चार वेळा होता होता राहून गेलं, वाचा रतन टाटांच्या लग्नाची गोष्ट!
एक-दोन नव्हे तर चार वेळा पडले होते प्रेमात, तरीही अविवाहित आहेत रतन टाटा; कारण..
रतन टाटा आज कोणाला माहिती नाहीत!! यशस्वी उद्योजक रतन टाटा आज वयाच्या 83 वर्षात आहेत. एक बिजनेस आयकॉन, यशस्वी उद्योजक, आदर्श व्यक्तिमत्व, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणारे आणि व्यवसायाबरोबरच देशप्रेम जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत.
अत्यंत नम्र , शांत आणि साधे व्यक्तिमत्व म्हणूनही ते ओळखले जातात. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी लोकांना खूपशा माहिती नाहीत, त्यांनी त्यांचं खाजगी आयुष्य कधीही लोकांसमोर आणलं नाही. दिसायला हँडसम असणारे रतन टाटा अविवाहित आहेत. आता भारतासारख्या देशात ते का बरं अविवाहित राहिले असतील याबद्दल चर्चा होत राहतात.
गॉसिप करणाऱ्यांसाठी मात्र हा एक इंटरेस्टिंग टॉपिक असतो. मितभाषी असलेल्या रतन टाटांनीही आपल्या खासगी आयुष्याबद्दल मौन बाळगलं. परंतु २०११ साली, ‘CNN इंटरनॅशनल टॉक एशिया प्रोग्रम’ ला दिलेल्या मुलाखतीत मात्र त्यांनी याबद्दल थोडंफार सांगितलं. त्यात ते म्हणाले की,
“माझं चार वेळा लग्न होता होता राहिलं. प्रत्येक वेळेस काहीना काही वेगवेगळ्या घडामोडी घडत राहिल्या, एकातून दुसरी घटना, दुसरीतून तिसरी आणि मग लग्न करायचं राहूनच गेलं. या चारही वेळांमध्ये वेगवेगळे प्रसंग घडले आणि लग्न राहून गेलं.
परंतु आता मात्र आता मात्र मी या घटनांकडे जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्यावेळेस यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर मात्र लग्न झालं नाही याची मला खंत वाटत नाही.
कदाचित माझं लग्न झालं असतं तर कॉम्प्लिकेशन्स वाढले असते. त्यामुळे माझ्या हातून काही वाईट झालं नाही यात मी समाधानी आहे.”
अलीकडेच रतन टाटांनी त्यांच्या तरुणपणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो देखणा फोटो पाहिलं तर असं वाटतं की, यांच्या आयुष्यात प्रेमाच्या घटना घडल्याच नसतील का, हे कसं शक्य आहे?
आणि हाच प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस ते म्हणाले की,
“मी माझ्या आयुष्यात सिरियसली चार वेळा प्रेमात पडलो. प्रत्येकवेळी असंच वाटत होतं की, आता हे यशस्वी होईल, पण तसं झालं नाही”.
त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दल ही सांगितलं, जेव्हा ते अमेरिकेत होते तेव्हा त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. लग्नही होणार होतं. तो काळ १९६२ सालचा. त्यावेळेस भारतात त्यांच्या आजीची तब्येत खालावली होती, म्हणून रतन टाटा भारतात परत आले. कारण रतन टाटांच्या आईवडिलांच्या विभक्तिनंतर आजीनेच त्यांचा सांभाळ केला होता.
नेमकं त्याच वेळेस भारत- चीन युद्धाचा भडका उडाला होता. त्यावेळची परिस्थिती थोडी गंभीर बनली होती आणि अमेरिकेच्या मते भारत-चीन युद्ध म्हणजे हिमालयात वाढलेला तणाव होता. परिस्थिती अस्थिर होती, यातून पुढे काहीही घडू शकतं अशी त्यांची शंका होती. भारत-चीन युद्धाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात नकारात्मक होत्या. अशा अस्थिर वातावरणात तिला भारतात पाठवायला तिचे आईवडील तयार झाले नाहीत.
