तुम्ही देखील अनुभवा ! श्रद्धा आणि विज्ञानाचा मिलाफ घडवून आणणार श्रावण महिना

Feel it too! Shravan month will unite faith and science

0

हिंदू ऋतूचक्रानुसार भारतात आता श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. सगळीकडेच नाही म्हंटल तरी थोड भक्तीमय आणि सात्विक वातावरण निर्माण झालं आहे. श्रद्धेनुसार अनेकजण या महिन्यात कडक उपवास करतात. खासकरून भगवान शंकराची या महिन्यात जास्त पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विवाहित महिलांसाठी देखील या महिन्याचे विशेष महत्व आहे. याच महिन्यात अनेकजण मांस खाणे वर्ज करतात. तर सात्विक आणि शाकाहारी आहार घेतात. त्यामुळे इतर महिन्यांच्या तुलनेने श्रावण महिन्याला का एवढे महत्व लाभले आहे ? असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडत असावा. तर याच प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून करणार आहोत.

श्रावण महिन्यात भक्तिमय वातावरण का असते ?

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिना हा इतर महिन्यांच्या तुलनेने पवित्र मानला जातो. आषाढातल्या पावसाने सर्वत्र नवनिर्मिती झालेली असते. वर्षभर लागणारी जलाशय भरलेली असतात आणि शेतीवाडी बऱ्यापैकी बहरलेली असते. शेतीची कामं थोडीशी हातावेगळी झालेली असतात. त्यामुळे हा काळ उसंतिचा असतो. हा मिळालेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी काहीजण देवाच्या भक्तीत तल्लीन होतात. जो तो आपआपल्या श्रद्धेने आपल्या आवडत्या देवाची पूजा अर्चना करतो. तसेच खासकरून श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काहीजण संपूर्ण महिनाभर उपवास करतात. काही जण खास करून सोमवार पाळतात. त्यामुळे नाही म्हंटल तरी हे करण्या मागे खरे कारण हे मानसिक समाधान असते. त्यामुळे याच महिन्यात अनेकजण व्रत वैकल्ये करताना दिसतात.

श्रावणातील सोमवारच्या उपवासाचे विशेष महत्व

सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे.

…म्हणून कुमारिका करतात श्रावणात उपवास

पुराणात सांगितल्या प्रमाणे देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

विज्ञानानुसार उपवास का धरावा ?

आपल्या नित्याच्या जीवनात निरनिराळ्या व्रतोत्सवांच्या निमित्याने निरनिराळे उपवास केले जातात. उपवास हे अनेकवेळा व्यक्तिगत पातळीवर आणि काहीवेळा सामजिक पातळीवरही केले जातात. उपवास हे एक साधे आणि सर्वसामान्याना करता येण्यासारखे व्रत आहे. उपवासचा सर्व् सामान्य अर्थ म्हणजे काही काळ अन्न , पाणी वर्ज्य करून राहणे होय. आरोग्याच्या दृष्टीने उपवास म्हणजे लंघन होय.

सर्सामान्यपणे उपवासाचा अर्थ मित आहार घेणे असाच करतात. आठवड्यातील इतर दिवशी आपण शारीरिक वेळेनुसार अन्नग्रहण करत असतो. त्यामुळे आठवड्यातील एखदा दिवस हा पचनसंस्थेच्या विश्रांतीसाठी असावा. ज्यामुळे शरीरातील न पचलेला भाग या उपवासा दिवशी पचवला जातो. ज्यामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. तसे पाहिला गेले तर हा उपवास म्हणजे शरीराला आणि पचनसंस्थेला विश्रांती.

श्रावणातील उपवासा मागचे हे देखील एक कारण आहे. श्रावणात उन पावसाचा खेळ सुरु असतो. त्यामुळे नाही म्हंटल तरी वातावरणात काहीशी अशुद्धता आणि विषाणूंचे प्रमाण अधिक असते. या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच या काळात शारीरिक कष्ट कमी झाले असल्याने पचनक्रिया देखील मंदावलेली असते. त्यामुळे श्रावणात शक्यतो हलका आहार घेतला जातो. नाहीतर आठवड्यातला एखदा दिवस उपवास केला जातो. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहावे, हा त्यामागचा हेतू असतो. हे उपवास करतानाचं काहीजण देवाची भक्ती देखील करतात. त्यामुळेच परंपरेनुसार या उपवासाला भक्तीची देखील जोड मिळाली आहे.

