fbpx
3.8 C
London
Sunday, February 5, 2023

58 वर्षांनंतर आला ‘हा’ अद्भूत योग; जाणून घ्या ! यंदाच्या शारदीय नवरात्रीचे कसे असतील कार्यक्रम

कोरोना काळात पुन्हा नवा उत्साह निर्माण करण्यासाठी दुर्गा माता नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे. कोरोनारुपी राक्षसाचा संव्हार करण्यासाठी दुर्गा माता यंदा नक्कीच तयार असेल. भारतीय संस्कृतीत नवरात्राला विशेष महत्त्व आहे. यंदाचा नवरात्र उत्सव हा थोडा खास असणार आहे. कारण यंदा 58 वर्षांनी एक अभूतपूर्व योग जुळून आला आहे. या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी शनी आणि गुरु आपापले स्वामीत्व असलेल्या म्हणजचे अनुक्रमे मकर आणि धनु राशीत विराजमान असतील. हा योग याआधी 1962 मध्ये आला होता.

नवरात्री उत्सवला का आहे विशेष महत्व ?

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीची नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीची नवरात्र असून ते चैत्रीपौर्णिमेपर्यंत असते. आश्विनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. वास्तविक पाहता पितृपक्षानंतर लगेचच घटस्थापना केली जाते.

अधिक महिन्यामुळे नवरात्री उत्सव लांबणीवर

पितृपक्षानंतर लगेचच घटस्थापना केली जाते. मात्र, सन २०२० मध्ये अश्विन महिना अधिक आल्यामुळे सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्र यामध्ये एका महिन्याचे अंतर आले. शारदीय नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अनेक ठिकाणी नवरात्राची तयारी अगदी जोरात सुरू आहे. काही कामे अंतिम टप्प्यात आली आहे.

नवरात्रीची उपासना कशी करतात ?

नवरात्रीची उपासना ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात.

नऊ दिवसांचे काय आहे महत्व ?

नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात; परंतु आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चं असं महत्त्व असतं. नवरात्रोत्सावातला प्रत्येक दिवस हा वेगळी कथा, वेगळेच रूपक व वेगळेच महत्त्व घेऊन आलेला असतो. तो संदर्भ मातेच्या पराक्रमाशी निगडित असतो. यंदाचे नवरात्र केवळ आठ दिवसांचे असेल.

यंदाच्या नवरात्राचे वैशिष्ट्य काय?

यंदाच्या नवरात्रात दुर्गादेवीचे आगमन अश्वारुढ होणार आहे. तर विसर्जनावेळी देवीचे वाहन म्हैस असेल. काही धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्राच्या प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रुपाचे पूजन केले जाते. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकतो. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

​शारदीय नवरात्राचा मुहूर्त

तब्बल 160 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात अधिक महिना येण्याचा योग जुळून आला. अधिक महिन्यानंतर येणाऱ्या निज म्हणजेच सामान्य महिन्यात सर्व सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. त्यानुसार निज अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाईल. शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 रोजीपासून नवरात्रारंभ होणार आहे. याच दिवशी सकाळी 6 वाजून 27 मिनिटे ते 10 वाजून 13 मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. यानंतर सकाळी 11 वाजून 44 मिनिटांपासून ते 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.

कशी कराल नवरात्रीची पूजा ?

नवरात्रीचा सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत. वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावं लागतं. याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात. ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात. वेदिकाय नम: या मंत्राने शेताची पूजा करतात.

त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्यं हळदीच्या पाण्याने भिजवून “सप्तधान्यभ्यो नम:” असं म्हणत पेरतात. नंतर “पर्जन्याय नम:” हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा असतो.

पूर्वी सुवर्णाचा घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, घटावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचं पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात.

देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशी नागवेलीची सात, नऊ किंवा अकरा अशा विषम संख्येमधील पानं घेऊन त्यांची माळ टांगली जाते. अशाप्रकारे नवरात्रीचे पुढील दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात. यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुलं वापरतात, परंतु ते शक्य नसेल तर उपलब्ध फुलांची माळ वाहावी.

