fbpx
2.7 C
London
Saturday, January 28, 2023

…म्हणून विष्णूंना करावे लागले गणेशाचे पूजन, अष्टविनायकाच्या दुसऱ्या गणपतीची ‘ही’ आहे कथा

सिद्धेश ताकवले : बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांचं आगमन झालंय…यंदाचा गणेशोत्सव हवा तसा उत्साहात साजरा करता येत नाहीये. या कोरोनाने सगळ्या गोष्टींवर अक्षरशः पाणी फिरवलं… गणपती बाप्पाची आपण वर्षभरापासून वाट बघत असतो.त्याची १० दिवस अगदी मन लावून सेवा करण, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नैवद्य दाखवण त्याचबरोबर त्याची ती मनाला प्रसन्न करणारी ती आरास, ती एक प्रकारची ऊर्जा ,उत्साह आपल्यामध्ये असतो आणि यंदा मात्र गणपती बाप्पा आले पण या कोरोनामुळे उत्साह मात्र नव्हता. गणपती बाप्पा आले की आपल्याला आठवतात गणपती बाप्पांची आठ रूप म्हणजेचं अष्टविनायक.

गणेशोत्सव साजरा होत असताना आपण घरी बसूनच अष्टविनायकांपैकी दुसरा अष्टविनायक म्हणजेच सिद्धटेकचा सिद्धिविनायकाची माहिती जाणून घेऊयात…

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

आता या सिद्धिविनायकाची कथा आपण जाणून घेऊयात…

जेंव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने “ॐ” काराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होता तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही.

विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला “ॐ गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.

मंदिराची रचना

सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो. अष्टविनाकांपैकी या गणपतीच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटत.

गणेशोत्सवा दरम्यान सिद्धटेकला मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळते. यंदा आपण घरी बसूनचं अष्टविनायकाची माहिती जाणून घेऊयात आणि आपला गणेशोत्सव साजरा करूयात…. बोला गणपती बाप्पा मोरया….!

हे पण वाचा

#अष्टविनायक : मोरगावच्या मयुरेश्वराचा असा आहे इतिहास, तुम्हाला माहित आहे का ?

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here