नवरात्री हा उत्सव साजरा करण्यासाठी हिंदू भाविक जोराशोरात तयारी करतात. नवदुर्गांची पूजा, दांडिया-गरबा, उपवास, नवरात्रीचे विशेष पदार्थ बनवण्याव्यतिरिक्त बरेच लोक नवरात्रीचे विशेष रंगही पाळतात. नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 रंग. या 9 रंगाचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यातील बहुतेकांना या रंगाचे विशेष महत्त्व माहिती नाही. काळजी करू नका या लेखात आम्ही तुम्हाला नवरात्रीच्या 9 रंगांचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
देवी दुर्गाचे अनेक भक्त या रंगांना गांभीर्याने घेतात आणि त्यानुसार कपडे घालतात.असे केल्याने समृद्धी, आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतात, अशी मान्यता आहे. आता हे कितपत खरं आहे हे माहिती नाही. पण 9 दिवस 9 रंग परिधान केल्याने सकारत्मक ऊर्जेची जाणीव नक्की होते. चला तर जाणून घेऊयात या 9 रंगाचे महत्त्व…
दिवस पहिला – नारंगी
उत्सवाची सुरूवात चमकदार नारंगी रंगाने होते. हा रंग ऊर्जा आणि आनंद दर्शवितो. या दिवशी हिंदू देवी ‘शैलपुत्री’ची पूजा करतात.
शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते. या देवीचा आवडता रंग नारिंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजते. त्यामुळे या दिवशी नारिंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते. या दिवशी भगव्या रंगाचे परिधान केल्यास, शैलपुत्री प्रसन्न होते असा समज आहे. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
दिवस दुसरा – पांढरा/ श्वेत
दुसऱ्या दिवशी श्वेत रंग परिधान करतात, जो शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. हिंदू या दिवशी ‘देवी ब्रह्मचारिणी’ची पूजा करतात.
नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं म्हटलं जातं. तप, त्याग, संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. त्यामुळे या देवीची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसंच ही ज्ञानदेवता असल्याचेही समजण्यात येते.
दिवस तिसरा – लाल
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी लोक लाल रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग सौंदर्य आणि निर्भयता दर्शवते. हिंदू लोक या दिवशी ‘चंद्रघंटाची’ पूजा करतात.
दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.
दिवस चौथा – गडद निळा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळा रंग परिधान करतात. हिंदू या दिवशी ‘कुष्मांडा देवी’ची पूजा करतात.दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा.
या देवीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र परिधान करावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहेत. त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ति रूप मानण्यात येते. सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याने ही देवी अष्टभुजा नावानेही प्रचलित आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा अशी आयुध प्रत्येक हातात असून एका हाताने आशिर्वाद देणारी ही देवी सिद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देते असा समज आहे. त्यामुळेच सुखकारक गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग असल्याचेही सांगण्यात येते. यामुळेच या दिवशी गडद निळ्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चांगले आरोग्य, संपत्ती आणि बळकटी येण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते.
दिवस पाचवा – पिवळा.
लोक नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिवळा रंग घालतात. पिवळा म्हणजे उत्साह आणि चैतन्याचा रंग होय. पाचव्या दिवशी हिंदू ‘स्कंदमाता’ची पूजा करतात.
पिवळा रंग हा दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचा सर्वात आवडता रंग आहे. भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पावून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते असे समजण्यात येते. पिवळा रंग हा अग्रेसर असून उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा हा आवडता रंग असून याला पाचव्या दिवशी परिधान करण्याचे महत्त्व आहे. लौकिक, सांसारिक बंधनातून मुक्त होऊन उपासना करण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते. या देवीच्या पूजेसाठीदेखील पिवळ्या फुलांचा वापर करण्यात येतो. पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. घरात सुखशांती, समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते. सतत प्रसन्न वाटण्यासाठी या पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी प्राप्त झाले आहे. स्कंद अर्थात कुमार कार्तिकेय यांचं दुसरं नाव आहे. प्रसिद्ध देवासुर युद्धात देवांचे सेनापती म्हणून कार्तिकेय यांनी काम पाहिले होते. पुराणात सांगितल्यानुसार कुमार आणि शक्ती अशी यांची महिमा आहे. या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता म्हटले जाते अशी आख्यायिका सांगण्यात येते.
दिवस सहावा – हिरवा
सहाव्या दिवसाचा हिरवा रंग नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवितो. सहाव्या दिवशी हिंदू ‘कात्यायनी देवी’ची पूजा करतात.
परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.
दिवस सातवा – राखाडी/करडा
सातव्या दिवसाचा रंग राखाडी आहे, सातव्या दिवशी हिंदू ‘देवी कलारात्री’ची पूजा करतात आणि या दिवसाला सप्तमी म्हणतात.
नवरात्रीतील सप्तमीच्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजाअर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. सातव्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काळरात्रीची पूजा ही सप्तमीला करण्यात येते.
दिवस आठवा – जांभळा
या दिवसाला अष्टमी म्हणतात, बरेच लोक या दिवशी कंजक करतात. या दिवसाचा जांभळा रंग , बुद्धी आणि शांतीची शक्ती दर्शवितो. लोक या दिवशी देवी महागौरीची पूजा करतात.
महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप असून तिचा आवडता रंग जांभळा रंग समजण्यात येतो. आयुष्यात सुंदर आणि अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते. शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजण्यात येतो. पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. महागौरीने भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे होते मात्र त्यानंतर भगवान शिव पार्वतीला वरदान देऊन तिला गौर वर्ण देतात अशी आख्यायिका आहे म्हणूनच तिला महागौरी असंही नाव देण्यात आलं आहे. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसंच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येतात. त्यामुळेच प्रसन्न वातावरणासाठी हा जांभळा रंग निवडण्यात आला आहे.
दिवस नववा – मोरोपंखी
या दिवसाला नवमी म्हणतात. हा नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी अनुष्ठान केले जाते आणि देवी ‘सिद्धिधात्री’ची पूजा केली जाते. या दिवशी मोरपंखी रंग परिधान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
आवडते रंग आणि उल्लेख हे पुराणात देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या नवरात्रीलाही तुम्ही हे रंग निवडा आणि तुमची नवरात्र सुंदर करा. या देवींच्या आराधनेसाठी हे रंग वापरण्यात येतात आणि त्यांचे महत्त्व अशाप्रकारे आहेत. मात्र हल्लीच्या ट्रेंडनुसार हे रंग बदलत असतात. त्यामुळे तुम्ही ट्रेंडनुसार फॉलो करायचं की देवीच्या रंगांनुसार महत्त्व द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा.
(Imp.news च्या संपूर्ण टीमकडून सर्वांना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.)