मृत्यूनंतरही हेटाळणी थांबत नाहीच… ‘त्यांच्या’ अंत्यसंस्काराचा विधी हेच दाखवून देतो

0

तृतीयपंथी म्हटले की लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलतात. अंगाशी लगट करणारे, मेकअप केलेले, टाळ्या वाजवत सिग्नलवर पैसे मागणारे लोक डोळ्यासमोर येतात. जास्तीत जास्त म्हणजे सिनेमांमध्ये नाचगाणी करणारे लोक आठवतात.

पण आपल्याच समाजातला एक घटक किंवा नैसर्गिकपणे आपल्याहून जरा वेगळे जन्मलेले पण आपल्यासारखे माणूसच असणारे कुणीतरी असा विचार पटकन कुणाच्या मनात येत नाही.

म्हणूनच प्रत्यक्षात सुद्धा त्यांना अमानवी वागणूक मिळते. छेडछाड, बलात्कार, मारहाण या तर नेहमीच्या घटना. पण जेव्हा त्यांचे सगळेच अधिकार नाकारले जातात, स्वतःच्या कष्टाने रोजीरोटी मिळवण्याची तयारी असतानाही काम मिळत नाही तेव्हा सगळेच मार्ग बंद होतात.

अशाप्रकारे आपणच त्यांना भिक्षा मागायला, वेश्या व्यवसाय करायला भाग पाडतो.

तृतीयपंथीयांना जन्मभर हेळसांड सहन करत जगावे लागते. त्यांचे माणूस म्हणून असणारे सर्व अधिकार नाकारले जातात. आधीच असे जगणे म्हणजे त्यांना तृतीयपंथीयाने जन्म घेणे ही मोठी शिक्षा असते असे वाटते. या शिक्षेत भर म्हणून की काय मृत्यूनंतरही या पंथाला यातना सोसाव्या लागतात.

सामान्यतः माणसांच्या मृत्युनंतर काय होते? तर, त्यांच्या जवळील व्यक्ती शोक करतात, रडतात. त्यांची अतिशय दुःखात अंत्ययात्रा निघते.

त्या व्यक्तीच्या धर्माप्रमाणे त्याच्या देहाला दफन केले जाते वा अग्नी दिला जातो. तत्पूर्वी सगळे त्या पार्थिवाचे दर्शन घेतात. जवळील लोक शेवटचे त्या व्यक्तीला बघतात, त्याची सेवा करतात.

परंतु तृतीयपंथीयाच्या मृत्युनंतर अगदी याउलट केले जाते. एका तृतीयपंथियाच्या मृत्युनंतरही त्याची कशी हेळसांड होते हे आज आम्ही सांगणार आहोत.

जेव्हा एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला पांढऱ्या कपड्याने झाकले जाते. त्याचा चेहरा कुणालाही दाखवला जात नाही. त्याच्या मृत्युबद्दल खूप गुप्तता बाळगली जाते.

तुम्ही कधी तृतीयपंथीयाची अंत्ययात्रा बघितली आहे का? नाही ना? आपल्याला कधीही अशी अंत्ययात्रा न दिसण्यामागे एक कारण आहे.

त्यांची अंत्ययात्रा कधीही दिवसा न काढता रात्री काढली जाते. शिवाय या अंत्ययात्रेत तृतीयपंथी वगळता इतर लोकांना सामील करून घेतले जात नाही.

इतकेच काय तर तृतीयपंथी वगळता इतर कोणीही ही अंत्ययात्रा बघू नये याचीही खूप दक्षता घेतली जाते.

जर इतर कुणी ही अंत्ययात्रा बघितली तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा पुढील जन्म पुन्हा तृतीयपंथी म्हणूनच होईल असे मानले जाते. पुन्हा असेच जन्माला येऊन आजवर भोगलेल्या नरकयातना वाट्याला येऊ नयेत म्हणून इतर समाजापासून लपवून ही अंत्ययात्रा निघते.

