पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 साली, गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात झाला. प्रत्येक घरामध्ये चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, संगीत यापैकी कोणत्यातरी एका कलेची उपासना आणि जोपासना होताना दिसते. गोवा किंवा गोमंतक प्रदेश निसर्गा बरोबरच संगीत कलेसाठीही प्रसिद्ध आहे. इथला माणूस जन्मताच स्वर आणि लय आपल्या बरोबर घेऊन येतात असं मानलं जातं. त्याला जितेंद्र अभिषेकी हे अपवाद कसे असणार?
जितेंद्र यांना घरात लहानपणी गंपू म्हणायचे. गंपूचे वडील भिकाजी, त्यांना बाळूबुवा म्हणत. बाळूबुवा स्वतः कीर्तनकार होते. अतिशय देखणं व्यक्तिमत्व… डोक्यावर पगडी, कमरेला उपरणं बांधलेलं शुभ्र धोतर, कुर्ता, कपाळावर उभं गंध, हातात चिपळ्या आणि साथीला गंपू… एक आदर्श कीर्तनकार म्हणून दत्तो वामन पोतदारांनी बाळूबुवांना सुवर्णपदक दिलं होतं. संगीताला व्यावसायिक दृष्टीने त्या काळात मान्यता नव्हती. संगीतातले सगळे छंदीफंदी असतात अशी एक प्रतिमा त्या काळात होती. आपल्या घराण्यात गाण्याकडं वळणारा मुलगा असावा ही इच्छा बाळूबुवांच्या मनात होती.
अगदी लहानपणापासून गंपूचे उर्फ जितेंद्रचे कान संगीताच्या सुरांकडं टवकारायचे. संगीत ऐकलं की तो रडणं थांबवायचा. संगीताचा वारसा लाभलेला जितेंद्र हळूहळू मोठा होत होता. संगीतातले स्वर आणि तबल्याचे बोल हेच त्याचे सवंगडी बनले. जितेंद्र अभिषेकींचे वडील कीर्तनकार जरी असले तरी फक्त कीर्तनांपुरतच त्यांचं संगीताचं ज्ञान नव्हतं. त्यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास होता. गोव्याच्या शंकरबुवा गोखले यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली होती. आणि तो वारसा जितेंद्र अभिषेकींना वडिलांकडून मिळाला. वयाच्या 13-14 वर्षापर्यंत त्यांना वडिलांकडून तालीम मिळाली.
लहानपणी शाळेत असताना ते स्वतः नाटकात काम करायचे. जितेंद्र अभिषेकी हे प्रथम गिरिजाबाई केळेकरांकडं संगीत शिकण्यासाठी जायचे. पण तिथं त्यांचं मन रमलं नाही, त्यांना अजून उच्च संगीत शिकायचं होत. संगीताच्या तीव्र ओढीमुळं ते पुण्याला आले. पुण्यात ते कमीतकमी तीन गुरुंकडे ते संगीत शिकले. गोविंदराव देसाई यांच्याकडे ते सुरुवातीला शिकले.1949 साली पंडितजी एस. एस. सी. झाले. त्यानंतर पुण्यातल्या नरहरबुवा पाटणकर यांच्याकडे वर्षभर संगीत शिकले. पुण्यातल्या वास्तव्यानंतर पंडितजी बेळगावला गेले. तिथं राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये ते शिकत होते. 1952-53 सालची गोष्ट असावी असं पु. ल. देशपांडे यांनी एका ठिकाणी सांगितली, ज्यावेळी ते बेळगावात प्राध्यापकी करत होते तेव्हा त्यांना पंडितजींचं गाणं ऐकण्याचा योग आला आणि ते म्हणाले, ” कुणीतरी उद्याचा ‘ बुवा ‘ आज तरुण वयात गात आहे ” इतकं ते गायन परिपूर्ण असं त्यांना वाटायचं.
पंडितजी पुढे गाणं शिकण्यासाठी मुंबईला आले. मास्टर नवरंग यांच्याकडे ते गाणं शिकत होते. त्या काळात त्यांनी मुंबई आकाशवाणीवर कोकणी विभागात काम केलं. तिथं पु. लं. शी ओळख वाढली. आकाशवाणीवर काम करताना बातम्या, त्याचं भाषांतर करणं, गाण्यांना चाली देणं, नाटक बसवणं, डबिंग करण, गीताचं गायन करणं ही सगळी कामं करावी लागायची. याचा फायदा असा झाला की त्यामुळं चौफेर शिकायला मिळालं. पंडितजींनी जवळपास नऊ वर्ष आकाशवाणीवर नोकरी केल्यानं त्यांची दृष्टी व्यापक झाली. पंडितजींनी अनेक नाट्यपदांना चाली दिल्या. त्यामध्ये ‘कट्यार काळजात घुसली ‘ व ‘अमृत मोहिनी ‘ हे विशेष सांगता येतील. ‘ घेई छंद मकरंद ‘ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली, तर दिग्दर्शन ही ईश्वरी देणगीच आहे हे ‘ सर्वात्मका सर्वेश्वरा ‘ या पदावरुन प्रत्ययाला येते. हे पद म्हणजे नाट्यसंगीतातलं पसायदान आहे. ‘ काटा रुते कुणाला ‘, ‘ हे सुरांनो चंद्र व्हा ‘या व अशा अनेक रचना त्यांनी केल्या.
पंडित अभिषेकी हे शरीर रूपाने आज नाही पण त्यांच्या सांगीतिक कार्यामुळं आपल्यात राहून ते अजरामर झाले. त्यांनी निर्मिलेल्या स्वर अमृताचा अभिषेक रसिकजनांवर अखंडपणे होतोय. एक आदर्श गुरु, आदर्श शिष्य, संगीत दिग्दर्शक, थोर विचारवंत आणि माणूस म्हणूनही थोर !!! मन मोहवणारं भावसंगीत, जुन्या सुरांना नवा साज देऊन जिवंत केलेली नाट्यसंगीतातली परंपरा हे सगळं हातचं राखून न ठेवता मुक्तहस्ताने वाटणारे गुरु त्यांच्या शिष्यांचे आज जीवन गाणे बनले आहे. आणि अशीच चुटपुट लावून पंडितजी 7 नोव्हेंबर 1998 रोजी हा इहलोक आणि संगीताचा न संपणारा खजिना देऊन आपल्यातून शरीर रूपाने गेले.
– कोमल पाटील