fbpx

‘या’ रंगांच्या सणाला अशी घ्या मुलांची काळजी

होळी म्हणजे मजा आणि मस्तीचा सण. होळी आणि रंगपंचमीचा सण भारतात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. रंग आणि पाण्याने भरलेले फुगे, पिचकाऱ्या, गुलाल यांमुळे हा सण अगदी रंगतदार होतो. होळी आणि रंगपंचमीची सर्व खरेदी झाली आहे. पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठीही तुम्ही आतूर असाल, थंडाई बनवून झाली असेल, पण या मजामस्तीत मोठ्यांपेक्षा जास्त छोट्यांना सामील व्हायची घाई आहे. कारण होळी आणि रंगपंचमीला धम्मालमस्ती करायला सर्वात पुढे मुलंच असतात. त्यांची होळी होलिकादहनाच्या आधीच सुरू झालेली असते आणि त्यांचा उत्साह अगदी दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या संध्याकाळपर्यंत कायम असतो. पण या सणाच्या उत्साहात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे छोट्या मुलांच्या काळजीची. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेण्यासाठी पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमची मुलं होळी खेळतीलही आणि त्याचे साईडईफेक्ट्सही झेलावे लागणार नाहीत.

होळीच्या रंगांमुळे त्वचेपासून केसांपर्यंत कोणत्याही अवयवाला नुकसान होऊ शकते. मुलांची त्वचा ही खूपच नाजूक असते. केमिकल आणि सिंथेटीक एजंट्समुळे बनलेल्या कोणत्याही वस्तूंमुळे त्यांची स्कीन खराब होऊ शकते. अशावेळी मुलांच्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्याल ते जाणून घ्या.

केमिकलयुक्त रंग

आर्टीफिशिअल कलरमुळे स्कीन खराब होते. त्यामुळे जर मुलं पाण्याने खेळणार असतील तर त्यांना पाण्यात रंग घालू देऊ नका. शक्यतो मुलं खेळताना ऑर्गैनिक कलर्स वापरतील याची काळजी घ्या. मुलांना रंगपंचमीचे रंग खेळायला देण्याआधी तपासून घ्या की, केमिकलयुक्त तर नाही ना. मुलांना रंगाची एलर्जी होऊ नये यासाठी हर्बल रंगांना प्राधान्य द्या किंवा तुम्ही मुलांसाठी घरीच ईको फ्रेंडली रंगही बनवू शकता.

DIY: रंगपंचमीसाठी बनवा नैसर्गिक रंग जे तुम्हाला देतील नैसर्गिक ग्लो

रंगांआधी करा तेलाचा वापर
रंगपंचमी खेळण्याआधी मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तेल लावा. सेन्सिटीव्ह स्कीन असल्यामुळे रंगांमुळे स्कीन, डोळे आणि केस खराब होऊ शकतात. अशावेळी मुलांना रंग खेळायला पाठवण्याआधी त्यांच्या स्कीनला नारळाचं तेल, बदाम तेल किंवा सूर्यफुलाचं तेल लावून मग बाहेर पाठवा. उन्हातील युव्ही किरणांपासून बचाव करण्यासाटी मुलांना तुम्ही वॉटरप्रूफ सनस्क्रीनही लावू शकता. यामुळे खेळून आल्यानंतर स्कीनवरील रंग काढण्यास त्रास होणार नाही.

रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी

मुलांच्या जवळ राहा

जेव्हा मुलं रंगपंचमी खेळत असतील तेव्हा त्यांच्या आसपास नक्की राहा. रंग खेळताना त्यांच्या नाकातोंडात रंग जाऊ नये याची काळजी घ्या. तसंच मुलांना पूर्ण कपडे घाला म्हणजे त्यांचं शरीर व्यवस्थित झाकलं जाईल. मुलींना खेळायला पाठवताना त्यांचे केस नीट बांधा. अनेकवेळा केस मोकळे असल्यामुळे त्यातील रंग डोळ्यात जाण्याची शक्यता असते. काहीवेळा उन्हात खेळल्यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.

फुग्यांपासून सावधान

छोट्या मुलांना फुग्यांमध्ये रंग भरून खेळायला देऊ नका. कारण कधी कधी अचानक फुगा लागल्याने इजा होण्याची शक्यता असते किंवा फुगा फुटल्यास रंग मुलांच्या तोंडात किंवा डोळ्यात जाऊ शकतो.

रंगपंचमी खेळताना रंग डोळ्यात आणि नाका-तोंडात गेल्यावर करा ‘हे’ उपाय

जेल कलर्सचा वापर
जर तुम्ही रंगपंचमीला सिथेंटीक रंगाचा वापर करणार असाल तर जेल कलर मुलांसाठी सर्वात चांगले आहेत. या कलर्समुळे स्कीनला नुकसान होत नाही आणि साफ करणंही सोपं असतं. तसंच अचानक येणाऱ्या जाणाऱ्या कोणावरही गुलाल फेकू नये, अशा सूचना द्या. कारण अनेकांना त्यामुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

मुलांना शिकवा चांगलं वागणं आणि टाळा वाद
होळी आणि रंगपंचमीच्या उत्साहात मुलं विसरतात की, कोणाशी कसं वागावं. अशा वेळी खेळायला पाठवतानाच मुलांना समजवा की, जर कोणाला रंग खेळायचा नसेल किंवा कोणी आजारी असेल तर जबरदस्ती करू नका. पण ही गोष्ट मुलांना कळत नाही. खेळाखेळात ते त्यांच्यावरही रंग टाकतात. यामुळे भांडणं होतात.

मग रंगही खेळा आणि काळजी घ्या. रंगाचा बेरंग होऊ देऊ नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here