आणि बहुतेक तिलाही भारतात येणं श्रेयस्कर वाटलं नसावं. म्हणूनच ती भारतात आली नाही आणि लग्न झालं नाही. मग पुढे तिने अमेरिकेतच लग्न केलं. रतन टाटांना जेव्हा विचारण्यात आलं की, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं त्यापैकी कोणी अजूनही या शहरात राहते का? तर त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. पण त्याविषयी जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला. कुठल्याही स्त्रीचं नाव त्यांनी याठिकाणी घेतलं नाही.
अलीकडे ‘Humans of Bombay’ या फेसबुक पेजवर बोलताना त्यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना सांगितल्या. १९३७ साली जन्मलेल्या रतन टाटांच्या अगदी लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यांचा सांभाळ, त्यांच्या आजीनेच केला. “आजीने माझ्या आणि माझ्या सावत्र भावावर खूप चांगले संस्कार केले. प्रतिष्ठा खूप महत्त्वाची असते हे तिनेच आमच्यावर बिंबवलं.” वडिलांच्या आणि त्यांच्यामध्ये वाद असायचे पण आजी सांभाळून घ्यायची. त्यांना अमेरिकेत शिकायचे होते तर वडिलांना वाटायचं की, त्यांनी लंडन मध्ये शिकावं. त्यांना आर्किटेक्ट व्हायचं होतं तर वडिलांना वाटायचं की त्यांनी इंजिनियरिंग करावं. शेवटी आजीनेच त्यांना अमेरिकेत शिकण्यासाठी पाठवलं. तिकडे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात कॉर्नेल येथे आर्किटेक्ट केलं. नंतर त्यांनी लॉस एंजेलिस मध्ये नोकरी करायला सुरुवात केली. २ वर्ष नोकरी पण केली. त्या दिवसांबद्दल सांगताना टाटा म्हणतात की,
माझ्या आयष्यातील ते सर्वात सुंदर दिवस होते. माझी आवडती नोकरी होती, गाडी होती आणि लवकरच लग्न पण होणार होतं. त्याचवेळेस आजी आजारी पडली आणि त्यांना भारतात परतावं लागलं.
१९६२ नंतर त्यांनी टाटा समूहामध्ये काम करायला सुरुवात केली. १९९० मध्ये ते टाटा ग्रुपचे अध्यक्ष बनले, २०१२ पर्यंत त्यांनी त्याचा कार्यभार पाहिला.
टाटा ग्रुपच्या नियमानुसार वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी टाटा ग्रुपच्या अध्यक्ष पदाचा पदभार सोडला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जग्वार, लँड रोवर, टेटली आणि कोरस अशा परदेशी कंपन्या टाटा ग्रुप मध्ये सामील केल्या. सामान्य माणसाला परवडतील अशा नॅनो कार टाटांनी तयार केल्या, ते त्यांचं स्वप्न होतं.
रतन टाटा जेव्हा कंपनी मध्ये सहभागी झाले तेव्हा कंपनीचा कारभार हा दहा हजार कोटी रुपयांपर्यंतचा होता, परंतु आता जवळपास ७५ दशलक्ष रुपयांपर्यंत त्याची उलाढाल वाढली आहे.
२००८ मध्ये जेव्हा ताजवर अतिरेकी हल्ला झाला, त्यात घायाळ झालेल्या, मृत्युमुखी पडलेल्या सर्व ताज कर्मचाऱ्यांना, रतन टाटांनी सढळ हाताने मदत केली. त्यानंतर पाकिस्तान बरोबर कोणताही व्यवहार करायचा नाही असा निर्णय टाटा ग्रुप ने घेतला. टाटा मेमोरियल ट्रस्ट तर्फे कित्येक कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार मोफत किंवा कमी खर्चात होतात.
रतन टाटांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण देऊन भारत सरकारने गौरवले आहे.
रतन टाटांनी लग्न केलं नाही किंवा संसार केला नाही, पण त्यांनी कितीतरी संसार उभे केले. पावसात भिजणाऱ्या २ व्हीलर वरील कुटुंबाला पाहून, अशा सर्वसाधारण माणसाला परवडेल अशा किमतीतील कार बाजारात आणली. आपलं साधे जीवन, साधी राहणी आणि संवेदनशीलता मात्र कायम जपली आणि एक आदर्शवत जीवन लोकांसमोर ठेवलं.