Stock Broker: योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?

0

स्टॉक ब्रोकर (Stock Broker) म्हणजेच शेअर दलाल.  स्टॉक ब्रोकर हा शेअर बाजार आणि  गुंतवणूकदार यामधला प्रत्यक्ष दुवा आहे. आपण ज्या दलालसह भागीदारी करण्याचे ठरवता, त्याचा आपला गुंतवणुकीवर लक्षणीय परिणाम होत असतो. जेव्हा ब्रोकरची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा आपण निवडलेली व्यक्ती योग्य आहे का, त्या व्यक्तीचा आपल्या वैयक्तिक आणि आर्थिक उद्दिष्ट्ये गाठायला कितपत उपयोग होईल, इ. गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक ब्रोकरची स्वत:ची साधक आणि बाधक वैशिष्ठे असतात, परंतु ब्रोकर बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याचा उहापोह आपण या लेखात करणार आहोत.

Stock Broker: योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा

१. सकल सेवा प्रदान करणारा ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर यातला फरक-

 • या सगळ्याची सुरुवात करताना सर्वात मूलभूत बाब म्हणजे, आपली आर्थिक उद्दिष्ट्ये आणि त्यासाठीचा अपेक्षित कालावधी लक्षात घेता, आपण सकल सेवा ब्रोकर शोधतोय की एक  डिस्काउंट ब्रोकर शोधतोय, याचा विचार आधी व्हायला हवा.
 • डिस्काउंट ब्रोकर विशेषत: नो-फ्रिल स्टॉक ब्रोकिंग खाते ऑफर करतात.
 • ब्रोकर निवड आपल्या हेतू आणि उद्दीष्टांवर आधारित आहे. आपल्याला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ किंवा ‘दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीमध्ये’ रस आहे की आपल्याला दोन्हीमध्ये रस आहे ? कोणत्या प्रकारचा ब्रोकर तुमची गुंतवणूकीची आणि आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करेल? सुरुवातीच्या पायरीवर आपले ऑनलाइन डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यापूर्वी, एका मुद्द्यावर नक्की विचार व्हायला हवा आणि तो म्हणजे: आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे ?

२. ब्रोकरची पार्श्वभूमी –

 • ब्रोकरची पार्श्वभूमी आणि मागील कामगिरीची सखोल तपासणी आपल्याला त्याचे आजवरचे कामकाज व त्याच्या परिणामकारकतेची बऱ्यापैकी कल्पना येऊ शकते.
 • ब्रोकर किती काळ या उद्योगात आहे? गेल्या काही वर्षांत स्टॉक ब्रोकरचा विकास कसा झाला? बाजारात त्या ब्रोकरच्या पत आणि परिणामकारकतेचं अनुभव कथन करणारी सद्य/पूर्वाश्रमीच्या ग्राहकांचे अभिप्राय आणि पुनरावलोकने  तपासा. शक्य असल्यास विश्वासू व्यक्तींद्वारे विद्यमान ग्राहकांकडून त्याची पडताळणी करून घ्या.
 • व्यवसायाची सद्यस्थिती, दैनिक उलाढाल मूल्य, निरनिराळे आर्थिक विभाग आणि सध्या सक्रिय ग्राहकांची संख्या जाणून घेणे हे देखील फायद्याचे ठरू शकते.

३. ब्रोकरेज फी –

 • बर्‍याच लोकांसाठी, ब्रोकरची फी किती आहे हाच एकमात्र निकष असतो. ही फी म्हणजे एक अशी रक्कम आहे, जी आपला स्टॉक ब्रोकर, प्रत्येक व्यापाराच्या आधारावर आपल्याला आकारात असतो.
 • अर्थात, आजचा बाजार हा बर्‍यापैकी स्पर्धात्मक आहे. सर्वच दलाल प्रत्येक व्यापाराच्या आधारावर शुल्क आकारतात असेही नाही.
 • असेही काही दलाल आहेत, जे ठराविक कालावधीत काही विशिष्ट व्यवहारासाठी फ्लॅट फी घेतात. उदाहरणार्थ, फर्म ए आपल्याकडून रु. १० प्रति व्यापार आकारते. दुसरीकडे, फर्म बी तुम्हाला रु. ३० दिवसांच्या कालावधीत साधारणतः रु. ५० व्यवहारांपर्यंत रू.२०० ची फी लावते.
 • आपण एक असा ब्रोकर निवडला पाहिजे, जो आपल्यावर सर्वात कमी दलाली शुल्क आकारतो. आता हे आपण नक्की कोणत्या प्रकारच्या व्यापारात अंतर्भूत आहात, बहुतांशी त्याच्या परिमाणांवर अवलंबून असेल.

