‘ओवा’ म्हटले की, सगळ्यात आधी नजरेसमोर येतो ‘पानपुड्याचा डब्बा’. ओवा, बडीशेप, सुपारी इ. पानपुड्याचा डब्बा सजवतात. बडीशेपचे फायदे आजीच्या बटव्यात आम्ही आधीच तुम्हाला सांगितले आहेत. तर आज त्याचाच जोडीदार हिंदीत ‘अजवाईन’ नावाने प्रसिद्ध असलेला ओवा याचेही आरोग्यदायी अनेक फायदे आहेत. बडीशेप सारखेच ओवा खाण्याचे देखील लोकांना व्यसन लागते आणि हे व्यसन शरीरासाठी अधिक उत्तम आहेत.
चला तर जाणून घेऊयात ओवा खाण्याचे आरोग्यदायी फायदे…
भारतात ओव्याचे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. ओवाचे शास्त्रीय नाव Trachyspermum copticum ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम हे आहे. ही पश्चिम आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. याच्या बिया घरगुती वापरात असतात. आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.
ओवा चवीला आंबट, कडवट, उष्ण आणि थोडासा तिखट असतो. वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. मुखवास म्हणून आणि स्वयंपाकात ओव्याचा वापर भारतात प्रामुख्याने केला जातो.
औषधी उपयोग :
- ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.
- ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करुन घ्यावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच आराम मिळतो.
- वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. ओवा टाकून पाणी प्यायल्याने शरीराची पचन क्षमता वाढते. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे.
- सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.
- गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा. त्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो.
- सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.
- ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे दम्याच्या त्रास ओवा खाण्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळासोबत दिवसातून दोनदा ओवा खा.
- मासिक पाळीमध्ये अनेकजणींना पोटदुखी आणि कंबरदुखी सहन करावी लागते. मासिक पाळीत पोट आणि कंबर दुखू लागल्यास ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळतो.
- ताप आल्यास ओवा आणि दालचिनी टाकलेला काढा प्या. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.
- केस काळे करण्यासाठी देखील ओव्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी दोन ते तीन कडीपत्त्याची पाने, दोन मनुका, एक चिमुट ओवा एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात साखर घालून दिवसातून एक ग्लास दररोज प्या. हळूहळू तुमचे केस काळे होतील.
- ओवा आणि सैंधव एकत्र घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो.
- ओवा ही एक नैसर्गिक कामोत्तेजक औषधी आहे.नियमित ओवा खाल्यास सेक्सची इच्छा वाढते.
- दारूचे व्यसन जडल्यास ते लवकर सुटत नाही असे म्हणतात. दर दोन तासांनी ओवा खाल्यास दारू सोडवणे सोपे जाते.
टीप: ओवा अतिप्रमाणात घेऊ नये. कारण प्रमाणात घेतल्यास ओवा जितका आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तितकाच अतीप्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अतीप्रमाणात ओवा सेवन केल्यास तुम्हाला अॅसिडीटी, अल्सर, डायरिया, यकृताच्या समस्या होण्याची शक्यता असते.
मात्र ओव्याचे सेवन दररोज करायचे असेल तर थंड वातावरणात करावे, असा सल्ला अनुभवी लोक देतात. त्याबरोबरच वरील सर्व उपाय अनुभवी लोकांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने करावे.