fbpx
6.1 C
London
Monday, February 6, 2023

#Mumbai भाग 3 : देशात अव्वल असणाऱ्या मुंबईचे ब्रिटिशांनी आणि नंतर भारत सरकारने असे केले आधुनिकीकरण…

आत्तापर्यंत आपण मुंबई मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर मुंबई कशापद्धतीने जोडली गेली हे आपण मागील लेखात वाचलं. आज आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर मुंबईचं चित्र कसं बदललं , औद्योगिकीकरणाला कसा वेग आला, मुंबई कशी विकसनशील बनत गेली हे आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

मुंबईच्या वस्त्यांचा विस्तार वाढला तरी कसा?

मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात जी वस्ती निर्माण झाली तिचे विभाग स्वाभाविकपणे पडलेले दिसतात. परळ आणि सायन येथे कुणबी राहत असे. वरळी, माजगाव ,परळ हा भाग म्हणजे त्या वेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू व साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती.

१६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनिया वर्ग स्थायिक झाला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली असे दिसून येते.१६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची सत्ता साष्टी येथे होती,आणि त्यामुळे ही वस्ती वाढत गेली.

जीरोल्ड ओन्गीयर हे त्यावेळी मुंबईचे स्वास्थ्यप्रिय गव्हर्नर होते.  मुंबईची वस्ती वाढावी व स्थिर व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा कल चांगले आरोग्य असलेले आणि शांतता प्रिय नागरिक व व्यापारी वर्गाने येथे यावे अगर अशांना स्वास्थ्य मिळावे या हेतूने न्याय व्यवस्था त्याने उत्तम केली. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संरक्षण खाते वाढवले. त्यामुळे मुंबईचं चक्र हे सुरळीत सुरू झालं.

इंग्रजांच्या ताब्यात जेंव्हा मुंबई आली त्यावेळी मुंबईची लोकसंख्या केवळ दहा हजारांपर्यंत होती. १८७५ मध्ये ती सुमारे ६० हजारांवर गेली. यामध्ये एतद्देशीय पळशी, ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर,भोई व आगरी जमातीची मंडळी होती.
मुंबईमध्ये ज्या कापडाच्या सुताच्या गिरण्या निघाल्या त्यामुळे मुंबईच्या लोकसंख्यात झपाट्याने वाढ होत गेली.
श्री कावसजी नानाभाई दावर यांनी १८५४ च्या फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे स्पिनिंग अॅंड व्हीव्हिंग कंपनी व पायोनियर स्पिनिंग फॅक्टरी येथे निघाली तेंव्हापासून मुंबईच्या लोकसंख्येत सतत वाढ होऊन ती १९२१ ते १९३१ च्या दरम्यान सुमारे ११ लाखांचे वर गेली.

mumbai (1)

आता मुंबईचं आधुनिकीकरण कसं झालं हे आपण जाणून घेऊयात.

१८३० च्या काळात निसर्ग सौन्दर्याने नटलेले केवळ अडीच लाख लोकवस्तीचे टुमदार मुंबई शहर साडेचार चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. किल्ल्याच्या तटबंदिबाहेर एक हजार यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती. त्यावेळी जे काही घडत असे ते या बंदिस्त किल्ल्यातच. पण १८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण परळला हलवण्याचे ठरवले.

याआधी मुंबई शहराचा संपूर्ण कारभार मुंबईचा गव्हर्नर हा जवळपास ७० वर्ष अपोलो स्ट्रीट वर राहून पाहत असे. त्यानंतर गव्हर्नर परळ ला गेल्यानंतर त्याचा पाठोपाठ अनेक श्रीमंत लोकं ही माजगाव, परळ, मलबार हिल आणि भायखळ्याला जाऊन राहू लागले. मुंबई मधील ग्रँट रोड हा १८३९ साली बांधला गेला. या रस्त्याचे नाव गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ ग्रँट रोड ठेवण्यात आले. इ.स. १८३८ मध्ये ह्याच्याच आदेशावरून कुलाबा येथे एक कॉजवे बांधण्यात आला. त्यामुळे मुंबईहून कुलाब्याला जा ये करताना खाडीत उतरून जीव धोक्यात घालण्याचा धोका टळला.

