स्पेनमधील पोंतेवेद्रा हे शहर जगातील पाहिलं शहर आहे जिथे एकही वाहन दिसत नाही. या शहरातील सर्व नागरिक हे रस्त्यावरून पायी प्रवास करताना दिसतात. एका शहराला पुरेशी असणारी लोकसंख्या या शहरात आहे. तरी देखील इथे वाहनांचा वापर क्वचित केला जातो. एककाळ असा होता याच शहरामध्ये वाहतूक कोंडी असायची. अनेक वाहन ही एकाच दिशेने येऊन शहराच्या मध्यभागी कोंडी करायचे. मात्र आता हेच शहर वाहनमुक्त आणि प्रदूषण मुक्त झाले आहे.
जगातील अनेक देशांची वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेक देश यावर तोडगा काढत आहेत. भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरू या मेट्रो शहरांमध्येही असेच काहीसे चित्र आहे. मात्र यावर तोडगा काढायचा कसा असा प्रश्न प्रशासना समोर आहे.
हाच प्रश्न मार्गी लावला तो पोंतेवेद्रा शहराच्या महापौरांनी. मिगुएल लोरेज हे गेले 20 वर्ष पोंतेवेद्रा शहराचे महापौर आहेत. त्यांनीच शहराला वाहनमुक्त करण्याची संकल्पना आणली. ही संकल्पना राबवताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आता मात्र ज्या नागरिकांनी याला विरोध केला तेच आता त्यांचे गोडवे गात आहेत.
शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्या वाढत होती. त्यामुळे हवेचे प्रदूषण, वाहन अपघाताचे प्रमाण, आणि शहरात वाहतूक कोंडी वाढत होती. त्यामुळेच शहरात वाहनांना मिगुएल लोरेज यांनी बंदी आणली.
सुरवातीला अनेक हॉटेल व्यवसायिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या संकल्पनेचा विरोध केला. शहरात वाहन आली नाहीत तर आमचा व्यवसाय चालणार कसा ? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. काही वाहनधारक नागरिकांनीही न्यायालयात धाव घेतली.
मात्र मिगुएल लोरेज यांनी आपल्या धोरणात कोणताच बदल न करता सर्वांना वाहनमुक्त शहराचे महत्व पटवून देऊन ही संकल्पना राबवली. 20 वर्षापूर्वी सुरु केलेल्या या कामाचा असर आता दिसू लागला आहे. शहर आता वाहनमुक्त होत असल्याने हवेतील 70% कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण हे कमी झाले आहे.
ही मोहीम राबवल्यामुळे आता शहरात पायी चालणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना देखील रस्त्यावर मोकळेपणाने फिरता येऊ लागले आहे. पायी चालणाऱ्यांंसाठीही विशेष सुविधा करण्यात आली आहे. चालताना जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किती वेळ लागेल आणि कुठून कसे जायचे असे मार्ग दाखवणारे फलक जागोजागी लावले आहेत.
शहरात गाड्या येतचं नाहीत असे नाही. दुकानदारांना माल देण्यासाठी अथवा काही होम डिलेव्हरी देण्यासाठी वाहनंं शहरात प्रवेश करू शकतात. मात्र शहरात प्रवेश करताच या वाहनांचा वेग तशी 30 किमीपेक्षा कमी असावा लागतो. आणि एका ठिकाणी गाडी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पार्क करू शकत नाही. तसे न झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते.
वाहनांबाबत बोलताना मिगुएल लोरेज म्हणतात, शहरांमध्ये वाहनंं ही नसावीचं. याच वाहनांमुळे शहरांचा विचका होतो. प्रदूषण वाढते. आणि सामन्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. जेव्हा तुम्ही गाडी घेता तेव्हा तुम्ही रस्ता विकत घेत नाही. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढते रस्ता मात्र तेवढाच राहतो. माझा वाहनांना विरोध नाही. पण वाहनांची जागा ही हायवे किंवा मोठ्या मार्गांवर आहे. जर हीच वाहन शहरात घुसावलीत तर याचे परिणाम विपरीत होतात.
पोंतेवेद्रा शहरात एकेकाळी पार्किंगला गाड्यांची रांग लागायची. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होयची. लहान मुले आणि वृद्धांना पायी चालणे देखील कठीण झाले होते. मात्र नवीन मोहीम राबवल्यानंतर शहर अगदी सुटसुटीत, अपघातविरहित आणि स्वच्छ झाले आहे, असे लोरेज सांगतात.
असाच एक अनुभव एका मटण विक्रेत्याने सांगितला, मी सुरवातीला वाहन बंदीच्या निर्णयाचा विरोध केला. मला वाटायचे माझा दुकानात ग्राहकांची संख्या कमी होईल. मात्र तसे काहीच झाले नाही. उलट पायी चालणाऱ्या नागरिकांमुळे गिऱ्हाईकांच्या संख्येत वाढ झाली.
अनेक देशांनी पोंतेवेद्रा शहराची ही मोहीम राबवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पोर्तुगीज, अमेरिका, फ्रान्स या सारख्या अनेक देशांच्या अधिकाऱ्यांनी पोंतेवेद्रा शहराला भेट दिली. तसेच या अनोख्या उपक्रमाचा फायदा पर्यटन क्षेत्राला देखील झाला. आता अनेक पर्यटक रोड लाईफ एन्जोय करण्यासाठी या शहरात येतात.