औषधी वनस्पती, आयुर्वेद, जडिबुटी अशाच काही विषयासंबंधी बोलताना तुम्ही अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे नाव नक्कीच ऐकले असणार. पण फक्त जाणकारांनाच ‘अश्वगंधा’ औषधी वनस्पतीविषयी माहिती असते. सामान्य माणसांसाठी ही माहिती जाणून घेणे, थोडे कठीणचं आहे. पण आम्हाला वाटते की, तुम्हाला अश्वगंधाचे जाणकार होण्यास नक्कीचं हरकत नसेल. म्हणून तर आजीबाईच्या बटव्यात आज आम्ही तुमचा परिचय ‘अश्वगंधा’ औषधी वनस्पतीबरोबर करून देणार आहोत.
अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेद उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसॅंग म्हणून ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही वनस्पती आहे. हिच्या दोन जाती असतात- देशी ही जंगलामध्ये आढळते आणि दुसरी ही पेरणी करून उगविली जाते. हिच्या मुळांचा वापर आयुर्वेद चिकित्सेमध्ये केला जातो. ‘बुढापे का सहारा अश्वगंधा विधारा।।’ अशी एक म्हण देखील प्रसिद्ध आहे.
भारतीय आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्वगंधा या वनस्पतीकडे सार्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अशाच प्रकारची एक वनस्पती चीनमध्ये फार लोकप्रिय आहे. तिला जिनसेंग असे म्हणतात. त्यामुळेच वैद्यकीय शास्त्रात अश्वगंधा वनस्पतीला भारतीय जिनसेंग असे संबोधले जायला लागले आहे. ही वनस्पती माणसाच्या अंगातील उर्जा वाढविण्यास कारणीभूत ठरते आणि आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते.
बकरीच्या मांसापासून तयार केलेला रस्सा व अश्वगंधा यांचा वापर करून बनवलेले ‘अजाअश्वगंधादि लेहम्’ नावाचे औषध आयुर्वेद चिकित्सेमधे वजनवर्धक व शक्तिवर्धक म्हणून वापरतात.
भारतात अश्वगंधा वनस्पती परंपरेने वापरली जात असली तरी पाश्चात्य देशांमध्ये अगदी अलीकडे तिच्यावर संशोधन सुरू झाले आहे आणि या संशोधनाअंती तिच्यात अनेक गुणधर्म असल्याचे आढळले आहे. काही अमायनो ऍसिडस्, फॅटी ऍसिडस् सुद्धा या वनस्पतीत असल्याचे आढळले आहे. त्याशिवाय आधुनिक वैद्यक शास्त्राला आव्हान देणार्या अल्झायमर्स आणि कर्करोग याही रोगांवर अश्वगंधा इलाज करू शकते असे संशोधकांना वाटत आहे.
अश्वगंधाचे औषधी उपयोग
- अश्वगंधा पुरुष प्रधान रोगावर गुणकारी असली तरी स्री रोगावरही तितकेच उपयुक्त आहे.
- अश्वगंधाच्या मुळाची भुकटी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उत्तम प्रकारचे टॉनिक आहे.
- अश्वगंधाच्या मुळांमध्ये असलेल्या अल्कोलाईडमुळे अशक्तपणा, नपुसकत्व नाहीसे होते.
- अश्वगंधाच्या पानांचे दररोज सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होते व प्रकृती सडसडीत आणि उत्साहवर्धक राहते.
- अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून वाचता येते.
- अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते. वर्ल्ड जर्नल ऑफ मेडिकल सायन्सच्या शोधातूनदेखील ही गोष्ट सिद्ध झाली आहे. अश्वगंधामध्ये जास्त प्रमाणात हायपोलिपिडेमिक आढळतं, जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.
- कोणत्याही व्यक्तीला निद्रानाशाची समस्या असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधाचे सेवन करावे. जपानमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार अश्वगंधाच्या पानांमध्ये ट्रायथिलीन ग्लायकोल नावाचे यौगिक असते जे झोप चांगली लागण्यासाठी मदत करते. या रिसर्चच्या आधारानुसार निद्रानाश असलेल्या व्यक्तींनी अश्वगंधाचे सेवन केल्यास, त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. पण त्याचे किती प्रमाण घ्यायचे आहे ते मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून विचारून घेणं योग्य ठरेल. अश्वगंधा चे फायदे असेही होतात.
- आजकाल तणाव येण्याची समस्या तर सर्रास दिसून येते. तणावामुळे लवकर म्हातारपणच येत नाही तर त्यामुळे अनेक आजारालाही सामोरं जावं लागत आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तणाव आणि चिंताग्रस्त जीवनाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक औषध अश्वगंधा हा रामबाण इलाज आहे. वास्तविक यामध्ये अँटिस्ट्रेस गुण आढळतात. अश्वगंधामध्ये असलेल्या सिटोइंडोसाईड (Sitoindosides) आणि एसाईलस्टरीग्लुकोसाईड्स (Acylsterylguucosides) हे दोन्ही कंपाऊंड शरीरामध्ये अँटिस्ट्रेस गुणाचे काम करतात. यामुळे तणावापासून मुक्ती मिळते.
