fbpx
2.9 C
London
Saturday, January 28, 2023

आजीच्या बटव्यातील लिंबू अनेक आजारांवर गुणकारी, असे आहेत ऑलराउंडर लिंबूचे औषधी फायदे

“पोट दुखतंय? लिंबू पाणी घे. उन्हातून आलात? जा ग ताई, लिंबू सरबत घेऊन ये. तापाने तोंड कडू झालंय? ‘लिंबाचे लोणचे’ घे जेवणासोबत तोंडाला चव येईल.” नेहमीच आजीला असं बोलताना तुम्ही नक्कीच ऐकले असणार. लिंबू हा आजीबाईच्या बटव्यातील खास आणि महत्त्वाचा घटक आहे. इतकेच नाही तर, हँगोवर कमी करण्यासाठी देखील लिंबू पाणी घेतात किंवा लिंबाची एक चकती करून तोंडात ठेवतात. इतकेच नाही तर, सौंदर्यासाठी देखील लिंबाचे अनेक फायदे आहेत. पण लिंबूबद्दलच्या अनेक बाबींचा तुम्हाला अजूनही परिचय नाही. काळजी करण्याचे कारण नाही, आम्ही आहोत ना…
चला तर करूयात, छोट्या मोठ्या आजारावरील रामबाण उपाय असलेल्या लिंबूसोबत परिचय…

इतिहास

लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. लिंबाच्या देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाच्या सालीचे अनेक प्रकार आहेत ते म्हणजे जाड साल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल.

लिंबू हा ‘रुटेसी‘ फॅमिलीच्या सिट्रस प्रजातीतील मध्यम उंचीचा वृक्ष आहे. ईडलिंबू, पपनस, महाळुंग, मोसंबे, संत्रे व चकोतरा या वनस्पतीही याच प्रजातीतील आहेत.  सिट्रस प्रजातीतील चार प्रमुख जातींपैकी ‘सिट्रस ऑरॅन्टिफोलिया’ हिला कागदी लिंबू या नावाने ओळखतात. कागदी लिंबू ही मूळची भारतातील वनस्पती असून तिचा प्रसार ईजिप्त, मेक्सिको, वेस्ट इंडीजपर्यंत झालेला आहे.

अरब लोकांनी या वनस्पतीचा प्रसार इटली आणि स्पेन येथे केला. सन १४९३ मध्ये इटालियन खलाशी ‘क्रिस्तोफर कोलंबस’ याने अमेरिकेत प्रथम लिंबाची लागवड केली होती. सतराव्या शतकाच्या अखेरीस स्पेनमधील मिशनऱ्यांनी लिंबाची लागवड कॅलिफोर्नियात केली, तर अठराव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत लिंबाची व्यापारी लागवड करण्यास सुरुवात झाली.
कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते.  लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, कागदी लिंबू, इ.

लिंबाची अन्य भाषांतील नावे :

 • इंग्रजी- अ‍ॅसिड सोअर लाईम, लेमन,
 • कानडी- निंबे, लिंबे, गुजराथी- निंबू, खटलिंबू,
 • संस्कृत- आम्लसार, निम्‍बु, निम्बुक, रोचना, लिम्पका, शोधना,
 • हिंदी- कागज़ी निंबू, निंबू, नेबू, लिंबू, लेबू.

लिंबाच्या महाळुंग नावाच्या जातीची अन्य भाषातील नावे :

 • कानडी- मदाला, महाफल, रूचक, गुजराथी- तुरंज, बालंक, बिजोरू.
 • मराठी- महाळुंग. मवालुंगा.
 • शास्त्रीय नाव- Citrus medica.
 • संस्कृत- अम्लकेशर, महानिंम्बू, मातुलुंग, फलपूरक , हिंदी- कुतला, तुरंज, बिजौरा, बोरा निंबु.

लिंबाच्या इडलिंबू नावाच्या जातीची अन्य भाषांतील नावे :

 • इंग्रजी- लेमन.
 • कानडी- देवमादला, दोड्डा गाजा, दोड्डा निंबा, माटुंगा, मातालुंगा, समहानिंबू, हराली.
 • गुजराथी- मोटालिंबा, दोडिंगा, मराठी- ईडलिंबू, थोरालिंबू.
 • शास्त्रीय नाव- Citrus medica, Variety Limonum, संस्कृत- दंतशठ, हिंदी- जंबिरा, पहाडी निंबु, बडानिंबु.

लिंबाचे औषधी उपयोग :

 • लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत.
 • लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते.
 • पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात.
 • अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करतात आणि वारंवार चोखतात. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.
 • पित्त झाल्यास रोज लिंबाचा सरबत घेतात. त्याने भूक वाढते,अन्न पचते व पोट साफ होते.
 • अन्न खाण्याची इच्छा होत नसेल तर लिंबाची चतकोर फोड सालासकट खाल्ल्यास फायदा होतो.
 • वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.

इतर उपयोग :

लिंबाच्या रसामध्ये क-जीवनसत्त्व (ॲस्कॉर्बिक ऍसिड) पुष्कळ प्रमाणात आणि कमी प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. रस चवीला आंबट असतो.कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबाच्या रसापासून सरबतासारखी पेये व फळांपासून लोणचे तयार करतात. जेली, मुरंबे व मध यांना स्वाद आणण्याकरिता लिंबाची फळे वापरतात. फळांच्या सालीमध्ये पेक्टीन भरपूर असते. मिठात मुरवलेली साल अपचनावर गुणकारी असते.
लिंबाच्या बिया पांढऱ्या असून त्यांपासून तेल मिळते. हे तेल वंगण व खाद्य तेल म्हणून तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात.

सौंदर्यासाठी फायदे :

 • दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. लकरात लवकर फायद्यासाठी यामध्ये मध देखील घालू शकता.
 • नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
 • जर डोक्यावरचे केस किंवा टाळूवरची त्वचा तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावतात. जास्त प्रमाणात लावल्यास केस ब्लीच होतात, मात्र जरासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळास लावणे योग्य राहील.
 • मरगळलेल्या केसांवर लिंबाचा रस लावल्यामुळे ते चमकदार आणि फ्रेश दिसतात.
 • बाजारातील उत्पादनांचा वापर न करता केस सुंदर आणि सुगंधी होतात.
 • गरमीच्या दिवसात घामाने आणि धुळीने केस मळतात, त्यामुळे लोक केस वारंवार धुत असतात. लिंबाचा योग्य प्रमाणातला वापर केसांना चमकदार व गुळगुळीत बनवतो.

टीप : गरजेनुसारच लिंबाचा केसांवर वापर करा. लिंबाच्या अति वापराने केस कोरडे देखील होऊ शकतात.

 • अनेक घरगुती वेगवेगळ्या फेस पॅक मध्ये लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. यामुळे त्वचा चमकदार आणि हेल्दी होते.
 • साधारणता: बेसन फेस पॅक मध्ये लिंबाचा वापर करतात.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here