इ.स. १८३५ मध्ये पहिल्यांदाच प्यायचा सोडा मुंबईमध्ये मिळू लागला. एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी सन १८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ज्यावेळी ब्रिटिश भारतात आले तेंव्हा इथे बऱ्याच नवणीन सुधारणा , उद्योग संस्था , नवनवीन तांत्रिक गोष्टी वअनेक उपकरणं ही भारतामध्ये त्यांनी सुरू केले.

mumbai 2

आगगाडी भारतात कशी सुरू झाली हे आपण जाणून घेऊया.

आशिया खंडातली पहिली आगगाडी बोरीबंदर स्टेशनातून धुराच्या रेषा सोडत१६ एप्रिल १८५३ रोजी दिमाखदार पणे ठाण्याकडे रवाना झाली. बोरीबंदर ते ठाणे हा चोवीस मैलांचा लोहमार्ग तयार करण्यासाठी ग्रेट इंडियन पेनिन्शुला या कंपनीने दहा हजार पौंड खर्च केले आणि हा महामार्ग तयार केला. इंग्रज इंजिनियर जेम्स बर्कले याला ह्या कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केला गेला होता.

mumbai 3 (1)

व्हिक्टोरिया टर्मिनस ( व्ही. टी. )

१९ व्या शतकामधल्या अखेरच्या ३० वर्षांत मुंबई मध्ये वेगवेगळ्या मनमोहक इमारतींची भर पडली. त्यामध्ये उत्कृष्ट असं वास्तुशिल्प म्हणजे बोरीबंदर होय. या इमारतीमध्ये असलेल्या शिल्परेखनाचे काम हे एफ. डब्ल्यू स्टीव्हन्सन याने केले.ही इमारत म्हणजे इटालियन वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.  व्हिक्टोरिया राणीच्या गौरवार्थ या इमारतीला २० जून १८८५ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव देण्यात आले.

मुंबईत घोड्यांच्या पहिल्या ट्रामची एन्ट्री…

मुंबईमध्ये घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्याला कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर अशा दरात हा प्रवास सुरू झाला.  घोड्याची ट्राम सुरु होण्यापूर्वी मुंबईत मुख्य वाहतुकीचे साधन म्हणजे मेणे व छकडे होते. घोड्याने चालवलेला टांगा हे वाहन १८८० मध्ये मुंबईत प्रथम आले. मुंबईकर याला टांगा म्हणण्यापेक्षा ‘व्हिक्टोरिया’ हे भारदस्त इंग्रजी नावं देत असे.

मुंबईत ट्राम ही प्रथम मुंबईच्या व्यापारी विभागामध्ये सुरु केली गेली. कुलाबा क्रॉफर्ड मार्केट, पायधुणी आणि बोरीबंदर, काळबादेवी आणि पायधुणी अशा २ मार्गांवरून ट्राम सुरु झाली.  १९०७ साली ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कलपर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्राम चे शेवटचे ठिकाण दादर चे खोदादाद सर्कल होते. म्हणूनच ट्राम संपुष्टात येऊन इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही कानावर पडते.

mumbai best

७ मे १९०७ रोजी सुरु झालेली विजेवर चालणारी ट्राम तारीख ३१ मार्च १९६४ पासून बंद करण्यात आली आणि जलद वाहतुकीसाठी बस गाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले. बस वाहतूक १५ जुलै १९२६ पासून सुरु झाली होती. पहिली बस कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर सुरु झाली.

