जसजसे जीवन पुढे जात आहे तसतसे जग आधुनिक होत चालले आहे. समाजात सध्या मॉड्यूलर किचन संकल्पनेसह नॉनस्टिक भांड्यांचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकांना असे वाटते की, या भांड्यांमध्ये अन्न शिजवण्यामुळे तेलाचा वापर कमी होतो आणि अन्न भांड्याला चिकटत नाही. हेल्दी खाण्याच्या नादात जे लोक ही भांडी वापरतात त्यांना हे ठाऊक नसते की या भांड्यांच्या वापरामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार तसेच फुप्फुसांचे नुकसान होऊ शकते.
नॉन स्टिक भांड्यांमध्ये असते विषारी रसायन
नॉन-स्टिक भांड्यांवर पॉलीटेट्राफ्लोरोएथिलीन (पीटीएफई) नावाचे टेफ्लॉन कोटिंग असते. टेफ्लॉन पीएफओए हे परफ्लुरोओक्टेनोइक अॅॅसिड पासून बनविलेले असते. पीएफओए हा एक अतिशय विषारी पदार्थ आहे. यामुळे शरीराला नुकसान होत असल्याचे समोर आल्यानंतर आता GenX चा नॉन-स्टिक भांड्यांमध्ये वापर केला जात आहे. याच्या वापरामुळे नॉन-स्टिक भांड्यांवर असे लिहिलेले असते की, ते पीएफओए मुक्त आहेत. परंतु त्याऐवजी जी अन्य सामग्री वापरली जात आहे तीसुद्धा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
नॉन स्टीकभांड्यांमुळे उद्भवू शकतात या समस्या
टेफ्लॉन हे एक सुरक्षित कंपाऊंड आहे जे आरोग्यास हानिकारक नाही. परंतु 300 डिग्री सेल्सिअस तपमानावर, नॉन-स्टिक भांड्यांवरचा टेफ्लॉन लेप तुटू लागतो. ज्यामुळे हवेमध्ये प्रदूषित रसायने तयार होतात. हा धूर नाकात गेल्यास पॉलिमर फ्युम फिव्हर किंवा टेफ्लॉन फ्लू होऊ शकतो. यामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी यासारखे सामान्य लक्षणे दिसतात. टेफ्लॉन हे अति गरम झाल्यामुळे त्याचा धूर शरीरात गेल्याने फुफ्फुसे खराब झाली असल्याचेही दिसून आले आहे.
नॉन स्टिक भांडी वापरताना या गोष्टींची काळजी घ्या
नॉन स्टिक तवा आधीच गरम करू नका. भांडी गरम होण्यापूर्वी अन्न किंवा पाण्यासारख्या कोणताही पातळ पदार्थ घाला म्हणजे टेफ्लॉन लेप खराब होणार नाही आणि जळल्यावर धोकादायक धूर निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
तसेच उच्च तापमानात शिजवू नये. तसेच नॉन स्टिक भांड्यात अन्न शिजवताना नेहमीच लाकडी पळीचा वापर करा. मेटल पळीच्या वापरामुळे टेफ्लॉन लेप खराब होऊ शकतो. तसेच जेव्हा नॉन-स्टिक भांडी जुनी होतात आणि त्यांचे टेफ्लॉन लेप निघण्यास सुरवात होते त्यावेळी ही भांडी बदला.