या अंत्ययात्रेमध्ये कुणीही रडत नाही, दुःख दाखवत नाही. उलट वाद्यांच्या गजरात, नाचत आनंदात ही अंत्ययात्रा निघते. कधी कधी तर रंग सुद्धा उधळले जातात.

 

तृतीयपंथी समूहातील व्यक्तीचा मृत्यू म्हणजे त्या व्यक्तीची सुटका झाली असे मानतात. सतत होणाऱ्या हेळसांडीतून मृत्यूमुळे सुटका होऊन त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त झाल्याचा त्यांना आनंद होतो. त्यामुळेच दुःख करून न घेता ते आनंद साजरा करतात.

तृतीयपंथी कोणत्याही धर्मात जन्मलेला असला तरीही मृत्यूनंतर त्याला दफनच केले जाते.

काही ठिकाणी इतरांप्रमाणे तिरडीवर मृतदेह ठेऊनच अंत्ययात्रा निघते. परंतु, काही ठिकाणी असे केले जात नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीला इतर तृतीयपंथी उभे करतात आणि तसेच चालवत दफनभुमीपर्यंत नेतात.

जन्मभर जी अवहेलना झाली, जे दुःख झेलले त्याची जाणीव करुन देण्यासाठी आणि शेवटीही असाच अपमान वाट्याला येणार ही जाणीव करुन देण्यासाठी असे केले जाते.

दफनभूमीपर्यंत पोचल्यावर तृतीयपंथी समुदायातील इतर सदस्य आपल्या पायातील चप्पल काढून मृतदेहाला मारतात. असे केल्याने मृत व्यक्तीने केलेल्या पापांचे प्रायश्चित्त होते आणि पुन्हा त्याच्या वाट्याला तृतीयपंथी म्हणून जगण्याचे दुःख येत नाही असा समज आहे.

दफनविधीनंतर कोणतेही विधी होत नाहीत. तेथे कुणीच रडत नाही. जवळील व्यक्ती दुरावल्याची, त्याच्या सहवासाला मुकल्याची खंत प्रत्येकालाच असते. म्हणूनच दफनविधीनंतर घरी गेल्यावर मात्र सर्वांच्या आत्तापर्यंत दाबून ठेवलेल्या दुःखाला बांध फुटतो.

मृत व्यक्तीच्या जवळील लोक ऊर बडवून  मोठ्याने रडतात, शोक करतात.

कोणत्याही तृतीयपंथियाच्या मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती दान केली जाते. त्या व्यक्तीच्या आठवणी पुर्णपणे पुसून टाकण्यासाठी असे केले जाते.

ज्या टोळीतील वा समूहातील तृतीयपंथीयाचा मृत्यू होतो त्यातील इतर लोक सात दिवस कडकडीत उपवास करतात. या उपवासाच्या दिवसांत ते मृत व्यक्तीला पुन्हा असा जन्म मिळू नये यासाठी ‘अरावन’ या आराध्य देवतेकडे प्रार्थना करतात.

यातून एका गोष्टीची प्रखरतेने जाणीव होते. ती अशी की, तृतीयपंथी म्हणून जन्माला येणाऱ्यांच्या वाट्याला आयुष्यभर एवढे दुःख येते की त्यांना जगणे शिक्षा आणि मरण प्रिय वाटते.

मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा असे अपमानास्पद आयुष्य जगायला लागू नये म्हणून ते शक्य तेवढे प्रयत्न करतात. प्राणप्रिय व्यक्तीलाही शेवटच्या क्षणीसुद्धा त्याची किती अवहेलना झाली याची जाणीव करून देत पुन्हा असा जन्म घेऊ नको म्हणून बजावतात.

आपल्याच समाजातील एखाद्या घटकाला त्याला मिळत असणाऱ्या वागणुकीमुळे मृत्युनंतर आनंदोत्सव साजरा करावा वाटतो. स्वतःला संवेदनशील प्राणी म्ह्णवून घेणाऱ्या सर्वांसाठी ही एक लज्जास्पद बाब आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.