फक्त १० मिनिटे हे अंतर पार करायला बसला लागत असे. तोपर्यंत मुंबईत टॅक्सी सुरू झाली होती. १९३७ साली दुमजली बसगाड्या सुरु झाल्या.  मुंबईची सर भारतातील एकाही शहराला नाही हा लौकिक मुंबईला मिळवून देण्यात मुंबईच्या रेल्वे प्रमाणे बस वाहतुकीचाही मोठा वाटा आहे.

मुंबईत उपनगरांचा उदय झाला.. 

मुंबईमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बी.आय.टी.ने (बॉम्बे सिटी इम्रूव्हमेट ट्रस्ट) चाळी बांधण्यास सुरुवात केली आणि मुंबईकरांच्या जीवनात एका चाळीच्या संस्कृतीने जन्म घेतला.
सन १९२० मध्ये महार लोकांसाठी पहिली चाळ भायखळ्याच्या क्लार्क रोडवर बांधली गेली.

बी.आय.टी.ने बांधलेल्या ह्या खोल्या चांगल्या हवेशीर व सिमेंट कॉंक्रीटच्या असत. मासिक भाडे ५ रुपयांच्या वर जाणार नाही अशा बेताने आकारले जाई. सन १९२४ साली १६५४४ बिऱ्हाडांची सोय करणाऱ्या २०७ चाळी बांधल्या गेल्या. त्यानंतर साल सेटे बेटामध्ये उपनगरे वसवण्याची भव्य योजना या विकास मंडळाने आखली. त्यावेळी जी उपनगरे तयार झाली त्यात तुर्भे , दांडा, खार , चॅपल रोड , वांद्रे आणि सहार ही उपनगरे होती.

mumbai taxi

मुंबईतल्या पश्चिम विभागातल्या इतर उपनगरांचा विकास हा या मंडळाकडे न सोपवता त्यासाठी एक निराळे मंडळ स्थापन केले गेले.  त्याचे नावं ‘बॉम्बे टाऊन प्लॅनिंग स्कीम’ असे होते. या योजनेसाठी लागणारा पैसा मालकांनीच उभा केला. यात वांद्रे ते बोरीवली या भागासाठी आखलेल्या एकंदर सत्तावीस योजनांपैकी एकोणीस योजना पुऱ्या झाल्या. यातील ५ योजना वांद्रे व सांताक्रूझ येथे, ६ विलेपार्ले व ५ अंधेरी येथे झाल्या. १९३० साली वांद्रे, खार, सांताक्रूझ, चेंबूर येथे काही छोटेखानी गावेही तयार करण्यात आली.

मुंबईच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या गेल्या ३० वर्षांत बाहेरून आलेल्या लोकांनी वाढवली आहे. या सर्वाना औद्योगिकीकरणामुळे नोकऱ्या उपलब्ध झाल्या.

१९५० नंतर लोकसंख्या फोफावली तसा मुंबईचा विस्तार आणि व्याप अफाट वाढला , भारत कुमार राऊत यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे दुख: एकाच गोष्टीचे वाटते की या मुंबईने करोडोना भरभरून दिले आहे, तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेण्यास मात्र कोणी पुढे येत नाही. कारण या शहराला सर्वानीच केवळ आश्रय स्थान मानलं. ते माझ घर आहे असं मानणारे फारस कोणीच नाही . शहराच्या वेगाने होण्याऱ्या -हासाच हेच तर मूळ कारण आहे.

आत्ताच्या काळात मुंबईचं स्वरूप हे फार बदलल्याच दिसतंय. संस्कृती बदलली की या साऱ्या गोष्टी होतातच. मुंबई सारख्या शहराचा अभिमान महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आहे आणि तो कायम तसाच राहणार यात मात्र किंचितही शंका नाही….

-सिद्धेश ताकवले

हे पण वाचा

#Mumbai भाग 2 : ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर अशी जोडण्यात आली मुंबईची 7 बेटंं

#Mumbai भाग 1 : …अशी आली मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात,पुढे काय झाले हे तुम्हीचं वाचा !

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here