fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

आज्जीचा बटवा : फोडणीत तडतडणाऱ्या मोहरीचे असे आहेत औषधी गुणधर्म, वाचून व्हाल थक्क !

मोहरी दररोज भारतीय स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरली जाते. भारतीयांच्या खाण्यात येणारी ही एक पालेभाजी सुद्धा आहे. हिंदीमध्ये मोहरीला सरसो म्हणतात. माहिती आहे तुम्हाला आता शाहरुखच्या ‘DDLJ’ मुव्हीमधील ‘सरसो के खेत’ आठवले असेल. हो आम्ही त्याच सरसो बद्दल सांगत आहोत. पण सरसोचे औषधी उपयोगही आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? क्वचितच लोकांना हे माहिती असतील.  सरसोच्या तेलाबद्दल तुम्ही नक्की ऐकून असाल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये शारीरिक स्वास्थ्य राखणारे गुणधर्म अधिक आढळतात. त्यामुळेच याचा पदार्थांमधून वापर करण्यात येतो. जेणेकरून पोटात हे तेल जाऊन संपूर्ण शरीराला याचा फायदा मिळू शकेल.  चला तर बहुगुणी मोहरीच्या व सरसोच्या वनस्पतीबद्दल घेऊयात थोडीशी माहिती….

भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. शास्त्रीय नाव Brassica juncea असे आहे. तर हिला इंग्रजीत Leaf Mustard म्हणतात. विशेष करून पंजाबी लोक ही भाजी आवडीने खातात. ‘सरसो का साग, मक्के दि रोटी’ ही पंजाबी लोकांची आवडती डिश आहे.

याचाच दुसऱ्या प्रकारच्या भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. मोहरीपासून तेलसुद्धा काढतात. विशेषत: उत्तर भारतात स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरतात व ते तेल अंगाला-डोक्याला लावतात. मोहरीची लागवड भारतात सर्वत्र होते.

मोहरी दोन प्रकारच्या असतात. आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात मिळणारी तांबूस- भुरकट व लहान असते तर पंजाब उत्तर प्रदेशात मिळणारी मोहरी तांबूस-काळपट व मोठी असते. तिला ‘सरसू’ या नावाने ओळखले जाते.

औषधी उपयोग :

मोहरी प्रत्येक घरात असतेच. कारण बर्‍याच आजारांवर तिचा औषधी उपयोगही होतो.

 • मोहरी अधिक उष्ण असते. टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो.
 • दात दुखत असतील तर मोहरीचा काढा तयार करून त्याच्या गुळण्या कराव्यात.
 • शरीरावर झालेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचे चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने आराम पडतो.
 • संधीवाताला सरसोचे तेल फार गुणकारी आहे.
 • लकवा, कंबरदुखी आणि चिकुनगुनियाच्या रूग्णांच्या हातापायांना सरसुच्या तेलाने मालिश करावी.
 • बाळंतीण बायकांची देखील सरसुच्या तेलाने मालिश करतात. कारण ते अधिक उष्ण असल्याने वाताचे शमन करते.
 • थंडीच्या दिवसात लहान मुलांची सरसुच्या तेलाने झोपण्याआधी दररोज मालिश करावी. याने शरीरात ऊब निर्माण होऊन सांधे, हाडं मजबूत होतात.
 • आपल्या दररोजच्या आहारात जिरे व मोहरी थोड्याफार प्रमाणात वापर करावा. याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात.

सौंदर्यासाठी फायदे :

मोहरीच्या तेलाने त्वचेला अधिक चांगले फायदे मिळतात.

 • त्वचेतील मॉईस्चराईजर बऱ्याचदा कमी होत असते. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय म्हणून मोहरीचे तेल वापरू शकता. किमान आंघोळीच्या आधी अर्धा तास हे तेल अंगाला लाऊन ठेवा आणि नियमित याचा वापर केल्यास, तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.
 • विशेषतः वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक म्हणून मोहरीच्या तेलाचा उपयोग करून घेता येतो. यात अँटीएजिंग प्रॉपर्टीज असतात.
 • शरीरामध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. सुरकुत्या असतील तर ही समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येतो.
 • केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यासाठी उपयोग होतो. यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल प्रभाव असतो जो केसातील कोंडा मिटविण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे स्काल्पमध्ये येणारी खाजेच्या समस्येपासूनही सुटका मिळते. केसांसाठी मोहरीच्या तेलाचा खूपच फायदा होतो.
 • त्वचेवर येणारे टॅनिंग कमी करण्यासाठी मोहरी तेलाचा उपयोग करून घेता येतो. टॅनिंगने त्वचा काळसर होते. मात्र मोहरीच्या तेलाने हा काळसरपणा काढून टाकता येतो. नियमित या तेलाने त्वचेला मालिश केल्यास, टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
 • मोहरीच्या तेलात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. यामध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सूज येण्याशी निगडीत असणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते.
 • मोहरीचे तेल हे एक उत्तम मॉईस्चराईजर आहे. त्यामुळे फाटलेल्या ओठांवरही मोहरीचे तेल मॉईस्चराईजरप्रमाणे काम करते. यातील गुणधर्म तुमच्या ओठांवरील त्वचेसाठी उत्कृष्ट ठरतात. मोहरीच्या तेलाने ओठांना कोणतेही नुकसान होत नाही तर तुमचे ओठ मऊ राखण्यास मदत मिळते.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here