आज्जीचा बटवा : जाणून घ्या, देवघरात असणाऱ्या चंदनाचे आरोग्यासाठी फायदे…

0

लहानपणी आपण बऱ्याचशा कथा ऐकल्या असणार. जर कथा नाही ऐकल्या तर पुस्तकातील धड्यामध्ये “चंदन लावल्यावर लोखंडाचे अवजार सोन्याचे झाले” असे तर नक्कीचं वाचले असणार. फक्त ‘चंदन’ असे म्हटले जरी तरी तुम्ही तुमच्या आसपास किंवा स्वतःमध्ये शीतलतेचा अनुभव करू शकता. चंदन आणि परीस हे प्रत्येक देवघरामध्ये तुम्हाला नक्की सापडतील. चंदनाचा लेप करून त्याचा वेगवेगळया कार्याकरिता वापर होतो. चंदनाचा वापर हा औषधी उपयोग म्हणून तर केला जातोचं. पण याचे सौंदर्यासाठी पण बरेच उपयोग आहेत. चला तर परिचय करूयात शीतलता प्रदान करण्याऱ्या चंदन औषधी वनस्पतीसोबत….

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो.

सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला ‘चंदन’ एक वृक्ष आहे. हा वृक्ष सँटॅलेसी फॅमिलीतील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्येही हा लागवडीखाली आहे. मात्र त्याचे लाकूड कमी प्रतीचे असते. भारतात चंदनाची ‘सँटॅलम आल्बम’ ही जाती आढळते.

कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो.

याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तेलासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.

चंदन उगाळून याचा लेप शरीराला लावण्याची पद्धत आहे. याचा वापर औषधी म्हणूनही करतात. माणसांना व देवाच्या मूर्तीला चंदनाच्या खोडाचा तुकडा उगाळून बनलेले गंध लावतात.

चंदनाचे चारोळीसारखी असणारे फळ पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चंदनाच्या बियांपासून लवकर सुकणारे कोरडे तेल (ड्रॉइंग ऑईल) मिळते. हे तेल इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात.

खोड आणि बियांप्रमाणेच चंदनाच्या मुळांमध्येही तेलाचा अंश असतो. चंदनाचे लाकूड आणि तेल यांचा फार पूर्वीपासून औषधात वापर होत आला आहे. चंदनाच्या तेलात 90% सँटॅलॉल असते. त्यामुळे या तेलाला गंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. लाकुड गर्द पिंगट व सुगंधी असते. बाहेरचा भाग पिवळा असून आतील भाग पांढरा असतो व त्याला वास नसतो. साधारणत: वीस ते साठ वर्षांच्या झाडाच्या खोडात भरपूर तेल असते. ते मिळविण्यासाठी झाड मुळापासून खणून काढतात. मुळांमध्येही तेल असते.

चंदनाच्या लाकडाला वाळवी लागत नाही. त्यापासून कोरीव काम केलेल्या वस्तू बनवितात. झाडाची साल व रसकाष्ठ काढून सोटाचे लहान ओंडके करतात. लाकडाचा भुसा धुपाकरिता, कपडयात व कपाटात वासाकरिता ठेवतात. लाकडापासून मिळविलेले तेल फिकट पिवळसर असते. ते चिकट असून त्याला टिकाऊ गोड वास असल्यामुळे अत्तरे, सुगंधी तेले, सौंदर्यप्रसाधने, साबण इत्यादींसाठी मोठया प्रमाणात वापरतात.

चंदनाचे औषधी आणि सौंदर्यासाठी उपयोग

चंदन फक्त थंडावाच देत नाही तर हे एक औषधही आहे. कोरड्या शुष्क त्वचेसाठी चंदन वरदान आहे. चंदनाचा वापर साबण, डिटर्जेंट, कॉस्मेटिक, परफ्यूम, आफ्टर शेव, उदबत्ती बनवण्यासाठी केला जातो. चंदनाचे तेल व पावडरही बाजारात मिळते.

  • चंदन पावडर पाण्यात उकळून घ्यावी व अंघोळीच्या पाण्यात हे पाणी मिसळून अंघोळ केल्याने संपूर्ण दिवस शरीर ताजेतवानं राहते.
  • चंदनाचे लाकूड व तेल शीतल, ज्वरनाशक, मूत्रल, कफ काढून टाकणारे आहे.
  • भाजलेल्या जागी, ताप आणि डोकेदुखीवर चंदनाचा लेप लावतात.
  • उन्हाळ्यात चंदनाचा लेप त्वचेवर लावल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्याचबरोबर शरीर दिवसभर सुगंधित राहते.
  • गुलाब पाण्यात चंदन टाकून त्याचा लेप लावल्याने पिंपल्स येत नाहीत.
  • कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवावी व ही पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो.
  • आगीमुळे शरीर भाजले असेल तर त्या ठिकाणी चंदनाला तुपात मिसळून लावल्याने शरीराची दाह कमी होण्यास मदत होते व जखम लवकर भरते.
  • चंदन व मध मिसळून डोळ्यांच्या खाली लावल्यास काळे डाग दूर होतात.
  • कोरड्या त्वचेला चंदनाच्या तेलाने मॉलिश केल्याने त्वचा नितळ बनते.
  • उन्हाळ्यात होणार्‍या घामोळ्यांवर चंदनाचा लेप लावल्याने घामोळ्या लवकर बर्‍या होतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.