कोरोनाच्या संक्रमणामुळे आपल्या सर्वांची जीवनशैली बदलली आहे. अनेकजण सध्या घरूनचं काम करत आहेत. तर विद्यार्थी देखील घरूनचं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. सुरवातीला ही दिनचर्या सर्वांनाचं आरामदायी आणि सुखद वाटली. मात्र आता याचं दिनचर्येचा कंटाळा आल्याने काहीजण डिप्रेशनमध्येही जात आहेत. खासकरून लहान मुलं डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण वाढले आहे. इतरवेळी बाहेर मित्रांमध्ये खेळायला जाईला मिळत होते. मात्र आता शाळा देखील बंद असल्याने सवंगड्यांची भेट होत नसल्याने मुले आता अबोल झाल्याची तक्रार काही पालक करत आहेत. त्यामुळे अशावेळी पालकांनीचं मुलांचे मित्र होण्याचा सल्ला, काही मानसोपचार तज्ञांनी दिला आहे.
मानसोपचार तज्ञ म्हणाले की, सध्याची परिस्थितीही एखाद्याला डिप्रेशनमध्ये घेऊन जाण्यास अनुकूल आहे. सतत एकच कृती आणि एकाच वातावरणात वावरून माणसाला त्या जागेचा आणि वातावरणाचा कंटाळा येतो. त्यानंतर त्याला नवनवीन काहीतरी करावस वाटत मात्र ते सध्या शक्य होत नाही. त्यामुळे त्याची मानसिकता नैराश्यात जाते. त्यानंतर त्याला उगाच ताण आल्यासारखे होते.
असेच काहीसे लहान मुलांच्या बाबतीत देखील होते. मुलांना सुरवातीपासूनचं बाहेर खेळण्याची आणि बागडण्याची सवय असते. त्यांचा बहुतांशी वेळ हा शाळेत आणि तासिकेत जातो. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला मित्र असतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद होतो. यामुळे मुलांना हलके वाटते आणि त्यांना नवीन वातावरण तयार होते आणि या वातवरणात मुलं रमतात. मात्र सध्याची परिस्थिती ही संपूर्ण त्यांच्या इथून मागच्या दिनचर्येच्या विरुद्ध आहे.
मुले आज तब्बल 4 महिने एकाच वातावरणात आहेत. बाहेर कोरोना असल्यामुळे त्यांना बाहेर देखील जाता येत नाही. त्यामुळे त्यांना काहीसे डिप्रेशन आले आहे. अशावेळी पालकांनीचं मुलांशी मैत्री वाढवली पाहिजे. त्याच्यांशी गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांना नेमकं काय वाटतंय ? त्यांच्या मनात कोणत्या भावना आहेत ? हे जाणून घेतले पाहिजे. ज्यामुळे मुलांना देखील हलके वाटेल.
अनेक मुलं आज आपल्या करियरचे टेन्शन घेत आहेत. बर्याच मुलांमध्ये करिअरच्या शर्यतीत मागे राहण्याची भीती देखील आहे. नेहमीच शर्यतीत प्रथम क्रमांकावर असण्याची महत्वाकांक्षा मुलांना चिंताग्रस्त बनवते. या परिस्थितीत आपल्याला त्यांना हे समजावून सांगणे आवश्यक आहे की, संपूर्ण जगावर या साथीचा परिणाम झाला आहे. तर स्वत: ला मागे ठेवण्याऐवजी किंवा करियरची चिंता करण्याऐवजी आपल्या कामगिरीवर लक्ष दिले पाहिजे. रॉजर फेडरर, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंची उदाहरण देऊन त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे तज्ञ म्हणाले.
बाहेर खेळायला जाता येत नसल्याने मुलं आता घरीच कॉम्प्युटर गेम आणि मोबाईल गेम खेळत आहेत. त्यामुळे नकळत त्यांच्यातील रागीट आणि चिडचिडेपणा वाढत असल्याचं दिसत आहे. यात त्यांना दोष देण्यात काहीचं अर्थ नाही कारण सध्याची परिस्थितीचं तशी आहे. अशावेळी त्यांचा कल वाचनाकडे वळवला पाहिजे. काही बैठे खेळ पालकांनी त्यांच्यासोबत खेळले पाहिजेत जेणेकरून मुलांचाही विरंगुळा होईल. आणि त्यांचा वेळ काहीसा सुखद होईल.