“या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
नमस्त्स्ये नमस्त्स्ये नमस्त्स्ये नमो नमः “
कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. खरं -तर नवरात्र हा उत्सव फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. सुरुवातीला तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करायचा. ही प्रथा या सणाच कृषीविषयक स्वरुप प्राप्त करते. मग पुढे या सणाला धार्मिक महत्व आलं आणि देवीच्या उपासनेचा हा उत्सव बनला.
आज नवरात्रीचा दुसरा दिवस किंवा द्वितीय माळ. आपल्याकडे नवरात्रीतल्या नऊ दिवस प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा वाहायची प्रथा आहे. दुसरी माळ ही अनंत, मोगरा, चमेली यासारख्या पांढऱ्या फुलांची असते. खरं -तर नवरात्र उत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा आहे. या आदिशक्तीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपं आपल्याला पाहायला मिळतात.
उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपं तर दुर्गा, काली, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपं. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी ही देवीची नऊ रूपं आहेत. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी देवीची उपासना केली जाते.
“दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमंडलू
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हचारीण्यनुत्तमा”
ब्रह्मचारिणी म्हणजे तप करणारी. डाव्या हातात कमंडलू आणि उजव्या हातात जपमाळ हे ज्ञानाचं प्रतिक आहे. या देवीचं सर्वात प्रसिद्ध मंदिर हे काशीच्या सप्तसागर भागात आहे.
ब्रह्मचारिणी हे दुर्गेचं दुसरं रूप. ‘ब्रह्म ‘या शब्दाचा अर्थ तपस्या असा आहे. देवीचं हे रुप भक्तांना अनंत फल प्रदान करणारं आहे. या देवीनी पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी तिला नारदमुनींनी भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपश्चर्या करायला सांगितली.
त्यामुळं या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असं म्हणतात. एक हजार वर्ष तिने ऊन आणि पाऊस सोसत फळं खाऊन तपश्चर्या केली. आणि शंभर वर्षांपर्यंत जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन दिवस काढले. तिची ही कठोर तपस्या पाहून त्रिलोकातले सर्व ऋषी, देवता, सिद्धगण तिच्या या तपस्येची प्रशंसा करु लागले. तेव्हा ब्रह्मदेवांनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळतील असा वर दिला. अशा प्रकारे या कठोर तपस्येला सामोर गेलेल्या या देवीची आराधना केल्यानं मानवाला विजय आणि सिद्धी प्राप्त होते.
आजचा रंग, भगवा किंवा केशरी
उर्जा, साहस, धैर्याचा हा भगवा रंग. पराक्रमाचं प्रतीक म्हणूनही याकडं पाहिलं जातं.समुद्रात मछवा घेऊन निघालेल्या कोळी बांधवाची ही झलक अनेकांच्याच मनात कुतूहलाचे कैक प्रश्न निर्माण करणारी आहे.