गणेशोत्सव संपताच काही दिवसांतच नवरात्रीची लगबग सुरु होते. दसरा, नवरात्री हे सण तरुणाई व महिलांसाठी खास असतात.
यंदा शनिवार (दिनांक १७ ऑक्टोबर)पासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलश, काळी माती, आणि तांब्या ठेवून त्यावर स्वस्तिक काढून त्याच्यावर नारळ ठेवला जातो. आज या लेखातून आम्ही तुम्हाला या मागील इतिहास आणि प्रथा सांगणार आहोत.
कलश स्थापनेचे महत्व
पौराणिक कथांनुसार कलशांच्या तोंडात विष्णू, घशात महेश आणि मूळ सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आहे असे मानले गेले आहेत. कलशातील मध्यम स्थान मातृ शक्तींचे स्थान मानले जाते.
कलशात पाणी का भरले जाते
शास्त्रानुसार रिक्त (रिकामा) कलश हा अशुभ मानला जातो. म्हणून कलशात पाणी भरले जाते त्याचबरोबर भरलेला कलश हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कलशात पाणी भरण्या मागील आणखी एक उद्देश असा की पाणी भरलेले कलश ठेवल्याने समृद्धी येते.
कलशाच्या पवित्र पाण्याप्रमाणे आपलेही मन शुद्ध व स्वच्छ राहिले पाहिजे. जेणेकरून मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष, राग आणि आसक्तीचे स्थान राहणार नाही.
कलशावरील नारळाचे महत्त्व
गणपतीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा केली जाते. ज्या प्रकारे कोणतेही चांगले काम करण्यापूर्वी श्री गणरायाची पूजा केली जाते त्याच प्रकारे कलशांची पूजा प्रथम केली जाते. नारळाच्या पूजेसह पूजा करणे पूर्ण मानले जाते.
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते . नऊ दिवस देवांची पुजा त्या देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता करणे. प्रत्येक घरी वेगवेगळया पद्धती असतात. घटस्थापनेला घरी भट- सवाष्ण जेवायला बोलावतात. काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून तिची पुजा करून तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस दीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या डोक्यावरबांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात.
काही घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात. नवव्या दिवशी होम हवन होतो. ब्राह्मण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजेच दस-याला आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या उत्सवाची सांगता होते. अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे.
कशाप्रकारे करतात घटस्थापना
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात. ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते.