दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्व आहे. प्रत्येक दिवसाचे शास्त्र आणि त्यामागची रीत देखील वेगळी आहे. आज आपण दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे महत्व जाणून घेणार आहोत.
वासूबारसेपासून दिवाळीला खरी सुरवात होते. या दिवशी गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यादिवशी गाई गुरांना सजवून त्यांची पूजा केली जाते. तर मानवाच्या अस्तित्वासाठी तुम्ही देखील खपत आहात या प्रति त्यांचे आभार व्यक्त केले जातात.
दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना का आहे विशेष महत्व, जाणून घ्या त्या मागचं खरंं तथ्य
वासूबारस या दिवसाला गोवत्सद्वादशी देखील म्हणतात. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. गाई गुरे हे मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत . शहरी भागात ते फारसे जाणवत नसले तरी सकाळी चहाला लागणाऱ्या दुधाची जेव्हा कमतरता भासते तेव्हा आपल्याला या गाईचे महत्व समजते.
पूर्वीच्या काळी मानव पूर्णपणे शेती वाडी आणि पशुपालनावर विसंबून होता. त्याचे विश्व हे या सर्व गोष्टींमध्येच दडलेले असायचे, त्यामुळे निसर्गपूजा आणि आपल्यासाठी स्वतःचे स्वातंत्र्य बाधित करून आपल्याबरोबर खपत असलेल्या जनावरांप्रती त्याला जाणीव असायची म्हणून मानव आपल्या प्रत्येक उत्सवात आणि आनंदात जनावरांना देखील समान मान देत असे.
रीतीनुसार कशी करतात पूजा ?
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे.या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
हे माहित आहे का ? …म्हणून दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला वापरतात मोती साबण, असा आहे इतिहास
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
दिवाळीला सुरवात
वासूबारसपासून दिवाळीला सुरवात होते या दिवसापासून घरात गोडधोड बनवले जाते. घरांना तोरणंं आणि रंग लावून सजवले जाते. घरात न लागणाऱ्या वस्तू फेकून घर स्वच्छ करून घराला नवपण आणले जाते. महिला मंडळी अंगणात रांगोळी काढून या सजावटीची शोभा आणखी वाढवतात.घराला नवचैतन्याचा बहर येतो. दारातली पणती, अंगणातली रांगोळी, स्वयंपाक घरातील तळवण आणि मुलांचा कल्ला या सणाचा आनंद आणखी द्विगुणीत करतात.