जगाच्या पाठीवर भारतीय कुठेही गेले तरी ते आपल्या भारतीय अन्नाची नेहमीच आठवण काढतात. हिंदी महासागर ते हिमालयापर्यंत पसरलेला देश विविधतेने नटलेला आहे. मानवाच्या चेहरेपट्टी पासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत सर्वच काही भारतात प्रत्येक ठिकाणी वेगळे पाहिला मिळते. काही किलोमीटर अंतर पार करून पुढे गेलात की आपल्याला वेगळ्या संस्कृतीची आणि त्यांच्या नवनवीन पदार्थांची ओळख होते.
भारताला खाऊगुल्ला देश म्हणूनही जगात ओळखले जाते. मसाल्यांनी भरलेल्या डिशेश खाण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक भारतात येतात आणि ताज्या मसाल्यांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीचा आहार भारतीय घेत असल्याने देशात खाण्याची मात्र भलतीच चंगळ असल्याचे पाहिला मिळते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध भारतीय पक्वान्नांंची ओळख करून देणार आहोत जे खाण्यासाठी काही विदेशी पाहुणे अनेक किलोमीटरचा समुद्र पार करून भारतात येतात.
रोगन जोश
ही एक अतिशय चवदार मटन करी आहे. रोगन जोश एक स्वादिष्ट काश्मिरी डिश असून ज्यामध्ये मटण हे स्पेशल काश्मिरी मसाले आणि औषधी वनस्पतींनी शिजवले जाते. दही त्याची चव आणखी वाढवते. एखाद्या डिनर पार्टीमध्ये उत्तर भारतीय लोक खास ही स्वादिष्ट नॉन-वेज डिश देखील बनवतात.
पर्शियन भाषेत ‘रोगन’ म्हणजे ‘तेल’ आणि ‘जोश’ म्हणजे ‘उत्साह’ किंवा ‘गरम’. गरम तेलात तयार झाल्यामुळे या डिशला ‘रोगन जोश’ असे नाव देण्यात आले आहे. अन्य स्त्रोतांच्या मते हे नाव राजस्थान आणि काश्मीरमध्ये पिकविल्या जाणाऱ्या ‘रतनजोत’ नावाच्या वनस्पतीचे आहे, जे ही डीश बनवताना वापरले जाते.
रोगन जोश बनवण्यासाठी बिना हाडकाचे मटण शिजवले जाते. कांदा, लसून, आलं, विलायची, दही, आणि केशर यांनी बनवलेल्या एका तरीबाज रश्यामध्ये हे शिजवलेले मटण टाकले जाते. त्यानंतर त्यात खास काश्मिरी मिरची टाकली जाते जी या रोगन जोशला लाल रंग आणण्यास मदत करते. तसेच काश्मीरमध्ये पिकविल्या जाणाऱ्या ‘रतनजोत’ नावाच्या वनस्पतीच्या पानांचा देखील वापर केला जातो. ज्याने याचा स्वाद आणखी वाढतो.
बटर चिकन
पंजाबी किचनमध्ये तयार केलेली ही डिश बर्याच वर्षांपासून भारतात खूप प्रसिद्ध आहे. भारतीयांव्यतिरिक्त बऱ्याच परदेशी लोकांनाही बटर चिकन खाणे आवडते. ही डिश अनेक प्रकारे बनविली जाते. पण बटर चिकनची ही रेसिपी थेट मोती महालच्या किचनमधून आली आहे. आपण बटर चिकनची ही कृती सहजपणे करू शकता. रात्रभर चिकन मॅरीनेट करा, टोमॅटो प्युरी, मलई आणि मसाले घालून ही डीश तयार केली जाते. डिनर पार्टीसाठी ही रेसिपी एक उत्तम रेसिपी आहे. ही उत्तर भारतीय चिकन पाककृती देशभरात अनेक ठिकाणी तेवढ्याच चवीने खाल्ली जाते.
भापा आलू
बटाट्याचे पदार्थ सर्वांनाच आवडतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. त्यापैकीच एक भाप्पा आलू हा पदार्थ आहे. भप्पा आलू ही डिश खास बंगाली समुदायाची शाहकारी डिश आहे. ही डिश ईशान्य भारतात पिकवल्या जाणाऱ्या मसाल्यांपासून बनवली जाते. ही एक लोकप्रिय पाककृती आहे जी लोक मोठ्या उत्साहाने खातात. बंगाली खाण्याची खास गोष्ट म्हणजे त्यात मोहरीचे तेल वापरले जाते, ज्यामुळे त्याला एक वेगळी चव मिळते. भापा आलू याचा अर्थ उकडलेला बटाटा असा आहे. त्यामुळे ही डिश अर्थातच बटाटा उकडून केली जाते.
आपण पाच प्रकारच्या मसाल्यांमध्ये ही डिश बनवू शकता आणि त्यास एक नवीन चव देऊ शकता. याशिवाय चवीसाठी मोहरी पेस्ट, दही आणि नारळाचाही वापर केला जातो.