हलका आहार

शरीर प्रकृतिनुसार द्रव्योपवास ( दूध, ताक, सरबत) करावा किंवा फळे, भाजलेले पदार्थ- लाह्या, सातूचे पीठ, थोडे दाणे-गुळ, राजगिरा, कंदमुळे असा हलका आहार घ्यावा, असे शास्त्र सांगते. या महिन्यात अनेकजण उपवास करतात. मात्र उपवास करताना उपासमार होऊ नये याची देखील दक्षता घ्यावी लागते. अन्यथा या उपवासाचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे उपवास म्हणजे हलका आहार आणि पोटाला विश्रांती हे सुत्र ध्यानात ठेवावे. या दिवशी मित आहारा घेतला जातो. तर काहींचा उपास नसला तरी या महिन्यात हलकाच आहार ग्रहण करतात. याकाळात फलाहार हा उत्तम आहार असल्याचे अनेकजण सुचवतात.

मांसाहारला तर सुट्टीचं !

श्रावण सुरु होणार म्हंटल की अनेकजण मांसाहारला सुट्टी देतात. या मागे देखील काही धार्मिक आणि वैज्ञानिक कारणंं आहेत. धार्मिक करणानुसार या महिन्यात अनेक सण असल्याने हा महिना गोड पदार्थ खाण्याचा आहे. तसेच घरा घरात पूजा अर्चना होत असल्याने मांस शिजवणे टाळले जाते.

निसर्गशास्त्रानुसार या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असतो. ढगांनी आच्छादलेल्या आभाळामुळे पृथ्वीवर सूर्यकिरणांचा अभाव असतो. त्यामुळे वातावरणात नाही अनेक विषाणूंचा वावर असतो. या विषाणूंंचा संसर्ग प्राण्यांना लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. तसेच मानवाच्या पचन संस्थेवरही याचा परिणाम होतो. म्हणून अशा दिवसात शक्यतो हलके अन्न म्हणजेच शाकाहार घेतला जातो. तसेच हा काळ प्राणी मात्रांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो. त्यामुळे देखील श्रावणात मांंस खाणे टाळतात.

ब्रम्हचार्य पाळणे

श्रावणात काहीजण ब्रम्हचार्य पाळतात. शरीर सुख घेणे काहीजण टाळतात. कारण शरीर सुख हे तुमचे मन हे पूजा अर्चनेपासून भरकटवू शकते यासाठी अनेकजण हे या दिवसात ब्रम्हचार्य पाळतात. तर एक बाजू अशी ही आहे की, हा काळ महिलांच्या गर्भधरणेसाठी उत्तम काळ असतो. मात्र याच महिन्यात महिला अनेक उपवास करत असल्याने त्यांच्या शरीरात कमजोरीपणाही जाणवतो. त्यामुळे या काळात ब्रम्हचार्य पाळणे काहीजण योग्य समजतात.

श्रद्धा आणि विज्ञानाचा मिलाफ

तसे पाहिला गेले तर काही रूढी परंपरा या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. त्या मागील शास्त्र जाणून घेण्यापेक्षा अनेकजण त्या मागील श्रद्धा लवकर आत्मसात करतात. त्यामुळे काही काळानंतर या श्रद्धेचे अंधश्रद्धेत रुपांतर होते. मात्र याच श्रद्धेला विज्ञानाची जोड मिळाली तर शास्त्रोक्त श्रद्धा मात्र चिरंतर टिकते. श्रावण महिन्याच्या बाबतीत तसेच आहे. या महिन्यात केल्या जाणाऱ्या काही गोष्टी या श्रद्धे पोटी केल्या जातात तर काही गोष्टी या वैज्ञानिक कारणांमुळे. त्यामुळे हा महिना विज्ञान आणि श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ घडवून आणतो, असे म्हणावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.