३५ अशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. खरे काम भारतात धीरुभाई आणि एडनमध्ये ज्येष्ठ बंधू कारभार सांभाळू लागले.

#व्यवसायिक पदार्पण

१९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायर्‍या चढू लागले. १९७५ साली जागतिक बॅंकेने ‘विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प’ म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.

१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्‍नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले.१९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.

१९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.

१९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला.

धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरुष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला.

#रिलायन्स ची सध्याची स्थिती

आज देशात रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. ३१ जुलै २००२ पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात.

कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात जिओ च्या रूपात रिलायन्सने डिजिटल क्रांती केली आहे.

२४ जून २००२ या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपचारांना यश आले नाही. अखेर ६ जुलै २००२ या दिवशी धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते.

  – संकेत देशपांडे 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here