भारतीय सर्व घरात देवाची पूजा कापूर लावून संपन्न केली जाते. अर्थातच हिंदू धर्मात कापूरला फार महत्त्व आहे. सगळेच याबाबतीत जाणून आहेत. तसेच कापूरला आयुर्वेदात देखील महत्त्व आहे. कापूरचे औषधी उपयोग आहेत, हे जाणून घरगुती उपचार करणाऱ्या भारतीय गृहिणींना नक्कीच आनंद होईल. कारण कापूर हे नेहमीच आपल्या घरी सहजतेने उपलब्ध असते. जेणेकरून तुम्ही लगेच आपल्या छोट्या मोठ्या समस्येचे निराकरण करू शकता. चला तर आजीच्या बटव्यात आज जाणून घेऊ कापूर बद्दल.
या वृक्षाबद्दल बऱ्याच लोकांना नीटस माहिती नसेल म्हणून आधी कापूर वृक्षासोबत ओळख करूयात. कापूर हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी फॅमिलीतील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘सिनॅमोमम कॅम्फोरा’असे आहे. सध्या सरळ रुपात कापूरला इंग्लिशमध्ये कॅम्फर म्हणतात. हा वृक्ष मूळचा तैवान, चीन व जपान येथील असून भारतात डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी व म्हैसूर या ठिकाणी त्याची लागवड केलेली जाते.
कापूर वृक्ष भक्कम फांद्यांनी डवरलेला असतो. पाने साधी, एकाआड एक, मध्यम आकाराची, अंडाकृती वा लांबट, साधारण जाड, गर्द हिरवी व चकचकीत असून खालची बाजू निळसर रूपेरी दिसते. पानांच्या बाजूला पिवळसर पांढर्या, सुंगधी व लहान फुलांच्या मंजिर्या येतात. फळ मोठ्या वाटाण्याएवढे व गर्द हिरवे असून पिकल्यावर काळे पडते. झाडाच्या सर्व भागांत बाष्पनशील तेल असते. या तेलापासून कापूर मिळवितात. कापूर हा एक सुवासिक ज्वालाग्राही पदार्थ आहे.
इतर उपयोग :
- कापूर हे सुंगधी, वेदनाहारक, आणि कामोत्तेजक आहे. अनेक औषधांमध्ये आणि नायट्रोसेल्युलोज संयुगे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात.
- मेंथॉलाप्रमाणे ते त्वचेच्या संपर्कात आल्यास थंडगारपणा जाणवतो.
- त्वचेची मलमे, चोळण्याची औषधे तसेच सर्दी दम्यावर नाकाने हुंगून घेणार्या (इंहेलर)औषधांत मेंथॉलाबरोबर कापराचा वापर करतात.
- आशियातील अनेक देशांत त्याचा उपयोग मिठाईमध्ये स्वादासाठी केला जातो.
- तमिळनाडूत अन्न शिजविताना त्याचा उपयोग हिंगाप्रमाणे करतात.
- विविध धर्माचे लोक पूजा तसेच धार्मिक कार्यक्रमात आरती करताना कापूर पेटवितात. मात्र पूजेसाठी वापरला जाणारा कापूर खाण्यास अयोग्य असतो.
औषधी उपयोग :
कापूराचे फायदे अनेक आहेत पण, जास्त करून लोक कापूराचा वापर पूजेत जाळण्यासाठीच करतात. पण कापूरात अनेक औषधी गुण असतात हे अनेकांना माहितच नाही. याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते.
- शरीरावर खाज आल्याने कापूर खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून शरीरावर लावल्यास आराम मिळतो.
- कापूर ऑयली स्किनसाठी खूप फायद्याचा ठरतो. कापूर आणि ग्लिसरीन मिक्स करून लावल्यास पिंपल्स निघून जातात आणि चेहरा ताजातवाणा दिसतो.
- जळालं असेल किम्वा कापलं असेल तर खोबऱ्याच्या तेलात कापूर टाकून लावल्यास आराम मिळतो. याने जळाल्यावर होणारी जळजळ कमी होते.
- कापूराचा उपयोग सर्दी खोकला कमी करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
- खोबऱ्याच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्यास केस गळणे कमी होते.
- जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करुन त्या जखमेवर लावा. कापरात अॅंटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं.
- शरीराचा एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने वेदना दूर होतील. सांधेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापराचा उपयोग केला जाऊ शकतो.
- डॅंड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी कापराचा वापर करता येतो. खोबऱ्याच्या तेलात कापूर मिश्रित करुन याने केसांची मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. हा उपाय लागोपाठ काही दिवस केल्यास फायदा दिसेल.
- जर तुम्हाला कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर ती जागा कापराने स्वच्छ केल्यास फायदा होऊ शकतो. कापराच्या धुराने इन्फेक्शन दूर होऊ शकतं.
- तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काहीवेळ पाय ठेवा.
- दातांमध्ये वेदना होत असतील तर त्या जागेवर कापूर पावडर लावा. याने दातांचं दुखणं लगेच दूर होईल.
हे पण वाचा