४. खाते उघडण्याचे शुल्क, ब्रोकरेज आणि इतर खर्च –

 • जेव्हा आपण डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडता तेव्हा आपल्याकडून खाते उघडण्यासाठी काही शुल्क आणि त्याचे देखभाल शुल्क देखील आकारले जाते.
 • तुमचे व्यवहार पार पाडण्यासाठी ब्रोकर ठराविक कमिशन घेतात. हे म्हणजे व्यापार मूल्य टक्केवारी आधारित किंवा त्यांच्यात दलालीच्या अनेक योजना असलेल्या फ्लॅट फी मॉडेल असू शकतात.
 •  जर आपला कमी दलाली फी आकारणारा स्टॉक ब्रोकर, जास्त शुल्क आकारणाऱ्या दलाला इतकाच लाभ देत असेल, तर मुळात जास्त शुल्क आकारचे प्रयोजन काय, याचाही विचार करण्याची गरज आहे.
 • पुरविल्या जाणार्‍या सेवांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता आपण कमी कमिशनचे दलाल सहज शोधू शकता.
 • जर आपण नियमित गुंतवणूकदार/ व्यापारी बनू इच्छित असाल, तर कमी दलाली शुल्काचा विकल्प निवडण्याने निश्चितच तुमची खूप बचत होईल.डिमॅट खाते उघडताना संबंधित या सर्व शुल्काची सुयोजित दलालाच्या शुल्काशी त्याची तुलना करणे विसरू नका.

५. ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर –

 • हल्लीच्या डिजिटल युगात, इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे, ऑनलाईन ट्रेडिंगने ऑफलाइन ट्रेडिंगच्या पारंपारिक कक्षा रुंदावल्या आहेत.
 • वापरास सोप्या आणि माहितीपूर्ण -यूजर इंटरफेसद्वारे आपल्याला आपल्या ऑनलाइन व्यवहारांपर्यंत अतिजलदतेने घेऊन जाणारा ब्रोकर निश्चितच आपल्या दृष्टीने अधिक परिणामकारक  असेल.
 • ऑनलाइन प्रोसेसमधील वारंवार होणारे कोणतेही तांत्रिक बिघाड किंवा अडथळे क्लायंटच्या अनुभवावर परिणाम करू शकतात. एक उत्कृष्ट, टेक-सेव्ही आणि वापरकर्ता केंद्रित ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेला एक स्टॉक ब्रोकर निश्चितपणे आपल्या म्हणजेच ग्राहकाच्या दृष्टीने अधिक स्वीकारहार्य असेल.
 • ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसह ग्राहकाला मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील सुविधा आणि फायदे याचा एक सर्वोत्तम स्टॉक ब्रोकर निवडताना विचार होणे फार महत्वाचे आहे.

६. ग्राहकांप्रती सेवा –

 • एक ग्राहक म्हणून संबंधित संस्थेकडून आपल्याला नक्की कशा प्रकारची सेवा मिळते यावर तिची निवड अवलंबून ठेवणे म्हणजे कदाचित विचित्र वाटेल. परंतु आपण इंट्राडे ट्रेडर असल्यास किंवा मोठ्या संख्येने स्टॉक बाळगून असणारी एखादी व्यक्ती असाल तर, आपणास नेहमी अशाच दलालासोबत भागीदारी करावीशी वाटेल, ज्याच्याशी कधीही संपर्क करणे सोपे असेल.
 • समजा कधी कोणत्याही बाबीवरून साशंकता निर्माण झाली, तर? अशावेळी शक्य तितक्या लवकर या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण आपल्या सामायिक ब्रोकरवर अवलंबून असणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे, जेव्हा स्टॉक ब्रोकर निवडण्याचा विचार केला जातो, तेव्हा तो निर्णय केवळ एका ठरविक निकषावर घेता येत नाही. स्टॉक ब्रोकर आपल्या नियोजित आर्थिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे की नाही हे ठरविण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूकदारास बर्‍याच घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.

लक्षात ठेवा, दीर्घकाळापर्यंत, आपणास परवडणारे आणि संपर्क साधने सोपे असलेल्या विश्वसनीय दलालासोबतच भागीदारी करणे अधिक शहाणपणाचे  आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.