प्राचीन आयुर्वेदात ‘ब्राम्ही’ या औषधी वनस्पतीला भरपूर महत्त्व दिले गेले आहे. ब्राम्हीबद्दल आयुर्वेदिक अभ्यासकांना, जडीबुटीवाल्या तज्ञांना, वनस्पतीशास्त्र अभ्यासकांना आणि औषधी वनस्पती अभ्यासकांना माहिती असेल. पण धकाधकीच्या जीवनात व्यस्त असलेल्या व्यक्तींना ब्राम्हीबद्दल माहिती असणे कठीण आहे. मात्र याबद्दल माहिती करून घेणे काही कठीण नाही. आम्ही आहोत ना, आम्ही सांगू तूम्हाला याबद्दल माहिती . थोड्याफार रिकाम्या वेळात तुम्ही तुमच फोन तपासत असताना आपला थोडा वेळ काढून ही माहिती नक्की वाचू शकता. चला तर मग जाणून घेऊयात ब्राम्ही या औषधी वनस्पतीविषयी
ब्राह्मी ही वनस्पती एपिएसी फॅमिलीतील असून तिचे शास्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिका आहे. सेंटेला एशियाटिका या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची आशियाच्या पाणथळ प्रदेशांतील असून विशेषकरून भारतात आणि श्रीलंकेत आढळून येते.
ब्राम्हीची इतर भाषांतील नावे :
- संस्कृत नाव : मण्डुकपर्णी, माण्डुकी,
- लॅटिन नाव : Centella asiatica, Hydrocotyle asiatica,
- कूळ : Apiaceae, Umbelliferae,
- मराठी : ब्राम्ही, कारिवणा,
- हिंदी : ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही,
- गुजराती : ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही,
- इंग्रजी : इंडियन पेनीवर्ट
नीरब्राम्ही या वनस्पतीला देखील ब्राम्ही म्हणून ओळखले जाते. चरकसंहिता, अथर्ववेद आणि सुश्रुतसंहितेत या नीरब्राह्मीचा उल्लेख ब्राह्मी असा केला गेला असल्यामुळे तिला देखील ब्राह्मी म्हटले जाते. प्राचीन काळात वेदांचा अभ्यास करणारे अभ्यासक स्मरणशक्ती वाढविण्यासाठी या वनस्पतीचा वापर करीत, असा उल्लेख आहे. तिच्या सेवनाने मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि कंपवाताच्या विकारांसारखे विकार टाळता येऊ शकतात, असे काही संशोधनांतून निदर्शनास आले आहे.
औषधी उपयोग :
- त्वचेच्या विकारांवर आणि कुष्ठरोगावर ब्राह्मी गुणकारी असते.
- चेतासंस्थेच्या विकारांवर ब्राम्ही प्रभावी समजली जाते. स्मरण -शक्ती वाढविण्यासाठी जी औषधे बाजारांत उपलब्ध असतात, त्यांमध्ये ब्राह्मीचा वापर करतात.
- नीरब्राह्मी वनस्पती मूत्रल आणि रेचक आहे. तिच्यापासून ब्रह्माइन हे अल्कलॉइड मिळते. ते सौम्य विषारी आहे. नीरब्राह्मीच्या पानांचा रस संधिवातावर लावतात.
- ब्राम्हीचा जत्रुवर (मानेच्या वरील रोग) फारच उपयोग होतो.
- मेंदुला शांत ठेवायचे कार्य ब्राम्ही कडून फार चांगल्या तर्हेने होते.
- ब्राम्ही मेंदुसाठी पुष्टीदायक आहे. डोक्यास लावावयाचे तेलात याचा वापर करतात.
- केसांच्या वाढीसाठी ब्राम्हीचा उपयोग होतो.पानांचा रस तेलात घालून लावल्यास केसांना चमक येते, केस वाढतात.
- स्मरणशक्ती सुधारण्यासाठी रोज पाच-सहा पाने खावीत. अपस्मार, फिट येणे किंवा झोप येत नसेल तर ब्राम्हीची पाने किंवा रस घ्यावा.
- आमवातावर ब्राम्हीचा रस सांध्यावर लावतात.
- मानसरोगात ब्राम्हीचा रस उपयुक्त आहे.
- डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा अवलेह उपयुक्त आहे.
- ब्राम्ही शरीरातील सात ही धातूंचे पोषण करते व रसायन
कार्य करते.
(टीप: मात्र ही वनस्पती वैद्यकीय सल्ल्याने वापरा.)
इतर उपयोग
काही ठिकाणी कढी, आमटी इत्यादींमध्ये पानांचा वापर करतात.