दीपावली म्हणजे सुख शांती समृद्धीचा सण. भारतातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा एक सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा सण सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येतो. अमावस्येच्या अंधारात लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत अगदी उजळून टाकणारा हा सण समाजातील प्रत्येक घटकाला आनंद देऊन जातो.
आली दिवाळी उजळला देव्हारा
अंधारातल्या पणती त्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा
या कवितेच्या ओळी मध्ये वर्णन केल्या प्रमाणे आनंद लहरी या दिवाळीच्या सणामध्ये निर्माण होतात. आज आपण याच दिवाळीच्या सणा विषयीची आणि दिवाळीच्या दिव्यांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण असे दीपावलीचे वर्णन करत असताना आपसूकच आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो तो म्हणजे दीपावलीत दिवे का लावतात ? दिवाळी या नावामध्ये दिवा असा शब्द असल्यामुळे दिवे लावतात का ? आपल्या हिंदू संस्कृती मध्ये दिव्यांना प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दिव्यातील तेवत जाणारी ज्योत ही माणसाच्या आयुष्यात जळत राहण्याची म्हणजे सातत्याने काहीतरी करत राहण्याची ऊर्जा निर्माण करते.
दिव्यातील ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते त्याच प्रमाणे आपणही आपल्या आयुष्यामध्ये अशी काही काम करायला हवीत त्यामुळे इतरांना फायदा होईल. म्हणजेच निस्वार्थी भावनेने काम करत राहिले पाहिजे, अशी प्रेरणा या दिवाळीच्या दिव्यांमधून आपल्याला मिळते.
दिवा हा पहिल्यापासूनच मानवाच्या अंधारमय जीवनाचा सोबती आहे. अंधारमय विश्वाला केवळ एका ज्योतीने छेदत जाणारा प्रकाशच हा मानवाचा आधार आहे. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व देण्यात आले आहे.
दिवाळीचा दिवा देखील हेच महत्व अधोरेखित करतो. दिवाळीची अमवस्याही सर्वात मोठी अमवस्या म्हणून संबोधली जाते. या अमवस्येला नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून दिवे लावून सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो.
सध्या आधुनिकतेमुळे बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध एलईडी बल्ब आणि आकर्षक विद्युत रोषणाई मुळे आपण या दिव्यांचे महत्त्व विसरत चाललो आहोत. आपल्या शास्त्रानुसार दीपावलीच्या सणांमध्ये पणती म्हणजे दिवाच लावावा.
मातीचा दिवाच का लावावा ?
पूर्वापारपासून आपल्याकडे काही परंपरा चालत आल्या आहेत. मातीच्या पणतीत तेल टाकून कापसाची वात करून त्याचा दिवा तयार केला जातो आणि हाच दिवा दारात अंगणात, आड बाजूला अंधारात, तुळशीच्या वृंदावनात लावला जातो. मात्र दिवाळीला मातीचाच दिवा का लावला असा प्रश्न आताच्या नव्या पिढीला पडतो. या मागचे मूळ कारण आहे कुंभार समाज आणि त्यांची कलाकुसर.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला समजाच्या सर्व घटकांना समान आनंद देण्याची रीत आहे. कुंभार हा समाज पूर्वीच्या काळी मातीची मडकी, पणत्या, भांडी, अशा काही वस्तू बनवून बाजारात विकण्यासाठी आणत असे. त्यातून जे काही चार पैसे मिळत त्यावर तो समाज आपला उदरनिर्वाह करत. सणांच्या दिवशी त्यांच्या घरात देखील आनंद आणि समृद्धी नांदावी यासाठी सर्वजण बाजारात कुंभाराकडून दरवर्षी नवीन पणत्या विकत घेत.
सध्या ही संस्कृती आणि परंपरा मागे पडत चालली आहे. विद्युत रोषणाई करणारे आधुनिक दिवे आता बाजारात आल्याने कुंभाराच्या मातीच्या दिव्यांचे महत्व कमी झाले आहे. तरीदेखील अजूनही काही ठिकाणी आपल्याला असे अनेकजण मातीच्या पणत्या विकताना दिसतात. त्यामुळे आपण सर्वांनी अशा विक्रेत्यांकडून मातीचा दिवा विकत घेतला पाहिजे.