सिरो सर्वेक्षणात असे आढळले आहे की भिवंडी आणि ठाणे येथे अॅॅन्टीबॉडीज चाचणीचे प्रमाण 47.1 % आहे. मुंबईत 5485 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 1,501 म्हणजे 27.3 टक्के लोकांना अॅॅन्टीबॉडीज असल्याचे आढळले. मुंबईतील सिरो सर्वेक्षणानुसार 57 टक्के लोकसंख्या झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टीच्या बाहेरील भागात राहते. त्यामुळे 16 टक्के लोकांच्या शरीरात अॅॅन्टीबॉडीज आढळून आले आहेत. यावरून हे सूचित होते की, अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक लोकांना यापूर्वीच कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
बीएमसीने सांगितले की, या संदर्भात दुसरे सर्वेक्षण केले जाईल जे या विषाणूचा फैलाव आणि हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे का याची तपासणी करेल. हे सिरो सर्वेक्षण एनआयटीआय आयोग, बीएमसी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी संयुक्तपणे करत आहे.
काय आहे हर्ड इम्युनिटी?
हर्ड इम्युनिटी ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित होते. ही रोग प्रतिकारशक्ती विषाणूच्या संसर्गामुळे किंवा लसीमुळे विकसित होऊ शकते. जर ही रोगप्रतिकारक क्षमता एकूण लोकसंख्येच्या 75 टक्के इतकी विकसित झाली तर ती हर्ड इम्युनिटी मानली जाते. मग चारपैकी तीन जण संक्रमित व्यक्तीसभेटले तरी त्यांना हा आजार होणार नाही आणि ते त्याचा प्रसार करणार नाहीत.
घनदाट वस्तीत रोगाचा प्रसार
मुंबई मध्ये अशा अनेक वस्त्या आहेत जिथे लोकसंख्या अगदी दाटीवाटीने आहे. खासकरून झोपडपट्टी भागात नागरिक जास्त घनता करून राहतात. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. त्या ठिकाणी स्पर्श होऊन कोरोना पसरण्याचा धोका अधिक आहे.
बिना लक्षणांचे कोरोनाचे रुग्ण
सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांपेक्षा लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तसेच बीएमसीने नमूद केले आहे की लोकसंख्येतील पुरुषांपेक्षा महिलांमध्ये संक्रमणाचे प्रमाण अंशतः जास्त आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी आहे. यावरून असे दिसते की, रुग्ण सापडत असले तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.