fbpx
8.4 C
London
Wednesday, February 1, 2023

विशेष लेख : जीवन आपलं संगीत !

कोमल पाटील : संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असं म्हणणारा माणूस क्वचितचं सापडेल. कुठंही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच त्या नादमाधुर्याचा वेध घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत असतं. नैराश्य, ताणतणाव यांसारख्या आजारांना आपण सामोरं जातं तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी संगीत मुख्य भूमिका पार पाडतं.  मग संगीताची व्याख्या आपल्याला काय करता येईल? ” संगीत म्हणजे कर्णमधुर आणि जनरंजन करणाऱ्या अतिप्राचीन भारतीय परंपरा लाभलेल्या गायन, वादन आणि नृत्य यांचा अंतर्भाव असलेल्या श्रेष्ठ कला.. ”

music 2

प्रत्येक सुख, दुःखाच्या क्षणी आपल्याला यथोचित साथ देत असते. जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतंच. जीवनातला खरा सोबती संगीत आहे. संगीत व्यापक आणि अथांग आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतीय जीवनाशी, संगीत एवढं एकरुप झालंय की संगीताशिवाय भारतीय संस्कृतीचा विचार करणं अशक्यच आहे. ज्यामध्ये संगीताचा समावेश नाही, असा एखादा उत्सव किंवा धार्मिक विधी आपल्याकडे सापडणं कठीणच !!! नद्या, पर्वत, जंगलं, समुद्र, पाऊस, फुलं आणि निसर्गातल्या बऱ्याच गोष्टींची वर्णनात्मक असंख्य गाणी या संगीताच्या खजिन्यात झळकत आहेत.

भारतीय संगीतात गायन आणि वादन या दोन्हीनाही महत्व आहे. मानवानं आदिकाळातच वाद्यांच्या निर्मितीला सुरुवात केली असावी. दगडावर दगड आपटण्यातून होणाऱ्या आवाजातून टिपरीची कल्पना निर्माण झाली. सुकलेल्या शेंगा हलवल्या की त्यातले दाणे खुळुखुळु वाजतात, यावरुन घुंगरांची निर्मिती झाली असावी. जिथं बांबूची वन असतात तिथं वारा आणि बांबूला असलेली नैसर्गिक छिद्र यांच्या अनोख्या संयोगातून आपण शिटीसारखा ‘ सूं s सूं s ‘ असा आवाज ऐकू शकतो. यातूनच बासरी जन्मली असावी. मध्य काळापर्यंत वीणा या तंतुवाद्याचे (तारेच्या वाद्याचे ) त्रितंत्री, नवतंत्री, शततंत्री असे प्रकार प्रचारात होते. बीन, सतार, संतूर ही तंतुवाद्य म्हणजे प्राचीन वीणेचीच सुधारलेली रूपं.

music 3

कोणत्याही कलेचा उगम  आणि विकास यामागं सामाजिक संदर्भ हा असतोच. त्यामुळं वेगवेगळ्या ऋतूंच वर्णन करणारी अगणित गाणी आपल्याकड आहे.त्याचप्रमाणं शेतकऱ्यांनी, मच्छी मारांनी, मेंढपाळांनी कामं करताना गायलेली गाणी, जात्यावर दळताना गायलेल्या ओव्या हीही याच परंपरेतली. कुणी जन्मला तरी लोकं गायचे, कोणी मृत्यू पावला तरी लोकं गायचे. ब्रम्हपुराणात प्रेतयात्रेच्या वेळी चार प्रकारची वाद्य वाजवावीत असंही लिहून ठेवलंय.पूर्वी पुराणकथा किंवा हरिकथा गाऊनच दाखवण्याची प्रथा होती. लोकसंगीत हा एक उत्स्फूर्त असा कलाविष्कार होता, पण त्याला वैदिक काळात एक आकार येत गेला.आर्य संस्कृतीत त्या वेळचे पुजारी /धर्मगुरू हे गायक होते. सामवेदापासून संगीत विकसित झालं.साम म्हणजे स्वरसहित मंत्र. ऋग्वेदातल्या मंत्रांच सामवेदात स्वरयुक्त रूपांतर होतं.आणि याच वेगवेगळ्या ‘ राग ‘ तयार झाले.

कोणतीही कला आत्मसात करताना त्या कलेची साधना करावी लागते . तरच कला ही चिरकाल टिकते. आज समाजात खून, युद्ध, चंगळवाद यांच वातावरण असतानाही मनावर फुंकर घालण्यासाठी अजूनही कुठून तरी, सुंदर गाण्याची एखादी लकेर येते आणि सगळं कसं पुन्हा बहरून येतं !!! आयुष्याच्या वाटेवर कितीही खाचखळगे आणि चढउतार येऊ देत, कोणत्याही परिस्थितीत माणसान गात राहावं.झळझळीत यशाचे क्षण हातातून निसटून गेले तरी चालेल.पण शेवटच्या श्वासापर्यंत आपली ओंजळ सुरांच्या सुगंधी फुलांनी भरलेली असावी. विं.दा. करंदीकरांचे शब्द बदलून एवढंच म्हणावसं वाटतं,

” गाणाऱ्याने गात जावे
ऐकणाऱ्याने ऐकत जावे
ऐकता ऐकता एक दिवस
गाणाऱ्याचे सूर घ्यावे…..”

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here