बंजारी गोश्त
बंजारी गोश्त ही एक राजस्थानी डिश असून यामधील मसाले आणि त्यांचा स्वाद तुम्हाला ही डिश खाण्यास नेहमीच प्रवृत्त करते. अतिशय सोपी असलेली ही डिश अनेक राजस्थानी कार्यक्रमांमध्ये पाहिला मिळते. खासकरून कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये या बंजारी गोश्तचा आस्वाद घेतला जातो. ही डीश भात आणि खासकरून रोटी बरोबर खाली जाते.
चिकन स्टू आणि अप्पम
ही एक भारतातील विशेष डिश आहे जी केरळमधील ख्रिश्चन समुदायाची आवडती डिश आहे. ही डिश सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात खाल्ली जाते. असे म्हंटले जाते की ही पारंपारिक डिश खास देवांच्या अन्न खजिन्यातून आली आहे. ही डिश केरळच्या ताज्या मसाल्यांपासून बनवली जाते. तर त्याला घट्टपणा येण्यासाठी ताज्या नारळाचा वापर केला जातो. चिकन स्टू हे परंपरेनुसार अप्पम सोबत खातात.
काकोरी कबाब
लखनौच्या नवाबांच्या दर्बारातुल आलेली ही एक प्रसिद्ध डिश आहे. एकेकाळी नवाबांची शान या डिश मधून प्रतिबिंबित होत असे. उत्तर भारतीय हे ही डिश मोठ्या प्रमाणात चाखतात. तर घरी आलेल्या पाहुण्याचे काकोरी कबाब खाऊ घालून स्वागत करतात. तुमच्या तोंडात विरघळणारा हा कबाब तुमच्या नाईट पार्टीसाठी खूप चांगला पर्याय आहे.
ही डिश खाताना तुम्हाला लाल तिखट, जिरेपूड, मिरपूड पावडरशिवाय काही मसाल्यांचा स्वाद घेता येतो. काकोरी कबाब हे भाजून बनवले जातात त्यामुळे ओवन किंवा कोळश्याच्या भट्टीवर कबाबला भाजले जाते.
हैदराबादी बिर्याणी
हैदराबादी बिर्याणी ही एक अशी डिश आहे जी विदेशात देखील प्रसिद्ध आहे. या पदार्थाने भारतीय पक्क्वानाच्या इतिहासात विशेष स्थान मिळवले आहे. पूर्वी राजा महाराजांच्या पाहुणचारासाठी ही डिश बनवली जायची. जी अजूनही प्रचलित असून केवळ हैद्राबादमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या चवीने खाल्ली जाते.
हैद्राबादी बिर्याणी ही भात आणि मटणाचे किंवा चिकनच्या पिसेस पासून बनवली जाते. या बिर्याणीमध्ये अनेक भारतीय मसाल्यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे वाफेवर ही बिर्याणी शिजवली जाते. भारतात तसे बिर्याणीचे अनेक प्रकार आहेत. पण त्यातल्या त्यात हैदराबादी बिर्याणीचा स्वाद काही औरच आहे.
ढोकळा
ढोकळा हा पदार्थ भारतातील प्रसिद्ध नाश्ता आहे. खासकरून गुजराती समुदाय हा पदार्थ आवर्जून बनवतात. सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी हलक काही खाण्यासाठी ढोकळा हा पर्याय चांगला असतो. चण्याच्या डाळीच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. तर त्यावरील राई जीर मिरचीची फोडणी त्याचा स्वाद आणखी वाढवते. हा पदार्थ देखील वाफेवर बनवला जातो. त्यामुळे शरीराला यामधून विशेष पोषक घटक मिळतात.
दाल मखनी
दाल माखानी हे अभिजात एक डिश आहे जी लोणीने आणि डाळीच्या मिश्रणातून बनवली जाते. अनेक भारतीय आपल्या रोजच्या आहारात देखील दाल मखनी बनवतात. घरच्या घरी पटकन बनवता येणारी रेस्टॉरंट डिश असल्याने अनेकजण याचा आस्वाद घरीच घेतात. ही डाळ रेसिपी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळेल. नान, पराठे आणि शिजवलेल्या भाता सोबत आपण सर्व्ह करू शकता.
खीर
भारताला अन्नाच्या बाबतीत एकत्र जोडून ठेवणारी डिश म्हणजे खीर ही आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घराघरात सणासुदीला एक गोड पदार्थ म्हणून ही डिश बनवली जाते. तांदूळ, रवा , शेवया, डाळ अशा अनेक पदार्थांपासून दुधाचा आणि साखरेचा वापर करून या डिशला स्वाद आणला जातो. खास करून विलायची, जायफळ, केशर, अशी स्पाईसेस टाकून याला सजवले जाते. या खिरीचा गोडवा भारतीय लोक जेवणानंतर चाखतात. तर अनेक विदेशी पर्यटकांना देखील या खिरीचे विशेष आकर्षण असते.