आज्जीचा बटवा ! औषध म्हणून बेलाला आयुर्वेदात विशेष महत्व, तुम्हाही घ्या जाणून
शंकराचे पूजन करताना आपण बेलाची पाने वाहतो. मात्र शंकराच्या पूजेला बेलाचीचं पाने का ? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का ? हो, हो तुम्हाला बेल शिवप्रिय असल्याचे माहिती आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण बेलाचे इतर महत्त्व देखील जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीचं हरकत नाही, हेसुद्धा आम्हाला माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊयात बेलाचे औषधी आणि धार्मिक महत्व
आयुष्याला संपूर्णपणे ओळखणारी प्रणाली आयुर्वेदात आहे. आरोग्यवर्धक औषधी वनस्पतींचे अध्ययन यामुळेचं आधीपासून सुरु आहे. बेल वृक्ष हा सर्व देवदेवतांना खूप प्रिय आहे. सर्व भाग औषधी व अत्यंत गुणकारी आहेत. बेलाचा अर्थ आहे “जो रोगाचे हरण करतो तो.” बेल हा एक यज्ञीय पवित्र व कश्यप सृष्टीतला लक्ष्मीच्या तपाचरणाने व सामर्थ्याने उतपन्न झालेला सौख्य, समृद्धी, धनधान्य, वृध्दीदायी, मनोकामना पूर्ण करणारा व शांतीचे प्रतीक असा हा शिवप्रिय वृक्ष आहे.
शिवपूजेसाठी बेलाला विशेष मान
बेलाचे त्रिदल शिवाला अत्यंत प्रिय आहे. बेलावाचून महादेवाची पूजाच होत नाही. महाशिवरात्री व सोमवारी तसेच दररोज ही शिवलिंगावर वाहिलेली बेलाची तीन पाने रज, सत्व व तम दर्शन घडवतात. या तीन दलांत ज्ञान,कर्म व शक्तीचा संगम झाला आहे. म्हणूनच शंकराच्या पूजेसाठी मन, वाणी आणि काया या त्रिरूपाने समरस होऊन केलेल्या चिंतनातून सत्य, शिवकल्याण व समृद्धीची अनुभूती घडते.
जेष्ठातील शुक्ल पौर्णिमा, जेष्ठ नक्षत्र व मंगळवारी तीळमिश्रती पाण्याने स्नान करून गंध लावून बेलाची श्रद्धायुक्त मनाने पूजा बांधतात. बेल धार्मिक समारंभात दिमाखाने मिरवतो त्याप्रमाणे रोगाचाही नाश करतो. बेलाचे वर्गीकरण रुटीयेसी फॅमिलीत केले आहे. बेलाचे पंचांग म्हणजे सर्व अवयव जसे मूळ, फांद्या, पाने, फुले व फळे औषधी आहेत. बेलाचे पिकलेले फळ एक उत्तम टॉनिक असून हृदय तसेच मेंदूवर अत्यंत गुणकारी आहे. कच्चे फळ पाचक असून अतिसारावर प्रभावी आहे.
भारतात बहुतेक देवळाभोवती बागेत एक पवित्र वृक्ष म्हणून बेलाची लागवड करतात. वृक्षायुर्वेदानुसार भगवान शिवप्रिय बिल्ववृक्ष ज्या घरात असतो तेथे धनसंपदाची देवी लक्ष्मी पिढ्यान पिढ्या वास करते. कथेनुसार विदेहसचा राजा वासुमनने तिरुदायमरुथर येथील देवळात बेलाची नित्यनेमाने पूजा अर्चा केल्याने त्याला गेलेलं राज्य परत मिळाले. बेल अस्सल भारतीय कुलोत्पन्न धार्मिक व औषधी वृक्ष आहे. असे म्हणतात, बेल हा शंकर स्वरूप, कल्याणकारी, स्मरणशक्तीवर्धक, हृदयाला बळकटी देणारे अमृत आहे.
बेलाचे औषधी उपयोग
बेलामध्ये असलेल्या विशिष्ठ आरोग्यवर्धक घटकामुळे उपचारत्मक म्हणून बेल फळ ओळखले जाते.
- मधुमेह विरोधी: मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे. रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो. किंवा २५० मिली ग्राम प्रती किलो ग्राम शरीराच्या वजनानुसार बेल फळाचा अर्क घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येतो कारण (coumarins) नावाचा घटक बेल फळामध्ये असल्यामुळे इन्सुलिन निर्माण करण्यासाठी बीटा पेशीला उत्तेजित करतो.
- बद्धकोष्ठता: योग्य परिपक्व फळ सर्वोत्तम रेचक मानले गेले आहे. पिकलेले फळे २ ते ३ महिने नियमितपणे खाल्यास जड पदार्थ काढण्यात प्रभावी आहे.
- अपचनापासून मुक्ती: पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ रामबाण औषध आहे. बहुतांश रोगांची सुरुवात पोटापासून होत असते. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे. पुढचे मोठे आजार टाळणे शक्य आहे.
- रक्तक्षयविरोधी: बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात. अशा परिस्थितीत वाळलेल्या बेलाच्या गराचा चूर्ण तयार करून गरम दुधात रोज एक चमचा शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.
- गर्भवती महिलांसाठी: गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे. त्यापासून गर्भवती महिलांना आराम मिळतो. मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
- ऊन लागल्यास: जागतीक तापमानवाढीमुळे दरवर्षी पारा उन्हाळ्यात वाढत जातो. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. अशा वेळी बेलाचा शरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो.
याचबरोबर इतर आजारात अनेक रोगावर बेल फळ रामबण उपाय म्हणून वापरले जाते जसे की मलेरिया विरोधी, व्रणविरोधी, कर्करोगविरोधी, जीवाणू विरोधी, आणि कावीळ इत्यादी रोगावर बिल्ववृक्षाचा झाडांच्या जवळजवळ सर्व भाग उदा. मूळ, झाडाची साल, पाने, फुले किंवा फळे एक किंवा इतर मानवी आजार बरा करण्यासाठी वापरतात.