क्रेडिट कार्डने व्यवहार करताना…

ऑनलाइन बँकिंग आणि ऑनलाइन शॉपिंगमुळे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. अशावेळी क्रेडिट कार्डाचा वापर नेमका कुठे आणि कसा करावा याची माहिती प्रत्येक कार्डधारकाला असणं गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

0

ऑनलाइन बँकिंग आणि ऑनलाइन शॉपिंगमुळे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. अशावेळी क्रेडिट कार्डाचा वापर नेमका कुठे आणि कसा करावा याची माहिती प्रत्येक कार्डधारकाला असणं गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

सरासरी भारतीयांमध्ये क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर परतफेडीच्या रकमेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ताज्या माहितीनुसार मे २०१६ पर्यंत क्रेडिट कार्डाची थकबाकी सुमारे ४२,१०० कोटी रुपये इतकी होती. हीच रक्कम २००८ मध्ये आर्थिक मंदी असतानाही केवळ २८,००० कोटी रु. इतकी होती. अर्थात, तेव्हापासून आतापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ऑनलाइन बँकिंग आणि ऑनलाइन शॉपिंग आल्याने खरेदी करताना क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. क्रेडिट कार्डाची थकबाकी वाढणं ही चांगली बाब नाही. ती जितकी वाढेल तितकं तुमचं बजेट कोलमडण्याची शक्यता वाढते.

क्रेडिट कार्डवरची देय रक्कम वाढत असेल तर कार्ड वापरून नवीन व्यवहार करण टाळावं. तसंच परडफेडीचा ‘अॅक्शन प्लॅन’ बनवून १ ते ३ महिन्यांत सर्व पैसे परत करावेत. यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर कुठे आणि कसा करावा याची माहिती प्रत्येक कार्डधारकाला असणं गरजेचं आहे. म्हणून क्रेडिट कार्ड घेताना आणि क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

योग्य तारखेला संपूर्ण रक्कम भरा : दर महिन्याला क्रेडिट कार्डाच्या बिलाच्या एकूण रकमेच्या केवळ ५ टक्के रक्कम भरणं अनिर्वाय असतं. त्यामुळे उरलेली रक्कम नंतर दिली तरी चालेल असा विचार न करता योग्य तारखेला (ड्यू डेट) संपूर्ण रक्कम देण्यावर कार्डधारकांनी भर द्यायला हवा. पुढील बिलिंग सायकलमध्ये उरलेल्या रकमेची सारखी भर पडत गेल्यास महिन्याला ३ ते ४ टक्के दराने व्याज भरावं लागेल. तसंच कार्डाची देय रक्कम वाढली असताना नवीन कार्डावर व्यवहार केल्यास त्याचा अतिरिक्त आर्थिक ताण पडू शकतो.

कार्डाचा मर्यादित वापर : कोणत्याही क्रेडिट कार्डावर खरेदी केल्यास ४५ दिवसांपर्यंतचा कालावधी हा बिनव्याजी म्हणजेच ‘इंटरेस्ट-फ्री पीरियड’ असतो. थोडक्यात, खरेदी केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत खरेदीची रक्कम कोणत्याही अतिरिक्त रकमेविना (व्याज, पेनल्टी) देता येते. परंतु यासाठी थकबाकी शून्य असणं आवश्यक आहे. अनेकांकडे एकपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत. अशांना ठराविक कार्डच तेही मर्यादित स्वरूपात वापरण्याचं सांगितलं जातं. क्रेडिट लिमिटच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम कार्डावर शक्यतो खर्च करू नये असा सल्ला दिला जातो.

कर्ज घेताना आर्थिक पतीचा आढावा घेतला जातो. त्यात क्रेडिट कार्डावर केलेले व्यवहारदेखील पाहिले जातात. त्यामुळे आपली आर्थिक पत चांगली रहावी आणि ‘इंटरेस्ट-फ्री’ कालावधीचा लाभ घेता यावा यासाठी क्रेडिट कार्ड मर्यादित स्वरूपात वापरणं आवश्यक आहे.

रोख रक्क्म काढणं टाळावं : इंटरेस्ट-फ्री कालावधी रोख रक्कमेवर मिळत नसल्यामुळे क्रेडिट कार्डावर रोख रक्कम काढणं शक्यतो टाळावं.

ईएमआयचा पर्याय चांगला : बिलाची रक्कम एकरकमी भरणं शक्य नसेल तर ईएमआयचा पर्याय निवडावा. सर्वसाधारणपणे क्रेडिट कार्डावरच्या देय रकमेवर लागणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत ईएमआयवरचा व्याजदर कमी असल्यामुळे परतफेडीसाठी हा चांगला पर्याय ठरतो. याशिवाय दोन क्रेडिट कार्ड असल्यास दुसऱ्या कार्डावर हा ईएमआय ट्रान्फरही करता येतो.

रिवार्ड पॉइण्टचा योग्य वापर करा : क्रेडिट कार्डाच्या प्रकारानुसार (गोल्ड, प्लॅटिनम आदी) कार्डधारकाला प्रत्येक खरेदीवर रिवार्ड पॉइण्टस मिळतात. उदा. दर शंभर रुपयाच्या खरेदीमागे १ रिवार्ड पॉइण्ट. या हिशेबानुसार जेवढी मोठी खरेदी तेवढे जास्त रिवार्ड पॉइण्टस हे समीकरण कार्डधारकांच्या मनात पक्कं बसतं. त्यामुळे आपल्या क्षमतेचा विचार न करता कार्डावर भरमसाठ खरेदी केली जाते. हे कटाक्षाने टाळावं.

अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या पेट्रोल किंवा बिलाची रक्कम ‘सेटल’ करण्यासाठीदेखील रिवार्ड पॉइण्टसचा वापर करण्याची सुविधा पुरवतात. अशावेळी गिफ्ट्स किंवा वस्तू घेण्यापेक्षा यासाठी रिवार्ड पॉइण्ट्सचा वापरावेत.

ऑटो-डेबिट : क्रेडिट कार्डाच्या बिलाची रक्कम वजा करण्याच्या सूचना बँकेला केल्यास दर महिन्याला नियमितपणे क्रेडिट कार्डाचं बिल न चुकता भरलं जाईल. यात ठराविक रक्कम वजा करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त आपला कुठे खर्च होतो आणि तो कुठे कमी होऊ शकतो याचा अभ्यास करून खर्च करण्याची पद्धत बदलल्यास खर्च आणि कार्डाचा वापर मर्यादित ठेवण्यास मदत होईल. याबरोबरच दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट येतं. त्यात काही तांत्रिक चुका नाहीत याची खात्री करून घ्या. नाहीतर इतरांच्या चुकांचा भुर्दंड भरावा लागेल. तसंच क्रेडिट कार्डाचा वापर शक्यतो स्थानिक देशातच करावा. कारण परदेशात क्रेडिट कार्डावरच्या व्यवहारांवर अनेक शुल्कं लागू शकतात. त्यामुळे अगदी गरज पडली तरच परदेशात क्रेडिट कार्डाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.