जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोना व्हायरसचा नाश करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दररोज एक नवीन अभ्यास अहवाल जगासमोर येतो. कधीकधी नवीन लसबद्दल माहिती मिळविली जाते आहे, तर कधी नवीन उपचार पद्धती शिकवली जात आहे. तथापि, अद्याप कुणालाही कोरोना पूर्ण बरा होईल असे औषध सापडलेले नाही. मात्र आता पुन्हा एकदा एक नवीन लस चर्चेत आली आहे.
विशेष म्हणजे ही लस तंबाखूपासून बनविण्यात आली असून तीची क्लिनिकल चाचणी देखील झाली आहे. आता या लसीची मानवी चाचणी होणार आहे. तंबाखू मधील निकोटीन आणि तंबाखूच्या पानांवरील प्रोटीन हा घटक कोरोनावर मात करण्यास उपयोगी पडू शकतो, असा दावा लस बनवणाऱ्या कंपनीने केला आहे.
लंडनमधील लकी स्ट्राइक सिगारेट तयार करणाऱ्या या कंपनीने दावा केला आहे, की त्यांनी तंबाखूच्या पानापासून निघणाऱ्या प्रोटीनपासून लस तयार केली आहे.
लकी स्ट्राइक सिगरेटचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर किंग्सले व्हिटन यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीने अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनकडे मानवी चाचणीच्या परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे. ही परवानगी कोणत्याही क्षणी मिळू शकते. मानवी चाचणीसाठी परवानगी मिळेल याची अम्हाला पूर्ण आशा आहे. आमच्या लसीने प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये कोविड-19 विरुद्ध चांगले काम केले आहे.
कंपनीने दावा केला आहे, की आम्ही ज्या पद्धतीने लस तयार करत आहोत, ती अत्यंत वेगळी आहे. आम्ही तंबाखूच्या झाडापासून प्रोटीन काढून ते कोविड-19 लसीच्या जीनोमसोबत एकत्र केले आहे. यानंतर आमची लस तयार झाली आहे.
तसे पाहिला गेले तर तंबाखू ही मादक पदार्थांमध्ये गणली जाते. तिचे सेवन हे शरीरास घातक आहे. अनेकजण या तंबाखू मुळेच कर्करोगाला बळी पडले आहेत. मात्र तंबाखूतील काही घटक जर औषधी असतील आणि ते कोरोनावर मात करण्यासाठी सक्षम असतील तर येत्या काळात तंबाखूची लस बनविण्यात येईल.
त्याचबरोबर फिलिफ मॉरिस इंटरनॅशनलच्या मेडिकागो इनकॉर्पोरेशन कंपनीदेखील तंबाखूवर आधारीत लस तयार करण्याच्या कामात लागली आहे. कंपनीने दावा केला आहे, की त्यांची लस पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तयार असेल.
WHO यावर काय म्हणतंय ?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य संशोधक सौम्य स्वामिनाथन यांनी याबाबत मत मांडले आहे. त्या म्हणाल्या की, तंबाखूपासून लस तयार करणे, ऐकायला थोडे विचित्र वाटते. मात्र, असेही होऊ शकते, की ही लस यशस्वी ठरेल. तसेच हिच्यामुळे शरिरात इतर प्रकारचे साइड-इफेक्ट्सदेखील होऊ शकतात. कारण सिगारेट घेतल्याने कोरोना रुग्णांची समस्या अधिक वाढत आहे, असेही सौम्या म्हणाल्या.
दरम्यान फ्रान्समध्ये ही असा प्रयोग सुरु आहे. फ्रान्सच्या काही औषधनिर्मिती क्षेत्रातील तज्ञांनी तंबाखू कोरोनाचे औषध ठरू शकते असा दावा केला आहे. याबाबत फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या न्यूरोबायोलॉजिस्ट जीन पियरे चेंजेक्स म्हणतात की, तंबाखूतील निकोटिन पेशींच्या रिसेप्टर्सला चिकटून राहते. आतापर्यंत केलेल्या संशोधनांनुसार कोरोना विषाणू शरीरातही पोहोचतो आणि पेशींच्या या रिसेप्टर्समध्ये जाऊन अडकतो आणि लोकांना आजारी बनवतो. आता निकोटीन आधीपासूनच त्या रिसेप्टर्सला चिकटल्यास कोरोना विषाणू पेशींमध्ये जाण्यापासून रोखता येतो. साध्या शब्दांत सांगायचे तर, तंबाखूचा वापर करून शरीरात व्हायरस येण्यापासून रोखणे सोपे होईल आणि लोक संसर्ग होण्यापासून वाचू शकतील. ते पुढे म्हणाले की, निकोटीन निःसंशयपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तर गंभीर संसर्ग झाल्यास निकोटीन एजंट नियंत्रित पद्धतीने प्रभावी उपचार म्हणून सिद्ध होऊ शकेल.