७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर अवॉर्ड जाहीर झालेल्या डिसले गुरुजींची कहाणी

0

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूला महत्वपूर्ण स्थान असते. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असला तरी सुरुवातीच्या काळात त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. लहानपणी आपल्यावर आपले आईवडील संस्कार करत असतात तर आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्याला घडवण्याची जबाबदारी ही शिक्षक यशस्वीपणे हाताळतात.

शाळेत शिक्षण घेताना प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत ही वेगळी असते. आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक शिक्षक मोबाईल, लॅपटॉप आणि इतर गोष्टींचा आधार घेत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवत आहेत. तंत्रज्ञानाचा असाच फायदा घेऊन सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

रणजीतसिंह डिसले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला. त्यांनी कवितेसाठी ऑडिओ फॉरमॅट आणि धड्यासाठी व्हिडीओ फॉरमॅटमध्ये डेटा बनवून त्याचा क्यूआर कोड बनवला व तो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिला. हा कोड मोबाईलवरून स्कॅन केल्यावर संबंधित धड्याची किंवा कवितेची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होत आहे.

त्यांच्या हा प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरला. त्यांच्या या उपक्रमाची दखल सरकारने घेत पाठयपुस्तक तयार करणाऱ्या मंडळानेही अशाच फॉरमॅटमध्ये पुस्तके छापण्यास सुरुवात केली आहे. रणजीतसिंह डिसले यांच्या या युक्तीमुळे लाखो विद्यार्थी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन शिक्षण घेत आहेत.

रणजीतसिंह डिसले यांनी क्यूआर कोडच्या संकल्पनेसह अनेक देशांतील शाळांशी संपर्क साधून इंग्रजी भाषेचा वापर करून त्या ठिकाणी कसे शिक्षण सुरु आहे हे आपल्याकडील विद्यार्थ्यांना दाखवले. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. अशा पद्धतीने त्यांनी जगभरातील खूप शाळांशी संपर्क साधला.

रणजीतसिंह डिसले यांच्या या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारात विजेत्या शिक्षकाला ७ कोटी रुपयांची राशी दिली जाते. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची घोषणा केली.

रणजीतसिंह डिसले हे ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार मिळणारे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार पहिल्यांदाच भारतीय शिक्षकाला मिळत असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रणजीतसिंह डिसले यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. डिसले यांनी एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल असं त्यांचं मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.