Financial Planning: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?

0

आर्थिक नियोजन (Financial Planning) हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा मनात असतानाही बऱ्याच गोष्टी योग्य वेळेला पूर्ण होत नाहीत. वाईट वेळ आणि संकटे काही सांगून येत नाहीत. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक टप्पा असा येतो जेव्हा आपल्याला सकारात्मक राहून आलेल्या परिस्थितीचा धीराने सामना करावा लागतो. काहीवेळा नकारात्मक परिस्थितीचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.

विशेष लेख: निवृत्ती नियोजन: फसलेले की असलेले?

Financial Planning: आयुष्यातल्या या ४ प्रसंगांसाठी –

प्रसंग  १ : तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर ?

 • मनुष्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. ते अविरत चालते म्हणून ते कधीच बिघडणार नाही याची काहीही शाश्वती नाही. अचानक तब्येत बिघडली किंवा एखादा अपघात झाला आणि आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आपण आपल्या आरोग्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करून ठेवली पाहिजे.
 • अशा प्रसंगी जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबियांना आरोग्यासाठी संचयित केलेल्या विमा योजना सांगणे शक्य नसेल तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. ते असे-
  • अशा बिकट प्रसंगी तुमच्या कुटुंबियांना काही हजार रुपयांची व्यवस्था करणे शक्य होईल का?
  •  तुमचे आरोग्य विमा कार्ड कुठे आहे किंवा आपल्या आपत्कालीन गुंतवणुकीबद्दल त्यांना माहिती आहे का?
  • तुमच्या आरोग्य विमा कंपनीचे नाव आणि  टीपीए फोन नंबर माहिती आहेत का ?
  • तुम्ही त्यांच्या मोबाइलवर किंवा आपल्या मोबाइलवर एक रुग्णवाहिका सेवा नंबर सेव्ह केला आहे का?
 • भविष्याप्रती केवळ काळजी करून उपयोग नाही. तर त्यासाठी तुमच्या पश्चात कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या संपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
 • आर्थिक नियोजन (Financial Planning) करताना ते लिखित स्वरूपात असावे, मग ते डिजिटल असो किंवा कागदावर. यामुळे आपल्या कुटुंबाचे पुढचे जगणे सहज आणि सोपे होऊ शकेल.

प्रसंग २ – काही कारणास्तव तुमची नोकरी सुटली तर?

 • सध्याच्या काळात सर्वात बेभरवशाच्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे नोकरी. जे कधी केव्हा कसे येतील आणि काय घेऊन जातील याचा नेम नाही.
 • खासगी क्षेत्रातील नोकरी जाण्याची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर लटकत असते.
 • शेअर बाजार डळमळला तर लगेच त्याचा परिणाम खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर होतो.त्याचा कोरोना काळात आपल्या सर्वांचा प्रत्यय आला असेल.
 • आपण आपली नोकरी गमावली अशी कल्पना केल्यास खालील प्रश्न निर्माण होऊ शकतात.
  • आपल्याला येत्या ६ महिन्यांचा घरखर्च व गृहकर्जाचे हफ्ते फेडणे शक्य होईल का ?
  • नवीन योग्य संधी आपल्याला मिळेल का?
  • नावडीचे एखादे काम करणे भाग पडले, तर तुम्हाला काय वाटेल?
  • नवीन कामाच्या ठिकाणी आपले मन रमले नाही किंवा मनासारखे काम मिळाले नाही तर, मधून नोकरी सोडायचे धैर्य तुमच्यात असेल?
 • या सर्व प्रश्नांची थोडक्यात उत्तरं होय किंवा नाही इतकेच असू शकते. असा प्रसंग आपल्या आयुष्यात आला तर त्यासाठी आपण किती तयार आहात याचे उत्तर यामधून मिळेल.

हे नक्की वाचा: तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल?

प्रसंग ३  – तुम्हाला अचानक पाच लाखांची गरज पडली तर ?

 • आजच्या जगात माणसा इतकाच पैसाही महत्वाचा झाला आहे. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग मात्र आणता येत नाही. पैसा हा कमवावाच लागतो.
 • आयुष्यात कुठल्याही क्षणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन पैशाची आवश्यकता भासू शकते.
 • कुटुंबात कुणी अचानक आजारी पडले किंवा आपल्याला घर विकत घ्यायचे आहे, मुलांना उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठवायचे आहे अथवा नामांकित संस्थेत ॲडमीशन घ्यायची आहे. अशा कोणत्याही परिस्थितीत पैशांची भासू शकते.
 • सामान्य माणसाला कठीण प्रसंगात अगदी १ लाख रुपयांची व्यवस्था करणे देखील जड जाते. अशा परिस्थितीत जर ५ लाख रुपयांची आपल्याला गरज पडली आणि त्याची व्यवस्था करायला आपल्याला जमेल का?
 • जर याचे उत्तर नाही असेल तर,  आपण स्वत: ला विचारले पाहिजे की आपल्याला  किती रुपयांची व्यवस्था करणे शक्य होईल ? ३ लाख? १ लाख? ५०,००० रुपये?
 • यावरून सध्या तुमची आर्थिक परिस्थिती आणि त्याचे करावे लागणारे योग्य नियोजन याबाबत कल्पना स्पष्ट होतील. ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकेल.

प्रसंग ४ –  तुमचे आकस्मिक निधन झाले तर ?

 • आधुनिक सांप्रत काळात मनुष्याला सर्व सुखसोयी सहज उपलब्ध होऊ शकतात. त्या उपभोगण्यासाठी मिळणार कालावधी मात्र अनिश्चित असते.
 • काळ आणि वेळ सांगून येत नाही. कल्पना नसताना यमदेवता कुठल्यातरी अनामिक रूपाने येते आणि माणसाला घेऊन जाते.
 • सर्व सुखे आपल्या पायाशी लोळण घेत असतानाच जर तुम्ही अचानक मृत्युमुखी पडलात तर ?
 • काळाची झडप फार शांत असते. तिची निश्चित वेळ सांगणे अशक्यप्राय आहे. म्हणूनच आपण वैकुंठी गेल्यावर आपल्या कुटुंबाची आर्थिक सोय करून ठेवणे सुद्धा एक जबाबदारीच आहे.
 • जाणारा निघून जातो, पण त्याच्या पश्चात कुटुंबियांना बऱ्याच आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागू शकते
 • आपल्या  बाबतीत असे घडू नये म्हणून आपण स्वतःलाच काही प्रश्न विचारले पाहिजे. ते असे –
  • आपल्या कुटुंबियांना आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती आहे का?
  • बँकेचे व्यवहार करण्याचे ज्ञान आपल्या कुटुंबियांना आहे का?
  • तुमच्या बँक डिटेल्स कुटुंबातल्या किमान एका नजीकच्या व्यक्तीला माहिती आहे का?
  • आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची तरतूद केली आहे का?

महत्वाचा लेख: Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

Financial Planning: आर्थिक नियोजन करण्याची गरज आपल्याला वाटते आहे ?

 • परिस्थिती पुढे हतबल न होता त्याचा सामना करण्याची तयारी आपण केली पाहिजे.
 • भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जाणीव होणे महत्वाचे आहे. मग यावर विचार करून आपल्याला आर्थिक नियोजन करावे लागेल.
 • कमीतकमी आपल्या आर्थिक जीवनातील मुख्य आणि मूलभूत समस्या ओळखून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबियांचे आणि आपले हाल होऊ नये यासाठी आपण आर्थिक बाजू मजबूत करण्यास प्रयत्नशील असले पाहिजे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.