दिव्याचे महत्व

नवरात्रीत देवीजवळ अखंड दिवा लावतात. नंदादीप हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे. नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवलं जातं. या अखंड नंदादीपाकडे सर्वांचे लक्ष असतं. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते.

नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी घटस्थापना आणि घटोत्थापणा असे दोन दिवस तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते.

कोणते दिवस विशेष महत्वाचे ?

ललितापंचमी, अष्टमी, खंडेनवमी, घट विसर्जन, हे दिवस महत्वाचे आहेत.  ललितापंचमीच्या या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते.  अश्‍विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात. अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण केल्या जातात.

 अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत: देवीक्षेत्रात चंडीहोम करतात. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात, तसेच देवीसमोर घागरी फुंकणं हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो.  या वेळी देवीची भजनं, गोंधळगीतं, स्तवनं म्हणत महिला घागरी फुंकतात. उत्तररात्रीपर्यंत जागरण करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात.

खंडेनवमी  नवरात्रोत्सवातला नवमी महत्त्वाचा दिवस. नवमीला खंडेनवमी असे म्हणतात. या दिवशी आयुध आणि शस्त्रास्त्रपूजन केलं जातं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये यंत्र, संगणकाचीही पूजा करतात. नवमीच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.

घट विसर्जन आपआपल्या परंपरेप्रमाणे नवमीस किंवा दशमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे. समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. “मात: क्षमस्व” किंवा “अंबा क्षमस्व” म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात. उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत काही ठिकाणी आहे.

​नवरात्रात देवीच्या नऊ रुपांचे पूजन

शारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. दिवस आणि देवीच्या नऊ रुपांच्या पूजनाविषयी जाणून घेऊया…

 • १७ ऑक्टोबर : शैलपुत्री देवीचे पूजन – घटस्थापन
 • १८ ऑक्टोबर : ब्रह्मचारिणी देवीचे पूजन
 • १९ ऑक्टोबर : चंद्रघटा देवीचे पूजन
 • २० ऑक्टोबर : कुष्मांडा देवीचे पूजन
 • २१ ऑक्टोबर : स्कंदमाता देवीचे पूजन
 • २२ ऑक्टोबर : कात्यायणी देवीचे पूजन
 • २३ ऑक्टोबर : कालरात्रि देवीचे पूजन
 • २४ ऑक्टोबर : महागौरी देवीचे पूजन
 • २५ ऑक्टोबर : सिद्धिदात्री देवीचे पूजन

​नवरात्रीचे विशेष नवरंग :  नवरात्रात देवीच्या नऊ रुपांना प्रिय असलेल्या रंगांना विशेष महत्त्व आहे. तसेच  दैनंदिन व्यवहारात सदर रंगांचा समावेश केल्यास शुभ मानले जाते.

 • शैलपुत्री देवी : पिवळा रंग
 • ब्रह्मचारिणी देवी : हिरवा रंग
 • चंद्रघटा देवी : फिकट मातट रंग
 • कुष्मांडा देवी : नारिंगी रंग
 • स्कंदमाता देवी : पांढरा रंग
 • कात्यायणी देवी : लाल रंग
 • कालरात्रि देवी : निळा रंग
 • महागौरी देवी : गुलाबी रंग
 • सिद्धिदात्री देवी : जांभळा रंग (वांगी)

कोणत्या दिवशी काय नैवेद्य दाखवावा?

 • पहिला दिवस : गायीचे शुद्ध तूप अर्पण करावे.
 • दुसरा दिवस : साखर अर्पण करावी.
 • तिसरा दिवस : दूध किंवा खीर अर्पण करावी.
 • चौथा दिवस : मालपुवा अर्पण करावा.
 •  पाचवा दिवस : केळी अर्पण करावी.
 • सहावा दिवस : मधाचा नैवेद्य दाखवावा.
 • सातवा दिवस : गुळ अर्पण करावा.
 • आठवा दिवस : नारळ अर्पण करावा.
 • नववा दिवस : तीळ अर्पण करावेत.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here