मेहंंदीचा उपयोग स्त्रिया फार पुरातन काळापासून सौंदर्य प्रसाधन म्हणून करत आल्या आहेत. मेहंंदीच्या पानांचा लेप बनवून किंवा पावडर बनवून सौंदर्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मेहंंदीच्या लेपने कार्यक्रमांमध्ये हातावर डिझाईन बनवतात. यासाठी बाजारात मेहंंदीचे कोनदेखील उपलब्ध आहेत. केस रंगवण्यासाठी मेंदीच्या पावडरचा वापर केला जातो. यासाठी बाजारात रसायनयुक्त मेहंंदीचे पॅकेट्स मिळतात. बाजारात खुली रासायनमुक्त मेहंंदी पावडरसुद्धा उपलब्ध आहे. ही पावडर केसांना लावल्यावर केसांना पोषण मिळते.
इतकेच नाही तर मेहंंदी त्वचेकरता देखील फार उपयुक्त आहे. खेडेगावांमध्ये ताज्या मेहंंदी लेप चेहऱ्यावर लावतात यामुळे चेहऱ्यावरील त्वचा मुलायम बनते. पण तुम्हाला माहिती आहे का?, सौंदर्यासाठीच नाही तर आधी घरगुती औषधी म्हणून देखील मेहंंदीचा वापर करत होते. चला तर मग औषधी वनस्पती म्हणून मेहंंदीची ओळख करूयात…
नाही नाही! सौंदर्य तुमचा आवडीचा विषय आहे, हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे मेहंंदीच्या सौंदर्यासाठीच्या उपयोगांसोबत देखील आम्ही तुम्हाला परिचित करणार आहोत.
शास्त्रीयदृष्ट्या मेहंंदीचा समावेश ‘लिथ्रेसी’ (Lythranceae) फॅमिलीमध्ये होतो. तिचे शास्त्रीय नाव ‘लॉसोनिया इनरमिस’ आहे. लॉसोनिया प्रजातीत ही एकमेव जाती आहे. तिला ‘लॉसोनिया आल्बा’ असेही म्हणतात. मेहंंदी मूळची उत्तर आग्नेय आशिया आणि उत्तर आफ्रिका येथील असून भारत व इतर काही उष्ण देशांत ती लागवडीखाली आहे. आफ्रिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा, पाकिस्तान, इजिप्तपासून आखाती देशापर्यंत प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशातले हे झाड भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते.
मेहंंदीची रोपे बियांपासून तसेच कलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. वाळवंटी प्रदेशातले झाड असले तरी ते समुद्रकिनारीही छान वाढते. मुळे बर्यापकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही.
मेहंंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. पाने साधी समोरासमोर असतात. या झुडपांना एप्रिल ते जुलै या महिन्यांत पांढर्या किंवा गुलाबी रंगाची सुवासिक फुले येतात. फुलांपासून बनलेले बोंड गोलाकार व बाहेरून शिरायुक्त असते. मेहंंदीच्या पानांमध्ये ‘लॉसोन’ हे रसायन असते ज्याला ‘हेन्नोटॅनिक आम्ल’ असेही म्हणतात. हेन्नोटॅनिक आम्लामुळे त्वचेला किंवा केसांना रंग येतो.
इतर उपयोग
- मेहंंदीचा वापर सौंदर्यप्रसाधनाबरोबरच वस्त्रोद्योगात कापड रंगविण्यासाठीही करतात. पिवळा, तांबडा, पगट, शेंदरी असे रंग विविध पदार्थाच्या मिश्रणाने तयार करून वापरले जातात.
- मेहंंदीची झाडे काटेरी असतात आणि गुरे या झाडाची पाने कडू असल्याने खात नाहीत, त्यासाठी ही कुंपणासाठी लावतात.
- मेहंंदीचे लाकूड कठीण असून त्याचा वापर हत्यारांचे दांडे करण्यासाठी करतात.
- मेहंदी कढण्याला अतिशय महत्व आल्याने आजकाल ही कला व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषत: स्रियांसाठी हा एक सोयिस्कर व घरबसल्या करण्याचा उद्योग ठरला आहे.
औषधी उपयोग
मेहंंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्व आहेत.
- मेहंंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात.
- मेहंंदीच्या सालीच्या काढ्याने मुतखडा दूर करता येतो. -मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.
- मेहंंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे.
- घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेहंंदीची पाने घातली जातात.
- पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातली अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेहंंदी डोक्याला किंवा पायाला लावतात.
- मेहंंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो.
सौंदर्य वनस्पती म्हणून उपयोग
- मेहंंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हीना किंवा मेहंंदीतेल म्हणतात.
- मेहंदीच्या पानांचा उपयोग रंगविण्यासाठी मुख्यत: केला जातो. स्रियांच्या शृंगारात मेहंदीला प्राचीन काळापासून एक विशिष्ट स्थान आहे. पानांना सुकवून त्याची केलेली पावडर बाजारात सर्वत्र मिळते.
- मेहंंदीच्या पानांपासून नारिंगी रंग मिळतो. तो रंग तळहात, तळपाय, केस, दाढी, नखे रंगविण्यासाठी, तसेच चामडे, लोकर, रेशीम इत्यादी रंगविण्यासाठी वापरतात.
- निळीबरोबर हा रंग काळा होतो. बाजारात जी काळी मेहंंदी मिळते, ती बहुधा मेहंंदी व नीळ यांच्या मिश्रणातून तयार करतात.
- मेहंंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असून त्यांना वाफवून त्यांपासून सुगंधी तेल मिळवितात. या तेलाला हिना किंवा मेहंंदी तेल म्हणतात. ते अत्तरांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात.
केस रंगविण्यासाठी
मेहंदीची पावडर, लिंबाचा रस, आवळा पूड, चहाचे पाणी हे सर्व रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून, सकाळी केसांना लावावे व 2 – 3 तासांनंतर कोमट पाण्याने धुवावे. केस नैसर्गिकरित्या रंगतात सतेज व मुलायम होतात.
हात व पाय सजविण्यासाठी
पूर्वी काही विशिष्ठ समाजात किंवा प्रांतात उदा. राजस्थान, गुजराथ इ. लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात स्रियांनी, विशेषत: नववधुनी मेहंदीने हात सजविण्याची रीत होती. पण आजकाल मात्र संपूर्ण भारतभर शुभकार्यात मेहंदी काढण्याची प्रथा फार प्रचलित झाली असून, मेहंदीचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम प्रत्येक लग्नकार्यात अगदी आवर्जून असतो. अत्यंत सुंदर नक्षीदार नक्षीने नववधू व इतरांचे हात व पाय रंगलेले दिसतात.