गटारी म्हंटली की अनेकांना आठवतो तो मटणाचा किंवा माश्याचा रस्सा आणि चुलीवरची बाजरीची किंवा तांदळाची कडक भाकरी. तर तळीरामांना आठवते मद्य, त्याबरोबर सोडा आणि मसाला काजू. तुम्ही म्हणाल हे चित्र इतर वेळी देखील पाहिला मिळते यात नवीन काय ? हो यात नवीनचं आहे ! कारण आपल्या संस्कृतीने आणि पुराणात सांगितलेल्या काही तत्वांना आपण अशा पद्धतीने फाटा देत काही पवित्र दिवसांचे महत्व पुसून टाकले आहे. गटारी म्हणजे केवळ मद्य पियुन धुंद होणे किंवा मटण खाऊन सुस्त होणे असे नाही.
नेमकं गटारी अमावस्या म्हणजे काय ?
खरंं तर गटारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या होय. “ तमसो मा ज्योतिर्गमय ”, असा संदेश देणारी ही अमावस्या असून मंगलमय अशी मानली जाते. हा दिवस ‘ दिव्यांची अमावास्या’ म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात या दिवसाचं पावित्र्य नष्ट होऊन त्याला विदारक रंग चढवण्यात आला आहे.
शास्त्रानुसार या दिवशी दीपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर म्हणजे घाटावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दूधा-तुपा सोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी जिवती पूजनही करतात.
का केली जाते दिव्यांची पूजा ?
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात वावरताना केवळ दिव्यांचाच आधार असायचा त्यामुळे अंधारातही तेजस्वी प्रकाश देणाऱ्या दिव्यांना दैवत किंवा एक नैसर्गिक शक्ती मानून शास्त्रानुसार या सूर्यदूतांची पूजा केली जाते. मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी यथासांग पूजा केली जाते.
कशी असते पुजा ?
आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं. मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून, गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे. गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून ‘दिव्याची कहाणी’ वाचून ह्या पूजेची सांगता होत असे. या दिवशी गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्याला विशेष मान असे. हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जातात. यादिवशी एक राजा आणि त्याच्या सुनेची ‘साता उत्तरी सुफळ संपूर्ण’ कहाणीही वाचली जाते.
पावित्र्य संपले आणि अपावित्र्य सुरु
गेल्या काही वर्षांत आपण मात्र या अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे तिला रूप देऊन टाकले आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो, त्यामुळे मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच वसूल करून घेण्याकडे आपला कल असतो.
का करतात मांसाहार ?
श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. श्रावण महिन्यात अनेक छोटे छोटे सण असल्याने हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात शक्यतो अनेकजण अभक्ष भक्षण टाळतात. त्यामुळे हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. त्यामुळे खाण्याचा शेवटचा दिवस म्हणून या दिवशी अनेकजण मांसाहार करतात.
श्रावणात मांस खाणे का टाळावे ?
मांस खाणे गैर नसले तरी श्रावणात मात्र अनेकजण मांसाहार टाळतात. कारण निसर्गशास्त्रानुसार या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असतो. ढगांनी आच्छादलेल्या आभाळामुळे पृथ्वीवर सूर्यकिरणांचा अभाव असतो. त्यामुळे वातावरणात नाही अनेक विषाणूंचा वावर असतो. या विषाणूंंचा संसर्ग प्राण्यांना लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. तसेच मानवाच्या पचन संस्थेवरही याचा परिणाम होतो. म्हणून अशा दिवसात शक्यतो हलके अन्न म्हणजेच शाकाहार घेतला जातो. तसेच हा काळ प्राणी मात्रांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो. त्यामुळे देखील श्रावणात मास खाणे टाळतात.