- आजकालच्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांना डोळ्यांचे अनेक विकार झालेले दिसतात. मोतीबिंदूसारखे आजार तर अधिक वाढले आहेत. मोतीबिंदूमुळे अगदी आंधळेपणाही येतो. त्यामुळे हे कमी करायचं असेल तर अश्वगंंधाचा उपयोग करून घेता येतो. अश्वगंधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुण हे मोतीबिंदूपासून लढण्यासाठी मदत करतात. हे अतिशय प्रभावशाली औषध ठरतं. तसंच मोतीबिंदू वाढण्यापासूनही अश्वगंधा थांबवते. त्यामुळे मोतीबिंदू सारखा आजार होऊ नये अथवा झाला असेल तर त्यावर प्रभावशाली औषध म्हणून तुम्ही अश्वगंधाचा वापर करू शकता.
- आजकाल वजनामध्ये वाढ हा सर्वात मोठा आजारच झाला आहे. आपण कोणत्याही वेळी काहीही खातो आणि मग वजनावर नियंत्रण राहात नाही. प्रत्येकालाच आकर्षक दिसायला आवडतं. त्यासाठी वजन नियंंत्रणात राहणं अत्यंत आवश्यक आहे. अश्वगंधाचं सेवन केल्यास, भूकेवर व्यवस्थित नियंत्रण राहतं आणि जास्त प्रमाणात भूक लागत नाही. बऱ्याचदा तणाव आणि चिंतेमुळेही जास्त भूक लागते. पण तणाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि भूक न लागून पोट व्यवस्थित भरलेले जाणवून वजनावर नियंत्रण ठेवण्यास त्याची मदत होते. पण याशिवाय तुम्हाला नियमित व्यायाम करणंही आवश्यक आहे.
अश्वगंधाचे सौंदर्यासाठीचे फायदे
- काळे, घनदाट आणि लांब केस कोणाला नको असतात. हे तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा स्कॅप्ल निरोगी असेल. त्यासाठी वेगवेगळी औषधं, शँपू आणि कंडिशनरप्रमाणेच आयुर्वेदवरदेखील आपण विश्वासा ठेवायला हवा. एनसीबीआयद्वारे प्रकाशित एका शोधानुसार, अनुवंशिक कारण आणि थायरॉईडच्या कारणामुळे केसगळती थांबवण्यासाठी मदत होऊ शकते. अश्वगंधा केसांमधील मेलेनेन वाढवण्यासाठीही मदत करतात, ज्यामुळे केसांचा मूळ रंग टिकवण्यासाठी मदत होते. अश्वगंधाची पेस्ट तुम्ही आंघोळ करण्याआधी साधारण अर्धा तास केसांना लावा त्यानंतर शँपू आणि कंडिशनरने केस धुवा. याचा तुमच्या केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो.
- केसांची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कोंडा. सतत धूळ आणि प्रदूषण असल्याने केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडा होत असतो. तसंच सतत तणाव असल्याने आणि झोप नीट होत नसली तरीही केसांमध्ये कोंडा होतो. वास्तविक असं सेबोरेहिक डर्मेटायटिस त्वचा विकारदरम्यान होते. यामुळे स्कॅल्पमध्ये खाज, लाल रॅशेस आणि कोंडा अशी समस्या निर्माण होते. अशावेळी तुम्ही अश्वगंधाचा वापर करू शकता. यातील अँटीस्ट्रेस गुणांमुळे केसांना फायदा मिळतो. तसंच तणाव कमी करून कोंडा कमी करण्याासाठीही याची मदत होते. तसंच यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असल्याने याचाही फायदा होतो.
-आपले केस पांढरे झालेले कोणालाही आवडत नाहीत. वयाच्या आधी तर पांढरे केस होणं हे नक्कीच चांगलं नाही. त्यामुळे यासाठी अश्वगंधाचा वापर करता येऊ शकतो. हे औषध आयुर्वेदिक असल्याने मेलेनिनचं उत्पादन वाढवते जे तुमच्या केसांचा मूळ रंग ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं. मेलेनिन हा एक प्रकारचे पिगमेंट असतं. जे केसांचा मूळ रंग तसाच ठेवतं. त्यामुळे याचा उपयोग तुम्ही तुमच्या केसांचा काळेपणा जपून ठेवण्यासाठी नक्कीच करू शकता.
टीप : अश्वगंधाची मात्रा चुकीची घेतल्यास, नुकसान होऊ शकतं. यामुळे जंत अथवा उलट्या होण्याची शक्यता असते. गर्भावस्थेत असताना याचं सेवन करू नये. कारण अश्वगंधा हे गर्भनिरोधक म्हणून काम करतं. त्याचा बाळावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.
म्हणून डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक जाणकारांचा सल्ला घेऊन अश्वगंधाचा वापर करावा.