टाटा उद्योगसमूहाचे चेअरमन रतन टाटा यांची भलतीच कोंडी झाल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत त्यांनी इतर उद्योगपतींना कामगारांना महामारीच्या काळात कामावरून काढून टाकू नका, असे आवाहन केले होते. कारण या कामगारांमुळेच आपला उत्कर्ष झालेला असतो मात्र सध्या आलेल्या संकटावर कामगार कपात हा इलाज नाही त्यांना सांभाळून घेतले पाहिजे, असे रतन टाटा म्हणाले होते. मात्र आता टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 400 कर्मचार्यांना बळजबरीने सुट्टीवर पाठवले असून त्यांचे वेतन वर्षाअखेरी पर्यंत थांबविले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत या निर्णयाविरोधात NITES (National Information Technology Employees Senate) या ना-नफा कर्मचारी संघटनेने पुणे कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात असे नमूद करण्यात आले काही, पुण्यातील टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने अचानक कर्मचार्यांच्या तुकडीला बळजबरीने सुट्टीवर पाठवले आहे. तर डिसेंबर 2020 पर्यंत पगाराशिवाय सुट्टी लागू करून त्यांचे वेतन थांबविले आहे.
याबाबत NITESचे सरचिटणीस हरप्रीत सालुजा म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीच्या कर्मचार्यांकडून आम्हाला तक्रारी आल्या आहेत की कंपनीने 400 हून अधिक कर्मचाऱ्यांंना सुट्टीवर पाठवले आहे. तसेच कर्मचार्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत विना पगारावर रजेवर पाठवले आहे. यामुळे आता 400 हून अधिक कर्मचार्यांच्या पगार आणि नोकर्या धोक्यात आल्या आहेत.
कंपनीने 31 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्देश, नियम व नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे लॉकडाऊन काळात कर्मचार्यांवर प्रचंड दबाव व आघात होत आहे. तसेच या काळात नवीन रोजगार मिळणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो की, कर्मचार्यांना लॉकडाऊन अंतर्गत राजीनामा देण्यास भाग पाडणे हे सरकारच्या निर्देशांच्या आणि कामाच्या नैतिकतेच्या विरोधात आहे. यावर लवकरच काहीतरी मार्ग काढावा, असे सालुजा म्हणाले.
कामगारांबाबत काय म्हणाले होते रतन टाटा ?
कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.
जेव्हा देशात विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा हजारो लोकांना काढून टाकण्यात आले. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल का? मला नाही वाटत की असे होईल, कारण तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले आहे, अशात लोकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते, असंही रतन टाटा म्हणाले. युअर स्टोरीला मुलाखत देताना त्यांनी कामगारांच्या विषयावर भाष्य केले.