‘दागिने’ हा असा एक शब्द म्हणा आणि त्यांनतर बघा महिलांच्या चेहऱ्यावर कशी कळी उमलते. दागिने हा स्त्रियांच्या आवडीचा विषय असतो. त्यातल्या त्यात मराठी स्त्रिया तर आपले सौंदर्य हे दागिन्यांनीच खुलवत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बाजारात येत असतात याची तर स्त्रियांना क्रेझ आहेच पण आता एक नवीनच क्रेझ त्यांच्यामध्ये संचारत असल्याचे दिसून येत आहे.
ती क्रेझ म्हणजे मालिकांमध्ये कलाकारांनी घातलेले दागिन्यांची क्रेझ होय. आता स्त्रिया चक्क मालिकांमधील कलाकारांचे दागिने बघून तसे दागिने बनवून घेतात किंवा बाजरातून खरेदी करतात. मालिकांमधील स्त्रियांचे दागिने बघून तसे दागिने आपल्याकडे असावेत यासाठी ते खरेदी करणे आणि बनवणे, हा विषय सध्या मराठी स्त्रियांचा किंवा मुलींचा आवडीचा विषय झालेला आहे. नेहमीच येणाऱ्या नवनवीन मालिकेसोबत स्टायलिंगचे आणि दागिन्यांचे नवीन ट्रेंड रुजू होऊ लागले आहेत.
चला तर मग बघुयात, मराठी मालिकांमधून ट्रेंडिंग आऊट झालेले दागिने….
‘पुढच पाऊल’- लांब मंगळसूत्र
या स्टार प्रवाहवरील मालिकेमधील अभिनेत्री ‘हर्षदा खानविलकर’ म्हणजेच अक्कासाहेबांची भूमिका असेलला लुक हा कायमच मराठी बायकांच्या चर्चेचा विषय होता. नेहमी कोल्हापुरी साज, काठापदराच्या साड्या आणि गजरा अशा लुकमध्ये अक्कासाहेब सर्वांच्या आवडीच्या झाल्या होत्या. त्यांच्या दागिन्यांमध्ये ‘लांबलचक मंगळसूत्र’ हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला. ही स्टाईल प्रेक्षकांच्या आवडीची झाली. अनेकांनी आपल्या दागिन्यांमध्ये लांब मंगळसुत्राचा समावेश केला. लग्नसमारंभात बायका हा दागिना आवर्जून घालताने दिसल्या. आजही हे मोठं मंगळसूत्र ट्रेंडी आहे.
‘जय मल्हार’- बानू नथ
झी मराठी वरील ही मालिका बरीच प्रसिद्ध झाली तसेच या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. या मालिकेमध्ये अभिनेत्री ‘इशा केसकर’ हिने बानूची भूमिका साकारली होती. या भूमिकेच्या लुकमधील बानूची ‘नथ’ ही प्रेक्षकांच्या आवडीचा विषय बनली. अनेक स्त्रियांनी त्यावेळी ही नथ बनवून घेतली होती. तर काहींनी ही नथ बाजारातून विकत घेतली. ही नथ त्यावेळी बरीच प्रसिद्ध झाली होती. नथींच्या प्रकारामध्ये ही नथ आजही ट्रेंडी आहे.
‘होणार सून मी या घरची’- तीन पदरी मंगळसूत्र
झी मराठीवरील या घरगुती मालिकेने सगळ्यांच्याच मनात घर केले होते. ही मालिका त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. अभिनेत्री ‘तेजश्री प्रधान’ने या मालिकेत सुनबाई ‘जान्हवीची’ भूमिका निभावली होती. लाडक्या जान्हवीने या मालिकेत ‘तीन पदरी मंगळसूत्र’ घालून लुक केला होता. तो मंगळसूत्र फार ट्रेंडी झाला. त्यावेळी अनेक नववधुंनी तीन पदरी स्टाईलचे मंगळसूत्र स्वतःसाठी करून घेतले होते.
‘फुल पाखरू’- पानांच्या डिझाईनचे मंगळसूत्र
झी युवावरील ही मालिका म्हणजे एक हलकी फुलकी प्रेमकथा होती. मात्र या मालिकेतील लीड कॅरेक्टर वैदेही हिचे मंगळसूत्र स्त्रियांच्या आवडीचे झाले होते. पानांची डिझाईन असलेल्या या छोट्या मंगळसूत्राची भुरळ त्यावेळी अनेक स्त्रियांना पडली होती.
‘सखी’ – मंगळसूत्र ब्रेसलेट
कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सखी ही मालिका आली होती. मालिका जास्त दिवस राहिली नाही मात्र या मालिकेतून एक खास गोष्ट ट्रेंडमध्ये आली. ती म्हणजे ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’. या मालिकेत एका पात्राच्या हातात दाखवलेले हे ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’ अजूनही ट्रेंडी आहे.
‘तुला पाहते रे’- गुलाबी खड्यांचा सर
झी मराठीवरील या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती. मात्र अभिनेत्री ‘गायत्री दातार’ हिने साकारलेल्या इशाच्या भूमीकेच्या लुक मधील ‘पिंक खड्यांचा छोटा सर’ त्यावेळी फार चर्चेत आला होता. इशाचा एक सिम्पल लुक होता आणि पिंक खड्यांचा सर तिच्या लुकला अजून सुंदर बनवत होता.
‘स्वामीनी’- सोन्याचे कान
सध्या कलर्स मराठीवर सुरु असलेल्या पेशव्यांच्या इतिहासावर आधारित या मालिकेमुळे पेशवाई दागिने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कर्णफुले, बुगड्या चिंचपेटी असे दागिने चर्चेत आले. मात्र या मालिकेमधील एक दागिना विशेष ट्रेंडमध्ये आहे तो म्हणजे ‘ सोन्याचे कान’. संपूर्ण कान कव्हर करणारा हा दागिना पुन्हा एकदा स्त्रिया खरेदी करू लागल्या आहेत.
![swamini]()
‘घाडगे अँड सुन’- एका सोन्याच्या मण्यासोबत छोट काळ मंगळसूत्र
कलर्स मराठीवरील ही मालिका सगळ्यांच्या आवडीची झाली होती. नवीन सुनेच म्हणजे ‘अमृता’चे लुक सर्व नववधुंनी ट्राय करावे असे होते. मात्र अमृताच्या लूक मधील तिचे ‘एका सोन्याच्या मण्यासोबतचे छोटे काळे मंगळसुत्र’ सिम्पल लुकसाठी बरेच चर्चेत राहिले. त्यावेळी नववधुंनी आपल्या लूकसाठी असे मंगळसूत्र बनविले. हे मंगळसूत्र अजूनही खूप ट्रेंडी आहे.