…म्हणून प्यावे तांब्याच्या भांड्यातील पाणी, जागतिक संशोधनातून आले समोर

0

अनेकजण खासकरून ग्रामीण भागात अजूनही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना दिसतात. तांबे हा धातू इतर धातूंच्या मानाने शुद्ध असल्याने प्राचीन काळापासूनच आपल्याकडे धातूच्या भांड्यांचा वापर अन्न शिजविण्यासाठी, साठवणूक करण्यासाठी केला जातो. खासकरून पिण्याचे पाणी साठवण्यासाठी तांब्याची भांडी वापरली जातात. त्यामुळे आज आपण नेमकं तांब्याच्या भांड्यांचे महत्व काय आहे? हे जाणून घेणार आहोत.

शहरी जीवनपद्धतीमध्ये अशी भांडी आता कालबाह्य होत चालली आहेत. अनेकजण प्लॅॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी साठवून ते पितात. त्यामुळे पाण्याची अशुद्धता वाढते आणि त्यात प्लॅॅस्टिकचे काही अपायकारक घटक मिसळत असल्याने ते पाणी पिण्या जोगे राहत नाही. जर हे पाणी पिण्यात आल्यास त्यातून इतर आजार होण्याचा नक्कीच संभव असतो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे नेमके काय कारण आहे ? त्यामागील शास्त्र काय आहे ?

आयुर्वेद म्हणते की….

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकले तर ते अधिकच गुणकारी बनते.

वर्ष १९८० पूर्वी भारतात तांब्याच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता; मात्र नंतर अ‍ॅल्युमिनियम, स्टील आदी धातूंच्या भांंड्यांचा वापर होऊ लागला आणि तांब्याच्या भांड्यांचा वापर अल्प झाला. भारतात पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. आयुर्वेेदानुसार तांब्यामध्ये विषाणूविरोधी गुण आहेत. तसेच त्याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमताही वाढते.

तांब्याचे गुणधर्म

‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत. ‘तांबे पित्त आणि कफ नाशक आहे. तांब्यामुळे पोटदुखी, त्वचाविकार, जंत होणे, लठ्ठपणा, मूळव्याध, क्षय (टी.बी.), पंडुरोग (रक्तातील हिमोग्लोबिन अल्प असणे, अ‍ॅ्नीमिया) हे विकार दूर होण्यास साहाय्य होते. तांबे शरिराची शुद्धी करणारे, भूक वाढवणारे आणि डोळ्यांना अतिशय हितकारक आहे.’ तांब्यामुळे रक्ताभिसरणातील अडथळे दूर होऊन रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे स्वास्थ्य उत्तम रहाते. कांती सतेज होते. हे सर्व लाभ स्वच्छ चकचकीत तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्याच्या नियमित उपयोगानेही प्राप्त होतात.

त्याचबरोबर पितळीच्या भांड्यातील पाणी देखील शरीरास लाभकरक असते. पितळ हा तांबे आणि  झिंक यांचा मिश्रधातू आहे. झिंक शरिरातील अनेक क्रियांसाठी आवश्यक असते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे –

1. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं.

2. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.

3. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

4. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.

5. पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

6. शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.

7. अॅनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने फायदा होतो. हे पाणी लोह सहजरित्या शोषून घेतं. त्यामुळे अॅनिमिया असणाऱ्यांसाठी हे पाणी पिणं आवश्यक आहे.

8. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे फोड्या, तारुण्यापीटिका तसंच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते.

9. तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारुन पचनशक्ती वाढवतं. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते.

10. तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरतं.

तांब्याच्या भांड्यातील पाण्यावर केले आधुनिक संशोधन

नेमकं तांब्याच्या भांड्यात पाणी शुद्ध कसे राहते यावर जगभरात संशोधन करण्यात आले.  तांब्याच्या औषधी गुणधर्मांचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध चाचण्या घेतल्या. या संशोधना वेळी  जुलाबाला कारणीभूत असणारे जिवाणू तांब्याच्या संपर्कात राहिल्यास अडीच तासात नष्ट होतो, असे आढळून आले.

इंग्लंडमधील नेचर या विज्ञान आणि संशोधन या विषयावरील मासिकाने नॉर्थम्ब्रिया विद्यापिठातील डॉ. रीड या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाची माहिती प्रसिद्धी केली आहे. डॉ. रीड यांनी पितळ्याच्या आणि मातीच्या भांड्यातील पाण्यात ई. कोलाय हे जुलाबाचे जंतू सोडले आणि दोन्ही भांड्यांतील पाण्याची ६, २४ आणि ४८ तासांनी चाचणी केली. त्या चाचणीत पितळ्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात ई. कोलायच्या जंतूचे प्रमाण झपाट्याने अल्प होते, असे निदर्शनास आले.

तांब्यांच्या भांड्यांची घ्यावी लागते काळजी

आपण ज्या तांब्या-पितळ्याच्या भांड्यांत पाणी ठेवणार असू, ती भांडी दररोज स्वच्छ करणे बंधनकारक आहे. भांडी स्वच्छ न घासल्यास हवेतील प्राणवायूच्या संपर्कामुळे तांब्याचे ऑक्साईड बनते आणि त्याच्या थरामुळे तांब्याचे गुणधर्म पाण्यात उतरत नाहीत. शिवाय पाणी वापरण्यास अयोग्य होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.