fbpx

भारतीय समजल्या जाणाऱ्या ‘या’ भाज्यांना असा आहे विदेशी इतिहास, तुम्हीही घ्या जाणून…

0

भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर नेहमीच पाश्चात्य देशांचा आणि अनेक संस्कृतींचा ठसा उमटला आहे. भारताला जगात खाद्य संस्कृतीवरून ओळखले जाते. भारतीयांच्या जेवणात असणारे विविध पदार्थ हे अनेक विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र तुम्हाला माहितीये का जेवणात किंवा पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक भाज्या आपल्या कृषी संस्कृतीत या विदेशातूनच आल्या आहेत. अनेक देशी नसलेल्या वनस्पती भारतीयांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनून गेल्या. अश्याच काही वनस्पतीचे भारतात आगमन कसे झाले याबाबत आज आपण जाणून घेऊया

मिरची :- आता मिरची परदेशातून आपल्याकडे आली यावर मुळीच आपला विश्वास बसणार नाही. भारतीय जेवणात मिठाइतकेच मिरचीला देखील महत्त्व आहे. पूर्वी भारतीय अन्न तिखट व मसालेदार बनवण्यासाठी काळ्या मिरी चा वापर केला जायचा. परंतु म्हणतात कि वास्को – द -गामा हा पोर्तुगीज नाविक भारतात आला तेव्हा मिरचीचे बियाणे भारतात घेऊन आला. अश्या प्रकारे पोर्तुगीजांमार्फत मिरचीचा भारतात प्रवेश झाला. असही म्हटले जाते की, भारतातील काळ्या मिरीच्या व्यवसायावर ईस्ट इंडिया कंपनी ला कब्जा मिळवायचा होता आणि येथे मिरचीचा वापर सुरु. नंतर भारतीयांच्या लक्षात आले कि मिरची मिरी पेक्षा स्वादिष्ट आहे. पुढे मिरचीने काळीमिरीचे स्थान घेतले आणि मिरचीने भारतीय खाद्य संस्कृतीत आपले स्थान अटळ केले आहे.

chili

 

टोमॅटो :- जगातले बरेच देश टोमॅटोचा वापर आपल्या डिशेसमध्ये मुख्य घटक म्हणून करतात. परंतु हे टोमॅटो नक्की आले तरी कुठून? पूर्वी असे नव्हते. इटलीमध्ये १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात टोमॅटो चा वापर केवळ सजावटीसाठी केला जायचा. तर अमेरिकन लोकांचा १८३५ पर्यंत टोमॅटो विषारी आहेत असा विश्वास होता. पूर्वी टोमॅटोला जेवणात एवढे महत्त्व नव्हते. कदाचित म्हणूनच कि काय स्पेन मध्ये टोमॅटिना सारखा फेस्टिवल साजरा केला जायचा. टोमॅटो मूळचे अमेरिकेतील आहे. १६ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोर्तुगीजांच्या मार्फत ही वनस्पती भारतात आली. तीव्र दवं नसलेल्या उबदार वातावरणात हे पिक जोमाने येत असल्याने टोमॅटो भारतीय मातीत प्रसिद्ध झाले आणि आता टोमॅॅटो भारतीय पाककृतीचा एक महत्त्वाचा घटक बनले.

tomato (2)

 

बटाटा :- भारतात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये बटाट्याचे नाव हे असायलाच हवे. बटाटा असल्याशिवाय भारतीयांचे स्वयंपाकघर अपूर्णच आहे. पण हा बटाटा भारतीय नाही. बटाटा प्रथम इ.स.पूर्व ५००० च्या दरम्यान आधुनिक काळातील दक्षिण पेरू आणि अत्यंत वायव्य बोल्व्हिया या प्रदेशात आढळला गेला. तेव्हापासून तो जगभरात पसरला. आणि भारतासारख्या बऱ्याच देशांंमधील स्वयंपाकघराचा महत्त्वाचा भाग बनला.

potato (1)

 

भुईमूग(शेंगदाणा) :- शेंगदाणा हा भारतीयांच्या पाककृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कित्येक पदार्थांची कल्पनाही आपण याच्याशिवाय करू शकत नाही. पण हा शेंगदाणा मूळचा भारतीय नसून त्याची उत्पत्ती दक्षिण अमेरिकेतून पुढे युरोप, आफ्रिका आणि पॅसिफिक बेटांवर आणि नंतर दक्षिण पूर्वेकडील अमेरिकेत पसरली. या शेंगदाण्याला भारतात आणण्याचे श्रेय स्पॅनिश लोकांना जाते. स्पॅनिश खलाश्यांनी दक्षिण अमेरिकेतून पूर्वेकडील आशिया गाठले. तेथून स्पॅनिश लोकांद्वारे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या पूर्व किनाऱ्यावरून भारतात आले. अश्यारीतीने हा शेंगदाणा भारतात येऊन पोहचला.

Peanuts (1)

 

मका (कॉर्न) :- तांदूळ आणि गहू नंतर भारतात मका हे तिसऱ्या क्रमांकाचे धान्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे हे धान्य मूळचे भारतीय नाही. तरीही भारतात मक्याच्या पिठाच्या पोळी पासून ते मक्याच्या उपम्यापर्यंत अनेक चविष्ठ पदार्थ बनवले जातात. सर्वसाधारण असे मत आहे की, मका प्रथम अमेरिकेत विकसित झाला तेथील मेक्सिकोमध्ये याची उत्पती झाली आणि ११ व्या ते १२ व्या शतकात तो भारतात आला.

corn (1)

असेच अनेक भाज्या, फळे, धान्य ज्यांना आपण भारतीय म्हणवतो ते मूळचे वेगवेगळ्या प्रांतांमधून भारतात आले आणि भारतीय बनले. याचप्रमाणे ढबु मिरची, विविध प्रकारच्या शेंगा, काजू,पपई, अननस, सीताफळ, पेरू,चिकू यांसारखी फळे दक्षिण अमेरिकेतून भारतात आले. आणि भारतीय पाककृतीचा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनले.

-गीतांजली काकडे 

Leave A Reply

Your email address will not be published.