जेवणानंतर बडीशेप खाणे, हे अनेक व्यक्तींचे शौक आहे. शौक म्हणण्यापेक्षा काही खाल्ल्यानंतर बडीशेप खाण्याचे व्यसनच प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला लागले आहे. बडीशेपची चटक लावणारी चव आणि सुंदर सुगंधामुळे बडीशेप खाण्याचे व्यसन हे लागतेच. आजी किती हुशार होती ना.. बडीशेपमध्ये पण तिने आरोग्याचे भरपूर फायदे जाणले. बडीशेपसुद्धा इतर काही पदार्थांसारखीच भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. म्हणून आजीने बडीशेपचे आरोग्यकारक फायदे शोधून काढले आहेत. चला तर करूयात बडीशेप बरोबर थोडीशी ओळख…
एक सुगंधी वनस्पती. बडीशेप ही वनस्पती एपिएसी फॅमिलीतील असून तिचे शास्त्रीय नाव फीनिक्युलम व्हल्गेर आहे. कोथिंबीर, ओवा आणि गाजर या वनस्पतीही एपिएसी फॅमिलीतील आहेत. बडीशेपची मूळची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते. मात्र, बडीशेपेचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतात बडीशेपेची सर्वाधिक लागवड राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील उत्तर भाग आणि मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी केली जाते.
बडीशेपला विशिष्ट वास आणि स्वाद मुख्यत: पदार्थ ॲनेथॉल या संयुगामुळे येतो. फळांत कर्बोदके, ब-समूह जीवनसत्त्वे, क-जीवनसत्त्व आणि पोटॅशियम, फॉस्फरस इ. असतात. बडीशेपचा उपयोग भारतात मुख्यत: मसाल्यांमध्ये, जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी आणि औषधी वापरासाठी होतो.
यूरोप व उत्तर अमेरिकेत बडीशेपचा उपयोग एक मसाल्याचा पदार्थ म्हणून तर पानांचा उपयोग सॅलडमध्ये आणि कंदाचा वापर खाण्यासाठी करतात. बडीशेपच्या काही उपजातींचा उपयोग शोभेचे झाड म्हणून बागेत लावण्यासाठीही होतो. रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत ते तणासारखे वाढते.
औषधीयुक्त फायदे :
- जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली तर जेवण चांगलं पचते. काळे मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून घेतल्यानं कोमट पाण्यासोबत घ्यावे. पचनक्रियेसाठी हे चूर्ण उत्तम आहे.
- उलटीचा त्रास होत असेल तर बडीशोप खावी. लगेच आराम मिळतो.
- मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
- बडीशेप शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम करते. त्वचेसाठी दररोज बडीशेप खाणं फायदेशीर आहे.
- नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी. उन्हामुळे जळजळ होत असेल तर सरबत किंवा बडीशेप भिजवलेले पाणी प्यावे.
- बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. रोज जेवून झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दूधात घालून प्या. यामुळे दृष्टी सुधारेल.
- अजीर्ण, मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांनी नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते.
- रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे बद्धकोष्ट आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.
सौंदर्यासाठी उपयोग :
- आपल्या ब्युटी केअर रूटीनमध्ये बडीशेपचा समावेश केल्यास मुरुम, त्वचेच्या पेशींचे आरोग्य, डोळ्यांखालील (Dark Circles) आणि सुरकुत्यांची समस्या कमी होऊ शकते.
- त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही बडीशेपचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप, दोन चमचे ओटमील आणि एक चतुर्थांश उकळलेले पाणी ही सामग्री लागेल. या सर्व गोष्टी एकत्र घ्या आणि याची पेस्ट तयार करा. २० मिनिटांसाठी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या फेस मास्कमुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होण्यास मदत मिळेल.
- बडीशेपच्या मदतीनं तुम्ही घरगुती टोनर देखील तयार करू शकता. यासाठी मूठभर बडीशेप आणि एक ग्लास पाणी घ्या. बडीशेप आणि पाणी गॅसवर उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर थंड होण्यास ठेऊन द्या. आता हे पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये बडीशेप एसेंशिअल ऑइलचे काही थेंब मिक्स करा. हे मिश्रण एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि तुमच्या वेळेनुसार कापसाच्या मदतीनं याचा चेहऱ्यावर वापर करा.
- डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी बडीशेपचा वापर करावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल. बडीशेप मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये थोडेसे पाणी मिक्स करा. आता या पाण्यामध्ये एक मऊ कापड भिजवा आणि ते आपल्या डोळ्यांवर ठेवा. यासाठी थंड पाण्याचा वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. हा उपाय केल्यास तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
- स्टीम फेशिअलसाठी एक लीटर पाणी आणि एक चमचा बडीशेप एकत्र घ्या आणि हे पाणी गॅसवर उकळत ठेवा. आता या पाण्यानं चेहऱ्यावर वाफ घ्या. कमीत कमी पाच मिनिटांसाठी या पाण्याची चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे. यानंतर स्वच्छ कापडानं चेहरा पुसून घ्या. बडीशेपच्या पाण्याची वाफ घेतल्यास चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होतात. यातील दुर्गंध बाहेर येते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील दिसू लागते. आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता.
हे पण वाचा