सुक्या मेव्यामध्ये सर्वात जास्त काही खाल्ले जात असेल, तर ते म्हणजे ‘बदाम’. स्मरणशक्ती वाढवायची आहे? दुधासोबत मुलांना बदाम द्या. केस पातळ झाले आहेत, केसगळतीची समस्या होत आहे? तर बदाम तेलाचा वापर करा. रात्री बदाम पाण्यात भिजवून ठेवा, आणि सकाळी उठून ते खावे, असा सल्ला स्वतः डॉक्टर्स देतात. बदाम भिजवलेले पाणी देखील केसांसाठी गुणकारी असल्याचे मानले जाते. असे बदामाचे अनेक फायदे आहेत. म्हणून आज्जीच्या बटव्यात बदामाला सुद्धा भरपूर महत्त्व आहे. बदामाचे आरोग्यासाठी फायदे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. पण बदामाचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला माहित नाहीत. पण काळजी करू नका बदामाच्या सर्व महत्त्वाच्या फायद्यांशी आम्ही तुमची ओळख करून देणार आहोत. चला तर करूयात थोडा परिचय बदामा सोबत….
बदाम हा वृक्ष रोझेसी फॅमिलीतील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘प्रूनस डल्किस’ हे आहे. बदाम वृक्ष मूळचा इराणमधील असून त्याचा प्रसार इतरत्र झाला आहे, असे मानले जाते. यूरोप, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. गोड बदाम आणि कडू बदाम असे बदामाचे दोन प्रकार आहेत. ‘प्रूनस डल्किस डल्किस’ या जातीच्या बिया गोड आणि ‘प्रूनस डल्किस अमारा’ या जातीच्या बिया कडू असतात. “कडू आणि गोड बदाम असे दोन प्रकारसुद्धा आहेत”, याबद्दल तुमच्यातील काही जणांना आज पहिल्यांदाच समजले असेल.
आता जाणून घेऊयात बदामाचे आरोग्यासाठी फायदे…
- शरीरात कोलेस्ट्राॅलचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झाले तर नियमित बदामाचे सेवन केल्याने फायदा होतो.
- वजन कमी करण्यासाठी बदाम लाभदायी मानला जातो.
- शरीरातील चरबी कमी करण्यासाठी बदाम लाभदायी आहे. यात कमी कॅलरी असतात व हे एक नैसर्गिक पोषक असल्यामुळे डायटिंगमध्ये याचे सेवन करणे लाभकारी आहे.
- जास्त भुकेची समस्या दुर होते. दिवसभरात 2, 3 बदाम खाल्ल्याने फार भुक लागत नाही. त्यामुळे खाणे कमी होऊन वजन वाढण्याची समस्या दूर होऊ शकते.
- बदाम मध्ये जीवनसत्व ई असते त्यामुळे शरीरात ह्नदयासंबंधी रोगांपासुन बचाव होतो.
- रात्रभर दुधात भिजवुन ठेवलेले बदाम सकाळी मुलांना दिल्यास त्यांच्या बुध्दीचा विकास चांगला होतो. लहान मुलांची बौध्दिक कार्यक्षमता वाढते. स्मरणशक्ती मजबुत होते, निर्णयक्षमता वाढते.
बदामाचे सौंदर्यासाठी उपयोग :
- बदाम तेलाचा वापर केसांसाठी पोषक मानला जातो. केसाची काळजी घेण्यासाठी हे उत्तम मानल्या जाते.
- बदामाची पावडर बाॅडी लोशन आणि कोल्ड क्रिम म्हणूनही वापरता येते. कच्च्या दुधात याची पेस्ट करून त्वचेवर लावल्यास त्वचा कोमल व चमकदार बनते.
- चेहऱ्यावर बदाम पावडर व मध आणि कच्चे दुध मिसळून लावल्यास थंडीत चेहरा कोमल व ताजातवाना होतो.
- बदामाचे तेल उत्तम जीवनसत्व ई युक्त स्त्रोत मानले जाते त्यामुळे केसांच्या विविध व्याधींवर बदामतेल फार प्रभावी मानले जाते.
- बदामाचे लोशन व क्रिम सर्व ऋतुंमध्ये त्वचेचे पोषण करते आणि त्वचेस स्वस्थ व आकर्षक बनवते.
- त्वचा संक्रमणात बदाम पावडर व तेलाचा वापर विविध आयुर्वेदीक औषधीमध्ये केला जातो.